श्री गुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
-----------------------------------------
अध्याय ५वा
पीठापूर या आंध्र प्रदेशातल्या गावात आप्पळराजा व सुमती नांवाचे एक श्रध्दावान ब्राह्मण जोडपे राहात होते.एका आमावस्ये दिवशी या जोडप्याच्या घरी श्राध्दकर्म होते.ब्राह्मण भोजनाची तयारी झाली होती.पण आमंत्रित केलेले ब्राह्मण येण्याआधीच अतिथीवेषात एक भिक्षेकरी आला.अतिथी देवो भव या उक्तीवर नितांत श्रध्दा असलेल्या सुमतीने आपल्या घरी प्रत्यक्ष दत्तात्रयच भिक्षा मागायला आलेत या भावनेने त्याला भिक्षा वाढली.भिक्षान्न सेवून तृप्त झालेल्या अतिथीने तिला " माते " अशी साद घालून काय हवे माग असे म्हटले.सुमतीला ' चित्ती वसे ते जगती दिसे ' या न्यायाने साक्षात दत्तात्रयांचे दर्शन झाले.तेंव्हा तुम्ही मला " माते " म्हटलात तो शब्द खरा करा.मला तुमच्यासारखाच पुत्र व्हावा अशी इच्छा प्रकट केली.आपल्याला पुत्र झाले पण जगले नाहीत.जे जगलेत त्यातला एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा आहे असे दु:खही सांगितले.अतिथीवेषातील दत्तात्रयांनी तिला आशिर्वाद दिले.पुढे सुमतीला जो पुत्र झाला तोच दत्तात्रयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ.आपळराजा व सुमतीने त्याचे प्रेमाने पालनपोषण केले.सातव्या वर्षी मौंजीबंधन होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला व मातापित्यांना सांगून जनकल्याणा प्रित्यर्थ तीर्थयात्रेला निघून गेला.या पुत्राच्या आशिर्वादाने तिच्या अंध मुलाला दृष्टी मिळाली.पांगळा पुत्र चालू लागला." मूकं करोती वाचालं पंगूं लंघयते गिरी " हे भगवद्गीतेतील आश्वासन त्या भाग्यवान जोडप्याला अनुभवायला मिळाले.ही कथा केवळ एक चमत्कार म्हणून सोडून द्यावी अशी नाही.कारण श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष होऊन गेले. ही मनघडन कथा नाही तर इतिहास आहे.तो काळ मुसलमानी आक्रमणाचा होता.हे आक्रमण फक्त भूप्रदेशांवर नव्हते तर सांस्कृतिक,धार्मिक क्षेत्रावरील आक्रमण होते.समाजातील ज्ञानी म्हणवणारा ब्राह्मणवर्ग घाबरलेल्या,भांबावलेल्या अवस्थेत मुसलमान राजांचे लांगुलचालनं करु लागला होता अशा वेळी या समाजाचे प्रबोधन करुन त्यांच्यातील पुरुषार्थाला खतपाणी घालणे आणि एकूणच सामाजाची बिघडलेली घडी नीट बसवणे अतिशय आवश्यक होते.श्रीपाद श्रीवल्लभांनी या महत्वपूर्ण कार्याची सुरुवात
केली.हे इथे लक्षात घेणे आवश्यक आहे.डोळे असून आंधळ्या आणि हातीपायी धड असून पांगळ्या झालेल्या समाजाला जागं करुन मिळालेला मनुष्य जन्म सार्थकी कसा लावायचा हे शिकवणारा लोकशिक्षक श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या व पुढे नृसिंहसरस्वतींच्या रुपाने मिळाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
|| दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
*
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या:९०९६८००६५३
Comments
Post a Comment