श्री गुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
--------------------------------------
अध्याय ८ वा
कुरवपूरात श्रीपाद असताना पती-पत्नी दोघेही आत्महत्या करताना पाहतात.त्यांना जवळ बोलावून विचारपूस करतात.तेंव्हा पत्नी अंबिका आपले दु:ख कथन करते.तिला पुत्र होत पण जगत नसत.खूप व्रतवैकल्ये करुन एक पुत्र झाला पण तो मंदमती निघाला.मुंज झाल्यानंतरही हा पुत्र काहीच शिकला नाही.ब्राह्मणाचा मुलगा आणि शिकत नाही असे पाहून आईबाप दोघही जननिंदेचा विषय होतात.बाप मुलाने विद्याभ्यासात लक्ष घालावे म्हणून त्याला मारत असे.तिन्हीत्रिकाळ त्यामुलाला तू नर्मदेतला गोटा आहेस,तुला काही जमणार नाही..असे कटू बोल ऐकवत असत.ते अंबिकेला आवडत नसे.पण ती त्रागा दैवाला दोष देण्याशिवाय दुसरे काही करु शकत नसे.जननिंदेला कंटाळून शेवटी आत्महत्या करायचे निश्चित करतात.उभयतांचे दु:ख ऐकून ते तिला त्रयोदशीस प्रदोष पूजा कर.भगवान शंकराची आराधना कर असे सांगतात.असेच व्रत एका सामान्य गवळ्याने केले व ज्ञान व ऐश्वर्य प्राप्त केले या कथेचा दाखला देऊन त्या जोडप्याची श्रध्दा बळकट करतात.हे व्रत केल्यानंतर तिचा मुलगा ब्रह्मज्ञानी होतो.तिनही वेदात पारंगत होतो.
आठव्या अध्यायात आलेली ही कथा वाचल्यानंतर काही जणांना व्रतवैकल्ये करुन पुत्र होतात कां? ज्ञान व ऐश्वर्याचा माणूस धनी होऊ शकतो कां?- असा प्रश्न पडेल.पण नीट विचार केला तर व्रतवैकल्यां मागील मानसशास्त्र लक्षात येईल.एखादी गोष्ट हवी असेल तर तिचा ध्यास किंवा वेड लागल्याशिवाय ती मिळवण्यासाठी माणूस प्रयत्न करत नाही.श्रीपादयतींनी हे व्रत आणि त्यावर दृष्टांत कथा ऐकवून दोघा पतीपत्नींच्या निराशेने भरलेल्या मनाला सकारात्मक दिशा दिली.त्यामुळे प्रयत्न करण्यातला त्यांचा उत्साह वाढला.आजच्या युगात पालक शिक्षणात लक्ष नसलेल्या मुलाला कौनसेलरकडे घेऊन जातात.ते दुसरं काय करतात?- मुलाला नकारात्मक विचारांपासून परावृत्त करतात.व्रतवैकल्यांच्या मागे हेच मानसशास्त्र आहे.क्षेत्र भौतिक जीवनाचे असो किंवा अध्यात्मिक.माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा एखादा कौनसेलर,एखादा वाटाड्या म्हणजेच सद्गुरु हवाच.जो 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असे निश्चित आश्वासन देतो.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
*
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या:९०९०६८००६५३
Comments
Post a Comment