फोडून टाकलेली मूस
एकांकिका : फोडून टाकलेली मूस
-----------------------------------------
लेखक : रमेश यशवंत वाकनीस
--------------------------------------
( रंगमंचावर अंधुक प्रकाश.संवाद ऐकू येतात-' जराही पर्स धरा..थॅंक्यू..' मग कुलूप उघडल्याचा आवाज.दार उघडून ती आत येते.उजव्या हाताने भिंतीवरचे बटण दाबते.एका जुन्या चाळीतली खोली उजळते.तिच्या बरोबर आलेला तो बाहेरच उभा.हातातली पर्स धरुन अवघडल्यासारखा)
ती : द्या ती पर्स.. हं..( पर्स घेऊन टेबलवर ठेवते. तो पायातले बूट काढताना बघून- ) घरात येऊन काढा बूट- ती खुर्ची घ्या ओढून-
तो : ( खुर्चीत बसून बूट काढता काढता ) खरं तर आपण लाॅजवर पण जाऊ शकलो असतो आपण उतरलो त्या स्टाॅप समोरच होतं लाॅज..
ती : एक तर ते माझ्या घरा जवळच दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली लाॅजच्या रुममधे पण छुपे कॅमेरे लावलेले असू शकतात..
तो : पाॅइंट आहे हं..एक करता भलतंच काहीतरी होऊन बसायची भिती..
ती : हो ना.बस वेळेत मिळाली म्हणून लवकर पोहोचलो.नाहीतर रोज अकरा वाजतात रात्रीचे..
तो : खरंच की,दहा वाजतायत फक्त..( ती दाराला कडी घालते. तो खोली नीट न्याहळत
गुणगुणतो. ' हम तुम एक कमरेमे बंद हो और चावी खो जाये )
ती : घाबरु नका..इथे कुठे छुपा कॅमेरा नाही लावलेला-
तो : तसं नाही हो..तुमच्यासारखी वेल एज्युकेटेड स्त्री इतक्या जुनाट चाळीतल्या एका खोलीत कां राहतेय असा प्रश्न पडला.डाॅ.सुजयच्या हाॅस्पिटलमधे पगार पण चांगले आहेत तसे-
ती : बरोबराय पण री डेव्हलपमेंटची प्रोसेस सुरु झालीय म्हणून सोडत नाहीय.शिवाय ही खोली, ही चाळ,इथलं वातावरण,माझ्या बाबांना फार आवडायचं.मलाही आवडतं.कारण माझा जन्म, बालपण, शिक्षण सगळं इथेच झालं.या खिडकीत उभं राहून बाबा माझी वाट पाहायचे.मी दिसले की त्यांचा जीव भांड्यात पडायचा..
तो : ( खोलीत फिरताफिरता रंगमंचाच्या मध्यभागी उभा राहून प्रेक्षक आणि रंगमंच यांच्या मधे असलेल्या अदृश्य भिंतीकडे पाहात- ) या भिंतीवर हा पडदा कां लावलाय?- इथं खिडकी आहे की-
ती : खिडकी होती.बाबा इथे उभे राहायचे,माझी वाट पाहात..मी कुठेही गेलेली असो..शाळेत,क्लासला कुठेही..माझा पाय घरात पडत नाही तोवर चैनच पडायचं नाही त्यांना..बाबा गेल्या नंतर मी ती बुजवून टाकली..
तो : पण मग त्या खिडकीचा पडदा कां तसाच ठेवलाय?
ती : ठेवलाय.
तो : कां पण?
ती : रात्री झोपण्यापूर्वी मी तो पडदा सारते.बाबांना डोळे भरुन पाहते,साठवून घेते.मग झोपी जाते..
तो : ( स्त:शीच ) विचित्रच आहे..!
ती : काही म्हणालात तुम्ही?
तो : काही नाही..काही नाही..( समोर पाहात ) हा पडदाऽऽ
ती : छान आहे ना?
तो : सुंदरच आहे पण..बरं,कुठे सर्व्हिसला होते तुमचे बाबा?
ती : एका खाजगी कंपनीत होते.पगार जेमतेमच होता पण त्यांनी मला,आईला कधी काही कमी पडू दिलं नाही.त्यांची उणीव जाणवते क्षणोक्षणी- पण ते जाऊ दे.आपण काॅफी घेऊया मस्त पैकी..
तो : नको.मला अर्ध्याएक तासात निघायला पाहिजे.बाकी काही नको-( तो बोलत बोलत दिवाणाच्या पाठीला टेकून बसलाय )फक्त--तुम्ही इथे या अशा माझ्या जवळ-
ती : चेंज करते न् येते.( गाऊन घेऊन न्हाणीत जाते.पडदा सरकवते.तेवढ्यात फोनची रींग वाजते.)
ती : जरा फोन बघता का कुणाचा आहे?-
तो : (टेबलवरचा फोन बघून) निकेत फोटोज्..
ती : द्या इकडे.(ती पडदा थोडा बाजूला करते आणि-)कुठल्या चार फोटोचं बील?-आं?-तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही कां?-मी फक्त एक फोटो एन्लार्ज करायला दिला होता आणि त्याचं बील तुम्हाला दिलेलं आहे..पुन्हा फोन करु नका आणि..(त्याच्या हातात फोन देते.तो फोन टेबलवर ठेवतो)
तो : (फोन टेबलवर ठेवून)-वाॅशरुम काॅमन आहे कां?
ती : हो.बाहेर पडलात की डाव्या बाजूनं सरळ साताठ घरं सोडली की लगेचच आहे.या जाऊन-
( प्रकाश योजना बदलते.तो स्पाॅटमधे.फोनवर बोलतोय..मित्राशी.इथे दुसऱ्या बाजूच्या स्पाॅटमधे मित्र दिसतो.)
तो : हां पक्या-
पक्या : कळलं.उशीर होणार आहे( हसत हसत ) नवीन पाखरू गाठलेलं दिसतंय..च्यायला सुधरायचा नाहीस..
तो : गपय,गप-
पक्या : गप तर गप..
तो : आणि पाखरू मी गाठलेलं नाही.पाखरानंच मला गाठलंय-
पक्या : तुला पाखरानं गाठलंय?- तुला?
तो : होऽय.-
पक्या : आत्ता कुठायस तू ?
तो : पाखराच्या घरट्यात..
पक्या : मूर्ख आहेस कां तू? कुणा बरोबरही कुठेही जातोस कां? कसली बाई आहे कुणास ठाऊक..
तो : अरे एका वेगळ्याच अनुभवातून जातोय.सांगतो तुला नंतर सगळं.
पक्या : अनुभव कसले घेतोयस एखाद दिवशी गोत्यात येशील साल्या-
तो : नाही येत..ठेव आता फोन..
पक्या : ठेवतो पण मला काय वाटतं माहिताय कां,तू आता लग्न करुन टाक.म्हणजे ही तुझी थेरं आपसूक बंद होतील- चाळीशी आली की लेका आता-
तो : कळलं,कळलं.( फोन बंद करतो )
( खोली उजळते.तो रुममधे प्रवेशतो.ती गाऊनमधे.केस मोकळे सोडलेले.तिला पाहून थबकतो.आपादमस्तक न्याहाळत- ) व्वाह..! फार सुंदर दिसताय..! खरंच..!
ती : असे किती वेळ पाहात बसणार आहात?- बघा हं प्रेमातबिमात पडाल माझ्या-
तो : प्रेमात पडलोच आहे पण बंधनात नाही पडणार हे नक्की.
ती : खरंच?
तो : खरंच.आनंदी जीवनाचा आपला साधासोपा फंडा आहे.भरपूर पैसा आणि स्त्री सुख..! ( घड्याळ बघून ) बाप रे..! साडेदहा..!साडेअकरा पर्यंत निघावं लागेल हं मला-
ती : काय घाई आहे..मी तर म्हणते आज घड्याळ बघूच नका तुम्ही-
तो : घड्याळ बघू नको?
ती : मी आहे ना समोर? मग घड्याळ कशाला बघायचं?
तो : ( मनापासून हसतो ) अगदी बरोब्बर बोललात..म्हणूनच म्हणतो या आता वेळ घालवू नका..
ती : आधी काॅफी घेऊया गरम गरम?
तो : काॅफी?
ती : कां? काॅफी आवडत नाही?
तो : आवडते पण..
ती : घ्या थोडीशी बरं वाटेल.
तो : नको.खरंच नको.काय आहे की..
ती : थोडी घेतलीय मी.. ( असं म्हणत हसू लागते )
तो : एक बिझनेस मिटिंग होती त्यामुळे..
ती : चालायचंच हो..कारण काहीही असलं तरी ड्रींक्स घेऊन मस्त आहात हे महत्वाचं...चला आता अजून मस्त होऊ.. ( पर्समधून क्वार्टर काढून दाखवते ) रम आहे.चालेल नं?
तो : ( खूष होत ) बाय आॅल मीन्स..
ती : मग आता तो जर्कीन,शर्ट काढून तिकडे हॅंगरला लावा आणि जरा ऐसपैस बसा-
( मंद पार्श्व संगीत.ती दिवाणा जवळचा टिपाॅय पुढे ओढते.किचन टेबलवरचे ग्लास आणून पेग भरते )
ती : घ्या-
तो : यस..
( दोघेही चिअर्स म्हणत एक घोट घेतात )
ती : कसं वाटतंय?
तो : वेगळंच वाटतंय
ती : वेगळंच म्हणजे?
तो : म्हणजे बघा ना- आपली बसमधे नजरानजर काय होते,तुम्ही मला चक्क फ्लाईंग किस देऊन तुमच्या सीटवर बोलवून काय घेता आणि-
ती : स्वत:च्या घरी न जाता तुम्ही या चाळीतल्या माझ्या खोलीत काय येता..
तो : सगळं अजबच..
ती : अजबच म्हटलं पाहिजे कारण मलाही वाटलं नव्हतं तुमची माझी इतक्या लवकर भेट होईल-
तो : म्हणजे? मला नाही कळलं..
ती : खूप दिवसांपासून वाटत होतं एक न् एक दिवस आपण असे निवांत भेटणार..
तो : म्हणजे या आधी आपण कधी भेटलो होतो कां?
ती : हो.
तो : कुठे?
ती : इमॅजिनेशनमधे?
तो : (न कळून) काऽय?
ती : सांगते.तुम्हाला लाॅ आॅफ अॅट्रॅक्शन विषयी काही माहिताय?
तो : थोडं फार.पण त्याचा इथे काय संबंध?
ती : सांगते.- तुम्ही एम आर आहात-
तो : हो.पण-
ती : सुजय हाॅस्पिटलमधे गेल्या चारपाच वर्षात किती वेळा आलात?
तो : हार्डली चारपाच वेळा.डाॅ.सुजय माझा क्लायंट कमी आणि मित्र जास्त त्यामुळे येणं होतं अधूनमधून तिथे.तुम्ही-
ती : मी मेट्रन आहे तिथे.
तो : पण आपली भेट झाल्याचं आठवत नाही मला तरी..
ती : नाही कशी? झाली होती एकदा भेट
तो : असेल-
ती : नोव्हेंबर महिन्याचा पहिला सोमवार होता.तुम्ही त्या दिवशी निळी जीन पॅन्ट,त्यावर स्काय ब्लू फुलशर्ट आणि जीनचं जाकीट घातलं होतंत.खूप हॅण्डसम दिसत होतात तुम्ही..!
तो : तुमच्या एवढं सगळं लक्षात आहे?
ती : - त्या दिवशी रिसेप्शन काऊंटरपाशी माझ्या काही कामासाठी उभी होते.रुही यायची वाट बघत होते.इतक्यात तुम्ही आलात.रुहीच्या जागेकडे पाहात तुम्ही खुणेनंच विचारलंत.मी म्हटलं,येईल दहा मिनिटात.काही काम आहे कां?- तसं तुम्ही म्हटलात डाॅ.सुजयला भेटून घेतो.तिला सांगा आल्यावर.माझ्या हातात तुमचं व्हिजिंटींग कार्ड देऊन तुम्ही सरळ डाॅक्टरांच्या रुमकडे निघून गेलात..तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी कितीतरी वेळ पाहात राहिले.काहीतरी हरवलं होतं ते गवसलंय.आता हे निसटू द्यायचं नाही हातातून..हे आपलं आहे मिळालंच पाहिजे आपल्याला असंच वाटत राहिलं..
तो : बरं मग?
ती : त्या दिवसापासून एकही दिवस असा गेला नाही की मी तुम्हाला विसरलेय..
तो : शक्य आहे.तरी पण लाॅ आॅफ अॅट्रॅक्शनचा इथे काय संबंध?
ती : ऐका ना- तुम्हाला पाहिलं आणि वाटलं इतके दिवस आपण ज्याच्या शोधात होतो तो हाच...आपल्याला हवं ते सगळं सगळं हाच आणि हाच देऊ शकेल..
तो : ( जोरात हसतो )
ती : हसायला काय झालं?
तो : साॅरी,तुमच्या भावनेचा अनादर नाही करायचा मला पण मला हे सगळं नाटकी वाटायला लागलंय...कुठलं ते गाणं आहे बघा.. परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या-
ती : तुम्ही नाटकी म्हणालात तरी मला हवा होता तो राजकुमार स्वप्नात नाही तर प्रत्यक्ष समोर उभा होता माझ्या.त्याला गमावण्याची कल्पना माझं मन करुच शकत नव्हतं.त्या दिवसांपासून मनाला एकच छंद लागला..
तो : ( घड्याळ पाहात जांभयी देत ) सारखा काळ चालला पुढे..
ती : काय म्हणालात?
तो : काही नाही,काही नाही..तुम्ही बोला मी ऐकतोय.. ( ग्लास उचलून एक घोट घेत )
ती : तुमचा चेहरा समोर आणून त्याकडे एकटक पाहात..मी तुमच्याशी बोलायची..आपल्या भेटींची चित्र रंगवत बसायची..आपण दोघं बागेत हातात हात घालून फिरतो आहोत..कधी हाॅटेलमधे एकत्र काॅफी पितो आहोत..एकांतात तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटून मी बसले आहे..माझ्या केसातून तुम्ही हलकेच हात फिरवताय.. मधूनच माझी हनुवटी उचलून माझ्या डोळ्यात डोळे मिसळून तुम्ही मंद स्मित करत पाहात राहताय..मग अत्त्यानंदानं तुमच्या छातीत डोकं घुसळून मी म्हणतेय,' नको,नको रेऽ वेडी होईन मी अशानं..'
तो : तुम्ही हे काय बडबडताय? तुम्ही,तुम्ही प्रेमात पडलायत माझ्या?- लव्ह अॅट फर्स्ट साईट..!! मूर्खपणा आहे हा,मूर्खपणा..!!
ती : प्रेमात पडण्यात कसला आलाय मूर्खपणा?
तो : मूर्खपणा नाही तर काय?प्रेमात पडण्यासाठी आधी ओळख व्हावी लागते मग मैत्री..मग..
ती : असं काही नसतं.निदान मला तरी असं स्टेप बाय स्टेप जाण्याची गरज वाटली नाही.मी पाहता क्षणीच तुमची होऊन गेले.मनानं तुमच्याशीच बोलू लागले.त्यावेळी लाॅ आॅफ अॅट्रॅक्शन विषयी मला काहीच माहीत नव्हतं.ते वाचनात आल्या नंतर कळलं की आपण अगदी त्या थिअरी प्रमाणेच वागतो आहोत.मग अधिक जोमानं आणि आत्मविश्वासानं मी तुमच्या बरोबरच्या सहजीवनाची चित्रं रंगवू लागले..जी चित्रं मी रंगवत होते ती प्रत्यक्षात येण्याची संधी अशी दैवानं माझ्या पुढ्यात आणून दिलीय..आता मी ही संधी सोडणार नाही.
तो : ( टाळ्या वाजवत किंचित उपहासाने ) व्वाह..! एखाद्या नाटकात खिळवून ठेवणारं स्वगत यावं तसं वाटलं बघा खूप छान.. विशेषत: शेवटचं वाक्य तर फारच आवडलं.मी पण ही संधी सोडणार नाही..तो दिवा विझवा आणि या आता अशा इथे-
ती : येते पण एका अटीवर-
तो : अट?
ती : तुम्ही,तुमचं शरीर,मन कायमचं हवंय मला.
तो : कायमचं? डोकं ठिकाणावर आहे कां तुमचं? एखाद्या काॅलगर्ल सारखं मला इथे घेऊन आला आहात तुम्ही हे लक्षात ठेवा..
ती : बरोबर बोललात.काॅलगर्ल सारखंच घेऊन आलीय मी तुम्हाला इथे.पण याचा अर्थ असा होत नाही ना की मी काॅलगर्लच आहे?
तो : तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय कां?
ती : कळतंय.म्हणूनच मी तुम्हाला इथून सहजासहजी जाऊन देणार नाही.
तो : जाऊ देणार नाही म्हणजे? असं कुणी कुणाला बांधून ठेवू नाही शकत.माझ्या बाबतीत तर ते अशक्यच आहे.तुमचं प्रेमपुराण तुमच्यापाशीच ठेवा.मला काही घेणं नाही त्याच्याशी.चला मी निघतो- ( उठून हॅंगरला लावलेला शर्ट घालू लागतो.ते पाहून ती उठते.तो शर्ट इन करताना पाहात राहते.तो जर्कीन अडकवतो.ती पुढे होऊन त्याची वाट अडवते. )
ती : नाही जायचं-
तो : कां?
ती : कां काय? मी म्हणतेय म्हणून नाही जायचं..
तो : कां पण ?
ती : मर्जी माझी-
तो : तुमच्या मर्जीनं वागायला मी काय वेडा आहे कां? ( जाऊ लागतो.ती पुन्हा त्याला अडवते )
ती : तुम्ही वेडे नाही आहात.पण मी वेडी झालीय तुमच्यासाठी त्याचं काय?
तो : काहीतरी बोलू नका- ( परत तिचे हात झटकून जाऊ लागतो )
ती : रागावलात?
तो : रागावू नको तर काय करु?
ती : ( दोन्ही हात गळ्याभोवती टाकत ) प्रेम करा..!
तो : ( तिचे हात सोडवून मागे सरकतो. ) प्लीज माझी वाट अडवू नका.जाऊ दे मला-हात जोडतो पण-
ती : ( त्याचे हात धरुन ) थांबा ना- प्लीऽज माझं ऐकून घ्या पूर्ण-
तो : मला काहीही ऐकायची ईच्छा नाही ( तिच्या हातातले हात सोडवून घेत ) सोडा मला-
ती : ( परत लगट करत ) नाही सोडणार
तो : उगाच लाडात येऊ नका त्याचा काहीही उपयोग होणार नाही ( जाऊ लागतो )
( ती परत त्याची वाट अडवते.तो डाव्या उजव्या बाजूने सटकायचा प्रयत्न करतो.शेवटी दोन्ही हातांनी ती त्याला मागे ढकलते.काॅलर धरुन त्याला तसेच दिवाणा पर्यंत आणते आणि बसवते.ग्लास त्याच्या समोर धरते )
तो : नकोय मला.
ती : घ्या.थोडीच राहिलीय संपवून टाका
तो : नकोय म्हटलं ना-
ती : मुकाट्यानं बाॅटमप करा म्हणजे दुसरा पेग भरते..
तो : ( स्वत:शीच ) च्यायला आलो कशासाठी न् घडतंय काय.. ( ग्लास ओठाला लावून एका घोटात रिकामा करतो.ती दुसरा पेग भरते.त्याकडे बघत थोडं गोडीत- ) एवढा एक पेग झाला की आपलं महत्वाचं काम करायचं कां?
ती : घ्या-
तो : मी काय म्हटलं आलं ना लक्षात?
ती : काय घाई आहे...
तो : तुम्हाला नसेल घाई पण मला आहे..
ती : मला काय वाटतं माहिताय कांऽ
तो : आपण पुढच्या तयारीला लागू- तुम्ही जरा उठता कां?- ही चादर आपण जरा नीट अंथरु..
ती : अंथरु अंथरु..देह,मन, प्राण,सगळंच अंथरायचंय..चादरीचं काय घेऊन बसलात..
तो : काय भयंकर बोलता हो तुम्ही.. देह,मन,प्राण.. अंथरायचाय..!!
ती : यात भयंकर काय? शरीर सुख भयंकर असतं कां?
तो : शरीर सुख भयंकर नसतं,तुमचं वाक्य,वाक्य भयंकर वाटलं मला..
ती : बरं,मी काय म्हणते-
तो : काही म्हणू नका.माझं ऐका, वर्तमानकाळात या- ती भविष्याची स्वप्नं..प्रेमाराधन..लग्न..त्यातून निर्माण केली जाणारी नातीगोती..भूतकाळातले बरे-वाईट अनुभव सगळं सगळं झूठ असतं..
ती : झूठ कसं असेल? आपला भूतकाळ आपल्या वर्तमानकाळाची नोंद असते..आणि वर्तमानकाळात आपण आपले भविष्य घडवीत असतो-
तो : मान्य.पण या विषयावरच बोलत रात्र घालवायचीय कां आपल्याला?
ती : नाही- तरी पण एक प्राॅमिस मला तुमच्याकडून हवंय..
तो : प्राॅमिस मी कधीच कुणाला देत नाही,देणार नाही.बायकांच्या बाबतीत तर नाहीच नाही-
ती : प्राॅमिस नका देऊ- एक हट्ट पुरवा माझा..
तो : हट्ट?
ती : हो.हट्टच..
तो : हे आता आणखी काय नवीन?
ती : थांबा- (उठून किचन टेबलकडे जाता जाता ) तुम्ही ते ग्लासबीस सगळं उचलून न्हाणीच्या कट्ट्यावर ठेवा.टिपाॅय होता तसा दिवाणा जवळ ठेवा.. तोवर मी..( टेबलाचा खण उघडते.एक छोटी पर्स काढून त्यातली छोटी डबी उघडून मंगळसूत्र काढून त्याच्या समोर धरते.. ) हे माझ्या गळ्यात घाला..
तो : मंगळसूत्र?... छे,छे...! आज पर्यंतच्या आयुष्यात मी कधीच कुणाच्या गळ्यात मंगळसूत्र नावाचा प्रकार घातलेला नाही.घालणार नाही.
ती : माझ्या गळ्यात घालाल.
तो : अजिबात नाही.
ती : घालाल.
तो : नाही घालणार.
ती : नक्की?
तो : नाही,नाही,नाही..! डोकं आऊट व्हायची पाळी आलीय.मी तुमच्या पाया पडतो.तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. पण मला नका अडकवू तुमच्या मोहपाशात.मी खरंच चांगला माणूस नाहीय...
ती : मी तुम्हाला कुठल्याही मोहपाशात अडकवत नाहीय..आणि तुम्ही चांगला माणूस नाही आहात हे कुणी सांगितलं तुम्हाला?- कां तुमचं तुम्हीच ठरवलंत?
तो : आपण कसे आहोत ते आपल्यालाच जास्त माहित असतं ना-
ती : बरोबराय,पण मग मला सांगा,आज पर्यंत आमच्या हाॅस्पिटलमधे अॅडमिट झालेल्या गरीब रुग्णांची बीलं तुम्ही कांं भरत असता?- थंडीच्या दिवसात मध्यरात्री रस्त्याकडेला झोपलेल्या माणसांच्या अंगावर ब्लॅंकेट्स तुम्ही कां टाकता?- वाईट आहात म्हणून?- बोला की..
तो : ( हसत हसत )तुम्हाला हे सगळं रुहीनं सांगितलेलं दिसतंय आणि एवढ्यावरुन तुम्ही मला देवमाणूस ठरवून मोकळ्या झालात?-
ती : अजिबात नाही.माणूसकीशी घट्ट ईमान असलेला माणूसच असा वागू शकतो एवढंच लक्षात आणून द्यायचं होतं मला-
तो : तुम्ही कां उगाच माझी शाळा घेताय?मी तुम्हाला कितीही आवडलो असलो तरी मला तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं नाही.विषय संपला.
ती : असा बरा विषय संपेल? मी संपू दिला पाहिजे ना-
तो : माझं ऐका,मी एक वेडपट, विक्षिप्त,बाईबाज आणि तुसडा माणूस आहे..माझ्या नादाला लागू नका- मला जाऊ द्या..( उठायला लागतो )
ती : अजिबात हालायचं नाही इथून.बसा खाली.बसा म्हणते ना-
तो : ही काय जबरदस्ती आहे? मला नाही थांबायचं इथे- हे पहा,तुमच्या शरीराच्या ओढीनं मी आलो हे चुकलं माझं.मला माफ करा..
ती : माफ करा काय?- तुम्हाला शरीराची ओढ आहे.मला नाहीय कां?
तो : अहो पण त्यासाठी तुम्ही भलताच हट्ट धरताय जो मी नाही पुरवू शकत.नाही प्रामाणिक राहू शकत मी कुणाशी..कळत नाहीय कां तुम्हाला?
ती : कळतंय.सगळं कळतंय.पण वळत नाही त्याचं काय?- माझं शरीर काय माझं मनही तुमचंच होऊन बसलंय..म्हणून म्हणते माझा एवढा हट्ट पुरवा.नाही म्हणू नका.मग मी तुमच्याकडे कधीच काही मागणार नाही.फक्त देत राहीन तुम्हाला हवं तेंव्हा हवं तितकं..
तो : ( स्वत:शीच )च्यायला..मान न मान मै तेरा मेहमान..!- मी ना,मी यायलाच नको होतं तुमच्यामागे.मला तुमच्या हेतू विषयीच शंका यायला लागलीय आता.बोला काय हवंय काय तुम्हाला माझ्याकडून?
ती : काही नको.माझं सर्वस्व तुम्हालाच अर्पण करायचंय मला,फक्त हे एवढं माझ्या गळ्यात घाला-
तो : आता मला माझंच शरीर-मन नकोसं वाटायला लागलंय.आज पर्यंत इतक्या स्त्रिया आल्या आयुष्यात...शरीर दिलं घेतलं..विषय संपून जायचा पण इथं- ( एकदम उसळून ) तुम्ही,कां,कां गळ्यात पडताय माझ्या?- काय पाहिलंत काय तुम्ही माझ्यात?
( ती त्याचा हात धरुन ओढतच रंगमंचाच्या मध्यभागी आणते.प्रेक्षकांच्या समोरच्या अदृश्य भिंतीवरचा पडदा दूर सारते तो ' आ ' वासून बघत राहतो. त्याला प्रचंड धक्का बसलेला.पार्श्व संगीत ऐकू येत राहते.काही क्षण )
तो : हा- हा माझा फोटो तुमच्या घरात?- खरं सांगा.माझा फोटो तुम्ही कधी काढलात आणि या भिंतीवर एन्लार्ज करुन लावलात-
ती : मूर्खा सारखं बोलू नका. हा माझ्या वडिलांच्या पोर्ट्रेटचा फोटो आहे-
तो : काय?- तुमच्या वडिलांच्या पोर्ट्रेटचा फोटो? काय डोकंबिकं फिरलंय कां तुमचं?हा माझा फोटो आहे-खरं सांगा,असे फोटो काढून किती जणांना तुमच्या जाळ्यात ओढलंयत? बोला- किती जणांना ब्लॅकमेल करत आलायत आत्ता पर्यंत?
ती : उगाच भलतेसलते आरोप करु नका.माझ्या बाबांच्या पोर्ट्रेटचाच फोटो काढून, फ्रेम करुन मी इथे लावलाय-
तो : तुम्ही काहीही सांगाल आणि मी त्यावर विश्वास ठेवीन असं वाटलं कां तुम्हाला?- थांबा, पोलिसांनाच फोन करतो.म्हणजे बरोब्बर खरं
बोलायला लागाल तुम्ही-( खिशातून फोन काढून फोन करु लागतो.ती फोन हिसकावून घेते ) माझा फोन द्या-
ती : नाही देणार..
तो : फोन द्या.
ती : आधी मी काय म्हणते ते ऐकून घ्या-
तो : मला तुमचं काहीही ऐकायची ईच्छा नाही.माझा फोन द्या-
ती : आधी माझा हट्ट पुरवा मग देईन फोन-
तो : बऱ्या बोलानं फोन द्या नाही तर-
ती : नाही तर काय?
तो : मी काहीही करु शकतो-
ती : मग करा- घ्या हिसकावून माझ्या हातातून फोन ( तो फोन हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतो.ती फोन एकदा वर एकदा खाली एकदा मागे करत राहते.शेवटी तो हताश होऊन बसतो ) कां हो?- हरलात एवढ्यातच?काहीही करु शकता नं तुम्ही? मग करा- घ्या फोन हिसकावून-
( *तो काही क्षण तिच्याकडे पाहात राहतो.दोघे काही क्षण फ्रीझ.आता इथून पुढचं दृशय 'तो' च्या कल्पनेतलं आहे.तो संतापाने एकदम उसळून उभा राहतो-
तो : ' मला चॅलेंज देतेस? मला?-बघतोच तुझ्याकडे आता.(अंगावर येणाऱ्या पार्श्व संगीताच्या तालावर.दोघांची झटापट सुरु होते.तो हळूहळू हिंस्त्र होत चाललाय.ती पण तितक्याच ताकदीने त्याला खेळवतीय.अशा वेळेला जे शब्द,जे संवाद उत्स्फूर्तपणे येतील ते येऊ द्यावेत.एका क्षणी तो तिचा हात पिरगाळतो.)
ती : हात सोडा माझा- आॅऽयऽ
तो : मी काय करु शकतो ते पाह्यचंय नं तुला? ( हात आणखी जोरात पिरगाळत-) काय करशील? ओरडशील?-मग ओरडच आता.होऊ दे सगळी चाळ जमा-
ती : (ओरडते) वाचवा,वाचवा..मला..
(तो तिच्या हातातून मोबाईल घेऊन ढकलतो.ती खाली पडते. बाहेरुन दरवाजा ठोठावल्याचा आवाज येतो. पाठोपाठ शब्द कानावर पडतात- आवाज: दार उघडा..काय चाललंय काय? झोपू देता कां नाही लोकांना?- दार उघडा-
आवाज : सरळ फोन करुन पोलिसांना बोलवून घ्या-)
( प्रकाश योजना बदलते.तो आणि ती पुन्हा पहिल्या पोझिशनमधे-फ्रीज*)
ती : कां हो?- हरलात एवढ्यातच? काहीही करु शकता नं तुम्ही?- मग करा.घ्या फोन हिसकावून-
तो : ( हसतो ) तुम्ही काय मला दुधखुळा समजलात कां?- तुम्हाला काय वाटलं,तुमचं आव्हान स्विकारुन मी लगेच जाळ्यात सापडीन तुमच्या? अरे हट..!- खड्ड्यात गेला तो फोन.दुसरा फोन आहे माझ्याकडे..( खिशातून फोन काढू लागतो )
ती : ( हसत हसत )नुसत्या कल्पनेनंच तुम्ही इतके घाबरुन गेलायत की लगेच पोलिसांना बोलवायला निघालायत. पण मी घाबरत नाही.माझा हेतू शुद्ध आहे.घ्या तुमचा फोन.करा काय कंप्लेंट करायची ती माझ्या विरुध्द.पण त्या आधी- ( टेबलपाशी जाते.दोन अल्बम काढून- ) हे पहा,यात माझ्या बाबांचे फोटो आहेत.आणि हे ते त्यांच्या मित्रानं काढलेलं पेन्सिल पोर्ट्रेट आता खूपच जुनं झालंय पण..
तो : ( एकदा अल्बम मधले फोटो पाहून एकदा तिच्याकडे,एकदा भिंतीवरच्या फोटोकडे पाहात- ) हा खरंच तुमच्या बाबांचा फोटो आहे की आरसा आहे इथे? आणि म्हणून हा मला माझा फोटो वाटतोय?
ती : वेड्यासारखं बोलू नका,नीट पहा.माझ्या बाबांचाच फोटो फ्रेम करुन लावलाय मी-
( तो जवळ जाऊन पाहतो.मग सावकाश दिवाणावर येऊन बसतो.हातातले अल्बम दिवाणावर टाकून दोन्ही हातात डोकं धरुन बसतो.मग स्वत:शीच बोलल्यासारखं- )
तो : सारख्या चेहऱ्याची माणसं जगात असू शकतात असं वाचलं होतं,पण इतकी?
( दीर्घ..सुन्न शांतता )
ती : ऐन चाळीशीतच गेले ते-
तो : तुमची आई?़
ती : बाबांच्या आधी दोन वर्ष गेली.भाऊ,काका
मामा कुणीच नाहीत..
तो : पण हा फोटो..मी.. ( जवळ जाऊन बघतो.मग- )विश्वास बसत नाही.( खुर्चीत बसलाय.काही क्षण स्तब्धता )- तुम्ही माझ्यावर चेटूक केलंयत कां? की हा सगळा नजरबंदीचा खेळ आहे की- काय आहे तरी काय?
ती : मला नाही माहित.जे काही आहे ते तुमच्या समोर आहे.माझी एकच ईच्छा होती,मला माझ्या वडीलांसारखा जोडीदार हवा- मग ठरवलं लग्नच करायचं नाही.पण एक दिवस तुम्ही भेटलात..सारा मोहरा फिरुन गेला..! मग तुमचाच ध्यास,तुमचीच कल्पनाचित्रं..! तुमच्याशीच गूजगोष्टी..! आज त्या चित्रांवर तुम्हाला शेवटचा हात फिरवायचाय.त्या साऱ्या
गुजगोष्टीत तुम्हाला तुमच्या प्रेमाचे वात्सल्याचे रंग भरायचेत.तुमच्या स्पर्शाचा कुंचला फिरल्या शिवाय हे चित्र पूर्ण होणार नाही..! प्लीऽज नाही म्हणू नका.आज माझ्या बाबांची पुण्यतिथी आहे.मी बाबांना शब्द दिला होता.मिळाला तुमच्यासारखा कुणी तर करीन मी त्याच्याशी लग्न.तुमच्या एवढ्याशा कृत्यानं माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे..( मंगळसूत्र पुढे धरुन ) एवढं गळ्यात घाला माझ्या आणि खुशाल तुमच्या वाटेनं निघून जा.- या एका आठवणीवर सुखानं जगेन मी.प्लीऽज हात जोडते तुमच्या पुढे-
तो : ( सावकाश पुढे येतो.तिच्या हातातले मंगळसूत्र घेतो.त्याकडे पाहात खिन्न हसतो ) कळतंय.कळतंय खोटं आहे सगळं.पण तुम्ही खऱ्या आहात.तुमच्यापेक्षाही या खोट्या जगात येऊन तुम्ही ज्या निर्हेतूक प्रेमाचा,वात्सल्याचा शोध घेता आहात ते प्रेम वात्सल्य जास्त खरं आहे.मृत्यू एक दिवस ते सुध्दा खोटं ठरवेल ती गोष्ट वेगळी.पण ( तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून ) तोवर या अलौकिक मोहाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण नेहमीच सिध्द असलं पाहिजे.इथून पुढे वर्षातून एकदा याच दिवशी,अशाच रात्री मी स्वत: तुला भेटायला येईन.हा माझा शब्द. (तिला मिठीत घेतो.तिच्या डोक्यावरुन हात फिरवत पाठिवर थोपटत-)आता एक मुलगी आपल्या बाबांच्या कुशीत शांत झोपी जाणार आहे बरं..!!
( दोघे स्पाॅटमधे.हळूहळू अंधार होत असताना कवितेचे शब्द प्रेक्षकांच्या कानावर पडतात-
आता नाहीस तू पार्थिव,
अथवा अपार्थिव..
तू आहेस माझ्या लाडक्या लेकीच्या
गळ्यातली तहान..
एक अश्रू सुजाण..!!
सचेत क्षणांच्या पावलातला घुंगुर ठेका,
अचेतन प्रदेशातला उंच उंच झोका,
या दोहोमधून
बहरत जाणारी सृष्टी..
नव्यानं उघडलेली दृष्टी..
फोडून टाकलेली मूस..
तू बदलते आहेस कूस..!!!
( सावकाश पडदा )
*या एकांकिकेचा प्रयोग,अभिवाचन,वा अन्य माध्यमात करायचे असल्यास लेखकाची अनुमती घेणे अनिवार्य आहे.
© रमेश यशवंत वाकनीस
कामायनी सह.गृह संस्था,पेठ २५स घरांक ५०/२ सिंधुनगर,निगडी,पुणे ४११०४४
भटकबोल्या : ९०९६८००६५३
Comments
Post a Comment