बालकवींचे भाव चरित्र

३
एकंदरीत बालकवींच्या व्यक्तीगत जीवनाचा प्रवास पाहिला तर असे लक्षात येते की लहानपणापासून दु:ख त्यांच्या पाचवीलाच पूजलेले होते.जन्मदात्या आईवडिलांपासून दूर राहावे लागणं,थोरला भाऊ जहाल गटाच्या स्वातंत्र्य चळवळीतला कार्यकर्ता होता त्यामुळे पोलिसांचा सतत ससेमिरा मागे लागणं,पोटासाठी छोट्यमोठ्या नोकऱ्या कराव्या लागणं,आणि नित्य नव्या आपत्तींना तोंड देत जगणं एवढंच त्यांच्या नशीबात होतं. नाही म्हणायला त्यांच्या आयुष्यात जे सुख वाट्याला आलं ते रेव्ह.ना.वा.टिळक आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या सहवासात.या दोघांनी त्यांच्यातला कवी जपला,वाढवला आणि स्वत:चा मुलगा म्हणून त्यांच्यावर मायेची पाखर धरली.त्यामुळेच अनेकदा निराशेने घेरुन टाकले तरी बालकवी खचून गेले नाहीत.लक्ष्मीबाईंच्या सहवासात ज्या प्रेमाचा,वात्सल्याचा,अनुभव आला तोच जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला हवा असतो हे वैश्विक सत्य त्यांना उमगले.निसर्गाच्या तादात्म्यतेत या सत्य,शिव,सुंदरा,चा आविष्कारच त्यांच्या कवितेत प्रत्ययाला येतो.निसर्गाच्या सानिध्यातच त्यांना ' आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे..वरती खाली मोद भरे..' हा साक्षात्कार झाला.असा आनंद मिळवणं आणि सदासर्वकाळ आनंदात राहणं हेच मनुष्य जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. हे ध्येय प्राप्त करायचं ऐहिकाचा लोभ सोडून अध्यात्माची कांस धरली पाहिजे.पण हे कळलं तरी वळत नाही.बालकवीच काय तुमची आमची सर्वांची हीच गत आहे.ऐहिकात मन रमत नाही.अध्यात्म पचवता येत नाही.म्हणूनच बालकवी म्हणतात, ' स्वार्थाच्या बाजारात,किती पामरे रडतात..द्वेष संपला,मत्सर गेला..आनंदी आनंद गडे..इकडे तिकडे चोहीकडे.. ' कवितेची धुंदी उतरली की स्वार्थाचा बाजार दिसू लागतो. मग पुन्हा मनाला खंत बोचत राहते,द्वेष संपला असं नुसतं म्हणून संपतो कां? - मत्सर गेला म्हणून खरंच सोडून जातो कां?- ही खंत पुन्हा लौकिकातून पारलौकिकाकडे खेचते.अशा तडफडीतूनच ' औदुंबर ' सारखी अप्रतिम कविता जन्म घेते..
'ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी लेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातुन..
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे..
पायवाट पांढरी तयातुन आडवीतिडवी पडे
हिरव्या गर्दीमधुन निघाली काळ्या डोहाकडे
झाकळुनी जळगोड काळिमा पसरी लाटांवर
पाय सोडुनी जळात बसला असला औदुंबर.'
- बालकवींच्या या कवितेची आज पर्यंत शेकडो परिक्षणे प्रसिद्ध झालेली आहेत.अजूनही लिहीली जात आहेत. प्रत्येक आस्वादकाला त्यात वेगळाच अर्थ जाणवतो.पण'अनेकार्थता ' हे सर्वोत्तम कलाकृतीचे वैशिष्ट्य घेऊन आलेल्या या कवितेत उठून दिसतो तो सुखदु:खाच्या जन्ममृत्युच्या पल्याड असलेला समाधिस्त,स्थितप्रज्ञ, योगी.बालकवींना स्वत:लाही या योगीच अभिप्रेत असावा.तोच त्यांना आयुष्यभर साद घालत राहिला आणि बालकवी त्याच्या भेटीच्या ओढीने प्रवास करत राहिले. ५ मे १९१८ रोजी जळगाव येथे बालकवी यांचे निधन झाले तरी निसर्गाशी तादात्म्य साधत शाश्वत जीवनाचा शोध घेणारा हा कवी आजही प्रत्येक मराठी रसिकाच्या मनात त्याच्या एकाहून एक सुंदर कवितांच्या रुपाने जिवंत आहे.बालकवींच्या भावचरित्राचा शेवट करताना सदानंद रेगे यांची 'ठोंबरे' ही कविता उद्धृत केल्याशिवाय राहवत नाही..
ठोंबरे
------
ठोंबरे एकूण भोळसटच होता.
स्वभावानं राणीच्या रुपयासारखा लख्ख खणखणीत.
देव्हाऱ्यातला देवच जसा..शामळूशेट शाळीग्राम.
पहावं तेंव्हा त्याला भूत डसलेलं असायचं.
दिवेलागण झाली की माझं बापडीचं एकच काम-
" ठोंबरे,ये बाबा.." 
मग ठोंबरे यायचा.
नि लक्षुंबाई मीठमोहऱ्यांनी त्याची
दृष्ट काढायच्या.
टिळकांना सांगितलं की ते म्हणत :
" तू कशाला लागतेस त्या भूताच्या पाठीस? दॅट कुड बी‌ ए होली घोस्ट.."
एक दिवस ठोंबरे मला म्हणाला :
" आई आज मन दुखतंय सारखं सकाळपास्नं.."
मला वाटलं नेहमीचाच वात्रटपणा
चाललाय त्याचा.
मी पोळी लाटून तव्यावर घातली.
तो म्हणाला : " खरंच आई तुझ्या गळ्या शप्पत ! "
मी म्हटलं : " मेल्या मी मेल्ये तर तुझं काय रे जाणाराय "
तो म्हणाला : " मग मी जातो मरुन.."
मी म्हटलं : " तेवढं मात्र नको करुस.मला रडायला वेळ नाही. दुपारी मला सांडगे घालायचेत् नि संध्याकाळीऽऽऽ टिळकांशी भांडायचंय.. "
तव्यावरची पोळी परतत होत्ये तर माझ्या कानाशी लागून म्हणाला :
" आई माझ्या मनात एक औदुंबर उगवतोय् त्याचा ठणका लागलाय सारखा. "
मी त्याच्यासारखाच हेल काढत म्हटलं :
आता टिळक नि तू ,दोघे त्याच्यावय जाऊन बसा चव्वीस तास..खाली येऊच नका..
नाहीतर असं कर
तुझा तो औदुंबर आकाशाला लागला की त्याची फुलं आण.
तुझ्या फुलराणीला वेणी करु आपण. "
तो म्हणाला : " छान कल्पना आहे.खऱच छान.गुड.एक्सलंट.वेणी फाॅर फुलराणी.. माय फुलराणी..."
बोलता बोलता तो धूम
रुळावरुन धावतच सुटला.
मी ओरडतेय् : ठोंबरे, थांब..
असा वेड्यासारखा धावतोस काय? "
पण धावतच होता..
निर्झरासारखा धावत होता.
तुळशीच्या पांदीतुन तो मला दिसत होता‌.
अखेर तो एक ठिपका झाला
नि आकाशात कुठे दिसेनासा झाला.
टिळक रात्री उशीरा घरी आले
तेंव्हा त्यांच्या पिशवीत
मातीनं बरबटलेला वाहणांचा जोड होता..
मी कुणाचा म्हणूनही विचारलं नाही
असेल एखाद्या होली घोस्टाचा
आपल्याला कशाला पंचाईत?
- ही रेग्यांची कविता मनात अनेक प्रश्न उभे करते.बालकवी रेल्वे अपघातात गेले असं म्हणतात.पण खरंच तो एक अपघात होता कां? की त्यांनी आत्महत्या केली?- आत्महत्या केली नसेल तर मग ते अशा कोणत्या विचारात होते की त्यांना समोरुन येणाऱ्या भरधाव रेल्वेगाडीचा भोंगा ऐकूच आला नाही.पत्नीशी आपण फार कठोर वागलो याची खंत सलत होती त्यांना की फुलराणी सारखी दिसणारी रमाई त्यांना साद घालत होती?- की मनात उगवणाऱ्या औदुंबराने असे प्रश्न उभे केले की त्याची उत्तरे मिळवताना त्यांना हा इहलोक आपण सोडून चाललो आहोत याचेही भान राहिले नाही?- कोण जाणे..! पण एकमात्र खरं की अनेक गूढ रहस्ये पोटात घेऊन,जळात पाय सोडून बसलेला त्यांचा ' औदुंबर ' तुमच्या, माझ्या, साऱ्यांच्या मनाला साद घालत राहील,अनंतकाळ...!
© रमेश यशवंत वाकनीस
कामायनी सह.गृह.संस्था,पेठ २५ घरांक ५०/२ सिंधुनगर,निगडी,पुणे ४११०४४
भटकबोल्या : ९०९६८००६५३

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७