श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय ४७ व ४८
नृसिंहसरस्वतींचा महिमा अपरंपार वाढत होता.ज्या ज्या क्षेत्री महाराजांनी वास केला त्या त्या ठिकाणी त्यांनी शिष्य घडवले.गाणगापूरात स्वामींचे सात लाडके शिष्य होते.दीपावलीचा सण आला तेंव्हा प्रत्येक शिष्य आमच्या घरी येण्याची कृपा करा म्हणू लागला.महाराजांना आधी कोण घरी घेऊन जाणार यावर शिष्यांमधे वाद सुरु झाला.मग स्वामींनी प्रत्येकाला वेगळं बोलवून " आम्ही फक्त तुझ्याकडे येऊ पण ही गोष्ट बाकी कुणाला सांगू नकोस,असे सांगितले.दुसरे दिवशी स्वामी निघताना बाकी भक्त म्हणू लागले,तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका.तेंव्हा आम्ही कुठेही जाणार नाही अशी साऱ्यांना खात्री देऊन ते निघाले.दीपावली दिवशी महाराज फक्त माझ्याच घरी आले असं सगळेच शिष्य एकमेकांना अभिमानाने सांगू लागले.सगळ्यांचा दावा खराच होता.कारण स्वामी गाणगापूरात तर होतेच पण
बाकी सातही शिष्यांच्या घरी त्यांनी सेवा घेतली होती.अशा चमत्कारांवर आजकाल विश्वास बसत नाही.पण भारतातील हिमालय पर्वतरांगावरी गुहांमधे अनेक सिध्दयोगी आहेत.आज बटण दाबलं की टिव्हीच्या स्क्रीनवर कोणत्याही देशातील घडामोडी आपण पाहतो.हा विज्ञानाचा एक चमत्कारच आहे.चमत्कारांची सत्यासत्यता थोड्याशा तर्काने समजून घेता येते.मानवाला स्पर्शाने,घ्राणेंद्रियांद्वारे बऱ्याच गोष्टींचे ज्ञान करुन घेण्याची क्षमता निसर्गाने बहाल केलेली आहे.ऋषी मुनी,योगीपुरुष निसर्गाच्या सान्निध्यात राहात होते.त्यामुळे उच्चकोटीची ज्ञानेंद्रियांची संवेदनशीलता टिकून होती.निसर्गापासून माणूस जसजसा दूर जाऊ लागला तसतशा निसर्गदत्त क्षमता माणूस गमावून बसला.आदिवासी भागात राहणाऱ्यांमधे अशा क्षमता आजही अनुभवायला मिळतात.फक्त वासावरुन कोणते कंद खाण्या योग्य आहे,कोणती पाने किंवा फुले औषधी आहेत हे आदिवासी माणूस सांगू शकतो शहरात राहणारे आपण नाही सांगू शकत.पक्ष्यांच्या स्थलांतरावरुन,प्राण्यांच्या वर्तनावरुन नैसर्गिक आपत्तींचे ज्ञान आदिवासी माणसाकडे असते.हे केवळ निसर्गाशी,वृक्षलतांशी,पशूपक्ष्यांशी मैत्रीचा,प्रेमाचा व्यवहार केल्यामुळेच शक्य होते. असाच चमत्कार सत्तेचाळीसाव्या अध्यायात एका शूद्राच्याबाबतीत पाहायला मिळतो.एक शूद्र शेतात काम करत असताना गुरुदेवांना नित्य दंडवत घालत असे.एक दिवस स्वामी त्याला विचारतात,रोज मला मनोभावे दंडवत घालतोस.तुझी इच्छा काय आहे?- तेंव्हा तो स्वामींना तुमची कृपादृष्टी माझ्या शेतावर टाका.ज्वारी पेरलीय आता कणसं धरु लागलीत.तुमची कृपादृष्टी एकदा माझ्या शेतावर पडू दे,असे विनवतो.तेंव्हा आम्ही सांगितल्या प्रमाणे वागणार असशील तर बघतो तुझे शेत असे म्हणतात. गुरुवाक्यच आमच्यासाठी प्रमाण आहे असे त्याचे बोल ऐकताच स्वामी त्याला आम्ही स्नान करुन येई पर्यंत सगळं शेत कापून टाक अशी आज्ञा देतात.गावच्या पाटलांचा,घरच्यांचा विरोध पत्करुन तो सगळे पीक कापून टाकतो. ते पाहून स्वामी म्हणतात,अरे,आम्ही गंमतीने कापून टाक म्हटलं तर तू खरंच कापलंस पण ठिक आहे आता तुझ्या मनासारखं होईल.पुढच्या चारच दिवसात कडाक्याची थंडी पडून पाऊस येतो.गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची पीकं नासतात.सर्वांच्या नंतर पुन्हा पेरणी केल्यामुळे चिक्कार धान्य पिकते.पाटलाला दुप्पट खंडणी कबूल केल्याप्रमाणे देऊन सुध्दा सर्व गावाला पुरुन उरेल एवढी ज्वारी निघते.जास्तीचे धान्य तो गावातल्या गरीबांना वाटतो आणि स्वत: पुरते धान्य घरी ठेवतो.अढळ श्रध्दा असेल तर गुरुकृपेचा वर्षाव होतोच होतो.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment