अखिल हिंदू साहित्य संमेलन

नमस्कार..
अखिल हिंदू साहित्य संमेलन या समूहावर चाललेली चर्चा-वादग्रस्त मुद्दे रोज वाचतो आहे.त्या संदर्भात माझ्या मनातील काही मुद्दे विचारार्थ मांडत आहे. भारतीय साहित्यात अस्तित्वादी,शून्यवादी,स्वच्छंतावादी, वास्तववादी,अतिवास्तववादी,जनवादी,समाजवादी, आंबेडकरवादी,मार्क्सवादी
, मानवतावादी असे इझम- अशी भूमिका घेऊन लिहीणारे साहित्यिक आहेत.या सगळ्यात हिंदुत्ववादी साहित्य हा नवा इझम- नवी भूमिका घेऊन लिहीणारे साहित्यिक ते सगळे हिंदूत्ववादी की  हिंदू संस्कृतीत जन्मलेले सर्व 'लिहीते हात' म्हणजे हिंदुत्ववादी साहित्यिक?-स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज पर्यंतच्या साहित्याकडे पाहिले तर यातील बहूतेक सर्व साहित्यिकांनी समाजवादाचीच कास धरली.जेवढे इझम आहेत त्या सगळ्यात माणूस केंद्र स्थानी असावा हे गृहीततत्व आहे.केशवसुतां पासून सुरुवात केली आणि नेमाडे भारत सासणें पर्यंत येऊन थांबलो तर या सगळ्यांना हिंदूत्ववादी साहित्यिक म्हणून स्विकारणार आहोत कां?(यात फक्त पु.ग.सहस्रबुद्धे,पु.भा.भावे ,न.म.जोशी,यांनी हिंदूत्ववादाचा उघड पुरस्कार केल्याचे ठळकपणे आठवते)-मला वाटते या प्रश्नाचा निकाल आधी लावला पाहिजे.जर फक्त हिंदूं धर्माभिमान्यांचे संघटन आणि त्या योगे भा.ज.प.प्रणित सरकारचे मागे खंबीरपणे उभे राहणे, एवढाच आपला उद्देश असेल तर मग साहित्यिक हवेतच कशाला?-या समूहावर समाविष्ट असलेल्या कवी साहित्यिकांनी फक्त धार्मिक क्षेत्रातील वादविवादात सहभागी व्हावे,हिंदूद्वेष्ट्यांना साहित्यातून,व्यासपीठावरुन सडेतोड उत्तर द्यावे ही अपेक्षाही रास्त आहे.पण म्हणून त्यांनी आपले साहित्य फक्त धार्मिक क्षेत्रा पुरतेच मर्यादित ठेवावे असे नाही ना?- वेगवेळे विषय हाताळण्याचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित आहेच.या समूहाच्या नावात 'हिंदू साहित्य संमेलन' असे असल्यामुळे अनेक साहित्यिक आकृष्ट झालेत.होतीलही.उदयोन्मुख कवी-साहित्यिक तर तंबू कुठल्या विचारधारेचा आहे हे बघत नाहीत.संधी देईल त्या तंबू च्या आयोजकांशी ते तेवढ्या पुरते जमवून घेतात.अर्थात याला अपवाद असतील,आहेतही.शेवटी प्रखर हिंदू राष्ट्रवादातून भारत विश्वगुरु म्हणून उदयाला येत असताना साहित्यिकांचाही खारीचा वाटा महत्वाचा वाटत असेल तर एकूण मराठी साहित्या विषयी चर्चा होऊ देत.अशा चर्चेतूनच एप्रिल मधे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वरुप काय असेल ते ठरवता येईल असे वाटते.संमेलनाचे व्यासपीठ फक्त हिंदू धर्मद्वेष्ट्या डाव्यांना आम्ही कसे नामोहरम करण्या पुरतेच वापरले जाऊ नाही.संघटनात्मक अहंकार इतकेही टोकदार होऊ नयेत की एकमेकांना जखमी करण्यात सर्व शक्ती खर्च व्हावी.संघ विचारसरणीतही हे बसत नाही.समरसता साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर डाव्या विचारसरणीच्या साहित्यिक,विचारवंतांना मुद्दाम पाचरण केले जाते.त्यांना आपले विविध सामाजिक क्षेत्रात सुरु असलेले कार्य समजावून दिले जाते.त्यांनाही ते पटते.त्यांचे मन:परिवर्तन व्हायला वेळ लागेल पण ते होणारच नाही असे नाही.शेवटी हा समाज,हे राष्ट्र पुढे जावे असे वाटत असेल तर डावे आणि उजवे दोन्ही हात आवश्यक आहेत.असे झाले तर आणि तरच आपण आपले उद्दीष्ट गाठू शकू.अन्यथा आपापसात भांडून डोकी फोडून घेण्या पलिकडे काहीही घडणार नाही.असो.
- रमेश वाकनीस 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७