श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय ४ था
हे संपूर्ण विश्व कसे अस्तित्वात आले या संबंधीच्या वेगवेगळ्या सुरस कथा जगाच्या पाठीवरील प्रत्येक धर्मग्रंथात सांगितलेल्या आहेत.गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायातही विश्वाच्या उत्पत्तीची कथा आहे.आधी सर्वकाही जलमय होते.त्यातून एक तप्तगोळा निर्माण झाला.त्याची दोन शकले झाली.एक पृथ्वी आणि दुसरे आकाश.त्यातून ब्रह्मा उत्पन्न झाला व त्याने संपूर्ण सृष्टी निर्माण झाली.या कथेमधून लक्षात येते ते इतकेच की सूक्ष्मातून डोळ्यांना दिसणारे हे स्थूळ विश्व अस्तित्वात आले.स्थूळ जगाचे चलनवलन सूक्ष्म जगातील चेतन तत्वांमुळे अव्याहत चालू आहे.पुढे अत्री व अनसुयेच्या पोटी दत्तात्रयांनी जन्म घेतल्याची जी कथा आहे ती काल्पनिक असली तरी अत्यंतिक निष्ठा असलेल्या भक्तांनाच दत्तगुरुंचे दर्शन होते, परमात्म्याचा साक्षात्कार होतो हे सत्य अधोरेखित करते. मातेच्या गर्भात असताना सूक्ष्म रुपात असताना जीव शुध्द पवित्र असतो.स्थुळ देहाच्या संपर्कात आल्यावर काळ व कामक्रोधादी विकारांच्या तडाख्यात सापडतो.बाह्य जग व अंतर जग यांच्यात संघर्ष सुरु होतो.या संघर्षाला सामोरे जाऊन सत्व,रज,तम,गुणांकडे समत्व बुध्दीने कसे पाहायचे व आपल्या शुध्द स्वरुपात राहून आनंदमय जीवन जगण्याची कला कशी आत्मसात करायची याची शिकवण देण्यासाठीच श्रीदत्तगुरुंचा जन्म आहे याची साक्ष पटते.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
®रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या:९०९६८००६५३
Comments
Post a Comment