श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
रमेश यशवंत वाकनीस
------------------------------------------
अध्याय ५१ /५२/
एक म्लेंछ राजा श्रीगुरुंचा शिष्य झाला ही वार्ता सर्वदूर पसरली.आता नाना जाती धर्माचे लोक येऊन आपल्या भजनी लागतील.त्यात मुमुक्षु कमी आणि अर्थार्थी, स्वार्थी,लबाड मंडळीच जास्त असणार.पुढे काळ कठीण येणार.म्लेंछांची धर्म,संस्कृतीवरची आक्रमणे अधिक उग्ररुप धारण करतील तेंव्हा आता आपले कार्य गुप्तरुपाने करणेच इष्ट ठरेल असा निर्णय घेऊन त्यांनी आपल्या सर्व लाडक्या शिष्यांना सांगितला.सर्व शिष्यांना आणि ग्रामस्थांना गुरुदेवांचा वियोग होणार हे ऐकून अत्यंत दु:ख झाले.आम्हा अजाण पामरांना सोडून जाऊ नका असे सगळे परोपरी विनवू लागले.त्यावर आम्ही गाणगापूरातच वास करणार.अमरजेत नित्य स्नान करणार.माध्यान्हीस मठात गुप्तरुपात असू.निरतिशय प्रेम असलेल्या भक्तांना आमचे दर्शन होईल.लौकिकार्थाने आम्ही श्रीशैल्यास जात असलो तरी आमचे प्रात:स्नान औदुंबरास,नरसोबावाडीला अनुष्ठान करुन माध्यान्हकाळी इथे येऊ.अमरजा संगमी स्नान करुन निर्गुणरुपात सर्वांची पूजा घेऊ असे सांगून सर्वांना आश्वस्त केले.अमरजा संगमावरील औदुंबरातळी आपल्या पादुका ठेवून त्यांची नित्य पूजा करावी असे सांगून त्यांनी श्रीशैलम यात्रेस प्रस्थान ठेवले.जाताना त्यांनी,आपण मल्लिकार्जुनची भेटी घ्यायला जात असून आपल्यासाठी पुष्पासन सज्ज ठेवायला सांगितले.स्वामी निजानंदी निमग्न झाले तो शुक्रवारचा पुण्य दिवस होता. कन्यागती,बृहस्पती,बहूधान्यसंवत्सर होते.शिशिरातल्या माघातली पक्षप्रतिपदा होती.आमचे गायनवादनावर अत्यंत प्रेम असून आमचे गायनातून स्मरण करणाऱ्या भक्ताच्या घरी आम्ही सदैव असू असे सांगितले.
स्वामींचा निरोप घेऊन थोडा काळ जातो न जातो तोच काही नावाडी आले व म्हणाले,आम्ही स्वामींच्या सुवर्ण पादुका पाहिल्या.कर्दळीवनात जात असलो तरी वास गाणगापुरीच असेल,असा श्रीगुरुंचा निरोप आहे. तेवढ्यात प्रसादपुष्पे आली.सर्व शिष्यानी ती वाटून घेतली.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment