श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय १९ /२०/२१
एकोणीस आणि विसाव्या अध्याया पर्यंत औदुंबर महिमा सांगणाऱ्या कथा आहेत.जिचे पुत्र जगत नाहीत अशा स्त्रीला पुत्र होणे,मेलेला पुत्र जिवंत होणे,हिरण्यकश्यपू या दैत्याचा नरसिंह रुपात वध करुन परमेश्वर चराचरात कसा व्यापून उरलेला आहे याची प्रचिती देणे,असे विविध चमत्कार या कथांद्वारे भक्तांना वाचायला,अनुभवायला मिळतात.चौसष्ट योगिनींच्या सेवेने प्रसन्न झालेले श्रीगुरु औदुंबराला अनेक वर देतात व आपला गौप्यरुपाने नित्यवास औदुंबर वृक्षातळी असेल असे आश्वसन देतात.यामुळेच दत्त संप्रादायात या वृक्षातळी साधना केल्यास ती सुफळ संपूर्ण होते,आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी दृढ श्रध्दा आहे.अनेक साधकांना तशी प्रचिती आलेली आहे.श्रध्देला प्रश्न न विचारता या वृक्षातळी बसून कठोर साधना करावी व अनुभव घ्यावा हाच एक मार्ग आहे.संसारी उपासकांनी मात्र आपल्या क्षुद्र ईच्छांच्या पूर्तीसाठी वारंवार सद्गुरुंना त्रास देऊ नाही,हे लक्षात ठेवावे.औदुंबराला कल्पवृक्ष म्हटले आहे याचेही कारण आहे.आयुर्वेद शास्त्रात शारिरीक व मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळण्या करता औदुंबर वृक्षाच्या मुळापासून पाना पर्यंतचा औषधी म्हणून उपयोग केला जातो.वैदिक परंपरेत दहा देववृक्ष सांगितले आहेत.पिंपळ,वड,आम्र,शमी,बेल,अशोक,नारळ,डाळिंब,कडूलिंब,केळे,ही त्यांची नावे आहेत. त्यातल्या औदुंबराला कल्पवृक्ष संबोधले आहे.एकूणच वैदिक परंपरेत वृक्षांना पूजनीय मानले आहे.जीवमात्रांच्या शारिरीक व मानसिक विकासात निसर्गाच्या संवर्धनाचे व संरक्षणाचे महत्व वेदकालापासून ऋषीमुनींनी सांगितले आहे.औदुंबर महिमा सांगणाऱ्या कथांमधून निसर्गच आपला खरा सोबती आहे.दत्तगुरु या निसर्गाला व्यापून उरले आहेत.निसर्गाचे आपण अविभाज्य घटक आहोत.त्याचे संरक्षण आणि संवर्धन केले नाही तर आपला विनाश दूर नाही. एवढा बोध तरी प्रत्येकाने घेतला पाहिजे.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment