श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय ३६/३७
छत्तीसाव्या अध्यायात एक लोभी पत्नी आणि तिचा व्रतस्थ नवरा यांची कथा आहे.हा नवरा परान्न घेत नसे.पण गावात ब्राह्मण पती-पत्नींसाठी भोजनाचे आमंत्रण येते.आपल्या पतीच्या व्रतामुळे आपण सुग्रास अन्न खाण्यास मुकतो असे वाटून ती स्वामींना विनवते.स्वामी देखील पत्नीसह भोजनाला जा असे सांगतात.पण पंक्तीत जेवायला सुरुवात केल्या बरोबर प्रत्येक पानावर,कुत्री आणि डुकरे चरत असलेली तिला दिसू लागतात.ती पतीला व जमलेल्या साऱ्यांना तसे सांगते सगळी जोडपी अन्न त्याग करुन निघून जातात.अती लोभ मग तो अन्नाचा असो किंवा पैशाचा,सत्तेचा असो तो शेवटी माणसाची निर्बुद्ध पशूसारखी गत करतो.त्या पत्नीचा नवरा सद्गुरंकडे व्यथित अंत:करणाने येतो तेंव्हा तुझ्या लोभी पत्नीची वासना तू पुरवलीस त्याचा दोष तुला लागणार नाही.तुझ्या पत्नीचेही डोळे आता उघडलेत.मग अन्न कुठे,कधी,किती व कसे ग्रहण करावे याचे मार्गदर्शन स्वामी करतात.अन्न ग्रहण करण्याचे नियम सांगितलेत ते त्या काळातील सामाजिक परिस्थितीनुसार सांगितलेत.आजच्या काळानुसार विचार केला तर ते सर्व नियम काटेकोरपणे पाळणे अशक्य आहे.आरोग्याच्या दृष्टीने जेवढी पथ्ये पाळता येणे शक्य तेवढी पाळावी.काय आणि कुणाकडे जेवतो आहे या पेक्षा कसे जेवावे हे महत्वाचे आहे. प्रसन्न मनाने,अन्नाची स्तुती करत जेवल्याने ते बाधत नाही.यापुढच्या अध्यायात ब्राह्मणाचे आचार धर्म सांगितलेत.श्रीगुरुचरित्राचा काळ लक्षात घेतला तर लक्षात येते की मुगल संस्कृतीच्या आक्रमण होत असताना ज्या ब्राह्मण वर्गाने अज्ञ जनांचे प्रबोधन करायचे तो ब्राह्मण वर्ग मुगलांचे लांगुलचालन करण्यात गुंतला होता.त्यामुळे त्या वर्गाचे प्रबोधन करुन त्यांच्यातील धर्माभिमान क्षात्रतेज यांचे जागरण करणे अत्यंत आवश्यक होते.नृसिंहसरस्वतींनी याच कार्याचा ध्यास घेतला होता.दुसरे असे की वर्णाश्रम व्यवस्था ही जन्मानुसार नव्हती तर गुणकर्मानुसार होती.आजच्या भाषेत सांगायचं तर ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य,शूद्र या सायन्स,काॅमर्स,सारख्या विद्या शाखा होत्या.कोणतीही व्यक्ती कोणत्याही शाखेचे ज्ञान संपादन करु शकत होती.हे सगळे लक्षात घेतले तर श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ ब्राह्मण प्रधान कां आहे हे सहज समजेल.असो.या सर्व आचार धर्माचे सार एवढेच की मनुष्य जन्मात जगण्याला एखादा उदात्त हेतू देऊन ,एखादे उच्च ध्येय उरी बाळगून त्यासाठी हयात वेचावी.त्या कार्याचे क्षणभरही विस्मरण होणार नाही अशी दिनचर्या ठेवावी.ब्राह्मो मुहूर्तापासून अंथरुणाला पाठ टेके पर्यंत शरीर आणि मन स्वकल्याणा प्रमाणे परकल्याणासाठी झिजवावे.सतत उद्यमशील राहावे.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment