श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय ५० वा
नवव्या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ अर्थात श्रीदत्तात्रय एका परीटाला पुढच्या जन्मी तू वैदुरा नगरीचा राजा होशील व तुझी या जन्मातली सर्व प्रकारच्या सुखोपभोगांची इच्छा पूर्ण होईल असा आशिर्वाद देतात व पुढच्या नृसिंहसरस्वतींच्या अवतारात आपण भेटू असा आशिर्वाद देतात.पन्नासाव्या अध्यायात या भेटीचे मोठे सुंदर वर्णन आले आहे.या जन्मात जरी तो मुस्लीम राजा होता तरी देखील परीटाच्या जन्मातील हिंदू देवदेवतांप्रती असलेली श्रध्दा व भक्तीभाव तसाच दृढ राहिलेला आहे.त्यामुळेच हिंदू प्रजेला तो कोणत्याही प्रकारचा त्रास न देता सर्वांबरोबर प्रेमाने व सौहार्दाने वागतो आहे.इतकेच काय देवदेवतांची पूजाअर्चा देखील तो करतो आहे.त्याच्या धर्मातली मंडळी त्याची निंदा करत असली तरी तो त्यांची पर्वा करत नसे.पण सर्व सुखे पायाशी लोळत असूनसुद्धा या राजाला एक दिवस मांडीवर एक फोड होतो.अनेक दिवस औषधोपचार करुनही त्याला गुण येत नाही.काही विद्वान ब्राह्मण त्याला गाणगापूरला दत्तावतारी पुरुष श्रीनृसिंहसरस्वतीच या व्याधीतून तुला मुक्त करतील असे सांगतात.राजा आपले हत्ती,घोडे राण्यांसह जातो.त्याला बघताच श्रीगुरुदेव " कां रे रजका " अशी साद घालतात.गुरुदेवांकडे पाहताच त्याला आपला पूर्व जन्म आठवतो व तो त्यांच्या पायावर लोळण घेतो.ऐंद्रिय सुखोपोभोग मिळत नाही तोवर त्यांच्या विषयी प्रचंड आसक्ती वाटते पण ते जेंव्हा भरपूर वाट्याला येतात तेंव्हा हळूहळू त्यात रस वाटेनासा होतो.एखादी असाध्य शारीरिक व्याधी जडते तेंव्हा खऱ्या सुखाची ओढ लागते.आत्मसुखाचा शोध सुरु होतो.राजाच्याबाबतीत नेमके असेच घडले आहे.श्रीदत्रायांसारखे अवतारी पुरुष काय देऊ शकत नाहीत?- परीटाच्या जन्मातच स्वामी त्याला मोक्ष देऊ शकत होते पण इच्छा वासनांचा पूर्णपणे निचरा झाल्याशिवाय मिळणारी मुक्तावस्था निर्मळ राहात नाही हे गुरुदेवांना पक्के माहित होते म्हणूनच मांडीवरच्या व्याधीचे निमित्त करुन राजा बरोबरची ही भेट स्वामींनी घडवून आणली व त्याला व्याधीमुक्त केले.ज्यांच्या कृपेने राजकुळात जन्म घेऊन ऐश्वर्यात लोळत आयुष्य घालवलं त्या श्रीगुरुंची चरणसेवा घडली नाही याचे त्याला वाईट वाटते.तो त्यांना वैदुरानगरीत येण्याचे आमंत्रण देतो.श्रीगुरुंना राजवाड्यात नेतो.पत्नी,मुले व आपले वैभव दाखवतो.राज्य कारभार पुत्रावर सोपवून स्वामींच्या सेवेत उर्वरीत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतो.श्रीस्वामी प्रसन्न होऊन त्याला भरभरुन आशिर्वाद देतात व आपल्या भक्त मंडळीत समाविष्ट करुन घेतात.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment