श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय ४३ व ४४
या दोन अध्यायात अनंतव्रत व तंती विणकराला सूक्ष्मदेहाने मल्लिकार्जुनची यात्रा घडवली अशा दोन कथा आहेत.अनंतव्रत प्रसिद्ध आहे.गेलेले वैभव-ऐश्वर्य प्राप्त व्हावे व आहे ते टिकून राहावे म्हणून हे व्रत आजही खूप जण करतात.कृतयुगात सुमंतु नावाचा विद्वान,तपोनिष्ठ विप्र होता.त्याचा भृगुकन्येशी विवाह झाला पण एका कन्येला जन्म देऊन ती थोड्याच दिवसात मरण पावली. सुमंतुने दुसरा विवाह केला खरा पण ही दुसरी पत्नी नावाप्रमाणेच कर्कशा होती.सुशीलेला ती सावत्रपणाची वागणूक देत असे.दैवयोगाने एक दिवस ऋषी कौंडिण्य या विप्राकडे आले.त्यांनी सुशीलेचा पत्नी म्हणून स्विकार केला.दोन तपस्व्यांनी फार दिवस एकत्र राहू नये असा दंडक असल्यामुळे ते सुशीलेला घेऊन निघाले.कर्कशेनी त्यांचा प्रेमाने मानसन्मान करता घराचे दार लावून घेतले.पण ती गोष्ट अधिक मनाला लावून न घेता ते रथात बसून निघाले.वाटेत कौंडिण्य अनुष्ठानासाठी थांबले.सुशीलेने नदी किनारी काही स्त्रिया पूजन अर्चन करताहेत असे पाहिले.तिने आस्थेने त्यांना विचारले तेंव्हा आम्ही अनंताचे व्रत करतो आहोत असे सांगून तिलाही पूजन अर्चनात सहभागी करुन घेतले.वाण म्हणून गोधूमाचा कोंडा दिला व तिच्या मनगटी लाल रंगाचा अनंताचा धागा बांधला.या नंतर त्यांना मोठे ऐश्वर्य प्राप्त झाले.आपल्या तपश्चर्येमुळेच आपण मोठ्या वैभवाचे धनी झालो आहोत अशा गर्वाने त्यांच्या मनात ठाण मांडले.सुशीलेच्या हाताला बांधलेला दोरा पाहून पत्नीने आपल्या विरुद्ध चेटूकबिटूक केलंय अशी शंका येऊन त्यांनी तो दोरा काढून अग्नीत फेकून दिला. सुशीलेने पटकन उचलून तो दुधात टाकला.पुढे थोड्याच दिवसात कौंडिण्याचे सारे वैभव लयाला गेले.पश्चातापदग्ध अवस्थेत अनंताला शोधून त्याची क्षमा मागण्यास तो वणवण भटकला.फळाफुलांनी बहरलेला वृक्ष,एक गाय,एक गाढव,दोन सरोवरे,एक बैल अशा प्रत्येकाला त्याने अनंताला पाहीलेत कां म्हणून विचारले पण सर्वांनी नकार दिला.अनंता शिवाय त्यांचे जीवन असून नसल्यासारखे झाले होते.हे पाहून कौंडिण्य धरतीवर कोसळला.एका वृध्दाने त्याला उठवले.आपणच अनंत आहोत असे सांगून आपले खरे रुप दाखवले.त्याला क्षमा केली व कौंडिण्याचे वैभव त्याला परत मिळाले.युगानुयुगे अविरत बहरणारी आणि नवजीवनाचा संदेश देणारी सृष्टी आपल्या वैभवाचा साधनसंपत्तीचा कधी गर्व करीत नाही.तिचे ऋतुचक्र अव्याहत सुरु ठेवणाऱ्या महाशक्तीशी एकरुप होऊन,लीन होऊन सृष्टी तिने जसे ठेवले तशी आनंदात राहते.माणसानेही निसर्गाचा,आपण अविभाज्य भाग असून आपल्याकडे ज्या ज्या काही असामान्य क्षमता आहेत त्या केवळ आणि केवळ त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकामुळे,अनंतामुळे आहेत हे जाणून सदा विनम्र राहून त्याचे आभार मानावेत असा संदेश देऊन ही कथा संपते.व्रताचा महिमा वर्णन करताना अज्ञातवासात असताना पांडवांनी सुध्दा हे व्रत केल्याचा व गतवैभव परत मिळवल्याची कथा श्रीगुरुंनी सांगितली आहे.श्रीगुरुचरित्रातील बहूतेक सर्व अध्यायात तत्कालीन भक्तांच्या कथा-व्यथा सांगताना त्याला समांतर जाणारे पुराणातील कथांचे दाखले दिले आहेत.त्यामुळे प्रत्येक कथा व त्या मिषाने सांगितलेला गुरु महिमा मनावर कायमचा ठसतो ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.चव्वेचाळीसाव्या अध्यायातील सद्भक्त तंती हा सगळ्या गावातले लोक मल्लिकार्जुनाच्या यात्रेला निघालेले असतानासुद्धा तो स्वामींच्या पायाशीच आपला मलिकार्जुन आहे अशा भावनेने मठातच राहतो.त्याचा सेवाभाव व अत्यंतिक निष्ठा पाहून स्वामी त्याला आपल्या पादुका हृदयाशी धरुन डोळे मिटायला सांगतात आणि काही क्षणात त्याला मल्लिकार्जुन यात्रा घडवतात.सगळे गावकरी मल्लिकार्जुनलिंगाची पूजा करत असताना तंतीला तिथे श्रीस्वामी दिसतात.परमेश्वर जर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे तर मग वेगळी यात्रा करण्याचे कारण काय असा त्याला प्रश्न पडतो.पण प्रत्येक तीर्थस्थानाचे म्हणून एक महत्व असते.अनेक ऋषी-मुनींच्या वास्तव्याने व त्यांच्या तपश्चर्येने अशी स्थाने पवित्र झालेली असतात अर्थात जीवनावरील सकारात्मक उर्जेने ती भारलेली असतात.हे तंतीच्या मनावर कोरले जावे म्हणून याही ठिकाणी पुराणातली एक रंजक कथा आली आहे.किरात देशाचा राजा अतिशय पराक्रमी व शिवभक्त होता.असं जरी असलं तरी तो व्यभिचारी व मद्यमांस खाणारा होता.त्याची पत्नी त्याला विचारते की तुमचे आचरण अशुध्द असूनसुद्धा भगवान शंकरा विषयी तुमच्या मनात एवढी अनन्य भक्ती कशी?- तेंव्हा त्याला आपण पंपानगरीत राहणारे पूर्वजन्मातील श्वान होतो हे आठवते.श्री शैलम पर्वतावर काही भक्त शिवलिंगाची पूजा करत असताना आपण काही खायला मिळेल म्हणून तिथे गेलो असता साऱ्यांनी आपल्याला चोप द्यायला सुरुवात केली जीव वाचवण्यासाठी आपण मंदिराच्या गर्भगृहात जाऊन बसलो तिथे अतिशय सुंदर शिवपूजा पहायला मिळाली पण परत मला तिथून उचलून बाहेर फेकून दिले.पूर्ण दिवस काहीही खायला मिळाले नाही.शिवरात्रीस असा उपास घडला.पण अजाणतेपणी घडलेल्या पुण्य कर्माचे फळ म्हणून मी या पंपानगरीचा राजा झालो.शिवभक्ती उपजली तरी श्वानाच्या जन्मातली आहार आणि मैथुनाची अतृप्त वासना तशीच राहिली.तू मागच्या जन्मी कपोती होतीस व एक मांसाचा तुकडा तुझ्या चोचीत असताना एक घार तुझ्या मागे लागली जीव वाचवण्यासाठी तू खूप कष्ट घेतलेस,श्रीशैलमच्या कळसाभोवती फिरुन फिरुन दमलीस तेंव्हा कळसावर बसत असताना चोचीतला तुकडा खाली पडला.शिवाला प्रदक्षिणा आणि उपवास घडला त्या पुण्याचे फळ म्हणून तू माझी राणी म्हणून हे ऐश्वर्य भोगते आहेस.पुरपि जननं पुनरपि मरणं या चक्रातून बाहेर पडून जीवन मुक्तावस्था प्राप्त करायची असेल तर या जन्मात केलेल्या बऱ्यावाईट कर्मांचा कुठलाच संस्कार आत्म्यावर राहू नये यासाठी अध्यात्मिक साधनापथावर भक्ती व ध्यान धारणेशिवाय पर्याय नाही.अन्यथा मागील जन्मातील गुणदोष घेऊन पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो.मागील जन्मातील काही दोष असे असतात की त्याचे परिणाम भोगूनच संपवावे लागतात. तरच निर्मल मोक्षावस्था प्राप्त होते व ती टिकवून ठेवण्यास मदत होते.म्हणूनच मनुष्याने या जन्मात जास्तीत जास्त सत्कर्म हातून घडण्यासाठी प्रयत्न करावा.सत्कर्म,पाप-पुण्य,या गोष्टी स्थल,काल व परिस्थिती सापेक्ष आहेत.कोणते कर्म पुण्यप्रद हे त्यात्या परिस्थितीत आपल्याला सद्सद् विवेक बुद्धी सुचवत असते.अखंड सावध चित्ताने व्यवहार केले तर दुष्कर्म हातून घडणे अशक्य असते.त्यामुळेच अशी अखंड सावधानता फक्त संतांना जमेल आपल्यासारख्या सामान्य माणसाला जमणार नाही असा विचार न करता सकारात्मक विचार करुन साधकाने प्रयत्न करत राहिले पाहिजे."प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे" या उक्तीची साक्ष, अथक प्रयत्नाने ज्यांनी ज्यांनी या पृथ्वीतलावर जन्म घेऊन अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या त्यांच्या जीवनचरित्रातून पटते.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment