श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय ४०
असाच एक कुष्ठरोगाने अत्यंत त्रस्त व निराश झालेला नरहरी नांवाचा माणूस श्रीनृसिंहसरस्वतींचा महिमा ऐकून गाणगापूरात येतो आपली व्यथा सांगतो.त्यावर स्वामी त्याला पूर्वजन्मातील पापकर्मामुळे तुला हा रोग जडला आहे.तुला सांगतो तो उपाय निष्ठेनं केलास तर तुझी या व्याधीतून मुक्तता होईल.हा संवाद चालू असताना औदुंबराची एक सुकलेली काठी घेऊन चाललेला माणूस स्वामींना दिसतो.त्याच्याकडून ते शुष्क काष्ठ घेऊन स्वामी नरहरीला देतात.हे काष्ठ जमिनीत पुरुन त्याला हिरवी पालवी फुटे पर्यंत नित्यनेमाने पाणी घालायला सांगता.तो अनन्यभावाने ही सांगितलेली उपासना करतो.गावातील लोकही त्याची चेष्टा करु लागतात.त्यांना हा मूर्खपणा वाटत असतो आणि ते त्याला परावृत्त करु पाहात असतात.पण स्वामी चुकीचं काही सांगणार नाहीत अशी दृढ श्रध्दा असलेला नरहरी त्या औदुंबराच्या काठीला पाणी घालत राहतो.तो ऐकत नाही असे पाहून स्वामी जमलेल्या भक्तांना सिंहकेत राजाचा पुत्र धनंजय व शबरसुताची कथा सांगतात.अरण्यात शिकारीसाठी गेलेल्या या दोघांना एक जीर्ण शिवालय दिसते.तिथे बरीच शिवलिंगे विखुरलेली दिसतात.त्यातले एक शिवलिंग घेऊन तो घरी जातो.त्याची नित्यनेमाने पूजा करतो.स्मशानातल्या भस्माचा नैवेद्य दाखवून आपल्या पत्नीला रोज खायला देण्याचा क्रम बरेच चालला एक दिवस स्मशानातले भस्म न मिळाल्यामुळे आपल्या पत्नीला घरात कोंडून ते पेटवून देतो.पत्नी जळून भस्मसात झाल्या नंतर तो मनोभावे त्या भस्माचा नैवेद्य दाखवतो व सवयी प्रमाणे प्रसाद देण्यासाठी पत्नीला हाक मारतो.पत्नी येते.आश्चर्य वाटून तो तिला विचारतो.तेंव्हा मला महादेवाने परत आणले असे सांगते प्रसाद ग्रहण करते.जसे ज्याचे अंत:करण तसे त्याला फळ मिळते असे स्वामी सांगतात.नरहरीच्या भक्तीवर संतुष्ट होऊन स्वामी आपल्या कमंडलूतले पाणी त्या शुष्क काष्ठावर शिंपडतात त्याला तात्काळ हिरव्या पानांचे अंकुर फुटतात.मग स्वामी जमलेल्या भाविकांना त्याला नदीत स्नान घालून त्याची जुनी वस्त्रे फेकून देऊन नवी वस्त्रे देऊन मठात घेऊन येण्यास सांगतात.जेथे वस्त्रे फेकली ती जमीन क्षारमय नरहरीचा देह सतेजकांतीचा झाला.दुर्दम्य इच्छाशक्ती काय चमत्कार घडवून आणू शकते याचा प्रत्यय ही कथा देतेच.पण महापापी माणसालाच कुष्ठरोग होतो अशी मानसिकता असलेल्या समाजमनात मानवधर्माचे जागरणही करते.वैद्यकिय संशोधन इतके पुढे जाऊन सुध्दा आजही कुष्ठरोगी माणसांना समाज काय त्याच्या रक्ताच्या नात्यातली माणसेही जवळ करत नाहीत.त्यासाठी बाबा आमटेंसारख्या माणसाला कुष्ठाश्रम काढावा लागतो.हे दुर्दैवी असलं तरी नृसिंहसरस्वतींसारखे महापुरुष मानवधर्माचे जागरण करण्यासाठी प्रत्येक काळात जन्म घेत राहणार हेही तितकेच खरे आहे.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment