श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय ३० /३१ व ३२
-----------------------------
यात एका सुशील स्त्रीच्या रुग्ण पतीचा मृत्यू स्त्रीचा अनावर शोक आणि सद्गुरुंनी तिचे केलेले प्रबोधन हा भाग आहे.या जगात जो जन्मला तो मरणार हे अटळ सत्य आहे.हे लक्षात घेऊन जिवंतपणीच मृत्यूचे सतत स्मरण ठेवून आई-वडील,मुलेबाळे,पतीपत्नी,सासूसासरे,मित्र हे सारे घडीचे प्रवासी आहेत.माणूस या जगात एकटा आलाय आणि एकटाच जाणार आहे.आपला जन्म होतो आणि आपण समाजाशी,जोडले जातो.जगण्यासाठी एकमेकांना आधार देतो.पण यातला कुणीच आपल्याला मृत्यूपासून वाचवू शकत नाही.कुणीही आपले दु:ख भोगू शकत नाही.तरी पण माणसाला आप्तजनांचा फसवा आधार हवाहवासा वाटतो.या फसव्या आधारालाच तो प्रेम,माया,ममता,अशी नांवे देतो.मृत्यू हे सगळेच खोटे ठरवतो.अर्थात फसवा जरी असला तरी एका मर्यादे पर्यंत मानवी नाते संबंधाला एकमेकांच्या आधाराची गरज असतेच.पण मृत्यू पुढे सगळे तर्क खुजे,कुचकामी ठरतात आणि मग शाश्वत सत्याचा शोध सुरु होतो.चिरंतन सत्याचा ध्यास हेच खरे म्हणजे जीवनाचे मुख्य प्रयोजन आहे.क्षुद्र हेतूंच्या पूर्तीसाठी जगताना आपल्या हे लक्षात येत नाही.शोकमग्न स्त्रीच्या निमित्ताने सद्गुरुंनी सर्व भक्तांना भवसागर तरण्यासाठी मरायचे कसे हे शिकवले आहे.आपण शरीराने मेलेलेच आहोत अशी खूणगाठ बांधून व्यवहार करायला सुरुवात केली की जगणे सहज सोपे व आनंदाचे होते.असा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी संसारी उपासकाचा मुमुक्षु साधक व्हावा लागतो
अशा व्रतस्थ साधकालाच " आपुले मरण पाहिले म्या डोळा | जाला तो सोहळा अनुपम्य | " असे म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणूनच बत्तीसाव्या अध्यायातील पती जिवंत असताना व मेल्यानंतर स्त्रीचा आचारधर्म सांगितलाय तो शब्दश: न घेता त्यामागचा अध्यात्मिक अर्थ समजून घेतला पाहिजे.साधना पथावर साधक जेंव्हा सद्गुरुंना म्हणजे स्वत:लाच स्वत:चा पती आणि पत्नीच्या रुपात साक्षी भावाने पाहू लागतो तेंव्हा देहभाव प्रेतरुप होतो आणि आत्मचेतनेच्या तेजात दोघेही लय पावून फक्त एक महाप्रकाश फक्त शिल्लक राहतो.थोडक्यात शिव आणि शक्तीचे मीलन होऊन संपूर्ण सृष्टीत निरंतर सुरु असलेल्या सर्जन आणि विसर्जनाचा निर्हेतूक आनंद उत्सव साधक अनुभवत निजानंदात निमग्न होतो.स्त्री आचारधर्माच्या अध्यायाकडे अशा दृष्टीने पाहिले तर वाचक नसत्या शंका उपस्थित करणार नाहीत.असे जरी असले तरी नृसिंहसरस्वतींच्या सामाजिक व ऐतिहासिक परिस्थितीचा विचार केला तर मुस्लीम राजे, सरदारांकडून हिंदू स्त्री-पुरुषांवर होणारे अत्याचार,तलवारीच्या धाकावर केले जाणारे धर्मांतर हे प्रकार वाढू लागले असणार,त्यांनी उग्र स्वरुप धारण केले असणार व धर्मांतर करुन जिवंत मरण भोगण्यापेक्षा किंवा स्वत:ला विद्रूप करुन घेऊन जगण्यापेक्षा पती निधना नंतर या कथेतील स्त्री प्रमाणे चिता जवळ करणे हा एकच मार्ग तत्कालीन स्त्रियांपुढे शिल्लक राहिला असेल पुढे अशा कृत्यांचे उदात्ती करण करुन सतीची प्रथा सुरु सुरु झाली असणार असे म्हणता येईल.प्रथम जाज्वल्य धर्माभिमाना पोटी स्त्रिया हे दिव्य स्वत:हून करत होत्या पुढे त्याला धार्मिक रुढीचे स्वरुप आले.ही अनिष्ट प्रथा जवळजवळ पेशवाई पर्यंत चालू राहीली.त्यानंतर सती जाण्याची सक्ती नसली तरी केशवपन व सोवळ्यात राहण्याच्या प्रथेमुळे स्त्रियांचे आयुष्य म्हणजे जिवंतपणी मरण भोगण्यासारखेच होते.या गोष्टीला ईतिहास साक्ष आहे.आजच्या युगात कुणाही सूज्ञ व्यक्तीला हा अध्याय आक्षेपार्ह वाटला तर त्यात काहीच गैर नाही.पण अध्यात्मिक साधना पथावर कोणत्या दिव्यातून पुढे जावे लागते हे साधकाला कळावे म्हणून ग्रंथकाराने रचलेली ही एक बोधकथा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे इतकेच.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment