श्री गुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
------------------------------------------
|| श्री गुरुदत्त बोधामृत ||
---------------------------------
रमेश यशवंत वाकनीस
-------------------------
श्रीमत् गुरुचरित्र श्री दत्त संप्रदायतील भक्तांना व हिंदू धर्म व अध्यात्मिक क्षेत्रातील जिज्ञासू भाविकांना अतिशय पूजनीय असा ग्रंथ आहे.श्री दत्तात्रयांचे प्रथमावतार सद्गुरु श्रीपाद श्रीवल्लभ व यांचेच उत्तरावतार सद्गुरु श्रीनृसिंहसरस्वती यांच्या अवतारकार्याचा महिमा गाणारा हा काव्य ग्रंथ आहे.श्रीनृसिंहसरस्वतींचे शिष्य सायंदेव साखरे यांचे पाचवे वंशज सरस्वती गंगाधर यांनी हा ग्रंथ १४८० लिहीला अशी दत्त संप्रदायातील भक्तांची मान्यता आहे.श्रीनृसिंहसरस्वतींचे शिष्य सिध्द यांनी प्रथम श्रीगुरुचरित्र संस्कृतमधे लिहीले व नंतर त्याचा काव्यमय अनुवाद सरस्वती गंगाधरांनी केला असावा असे थोर संशोधक श्री.रा.चिं.ढेरे यांनी ' दत्त संप्रदायाचा इतिहास ' या ग्रंथात म्हटले आहे.असो.मराठीत सिध्द झालेले श्रीगुरुचरित्र म्हणजे प्रत्यक्ष मंत्राक्षरेच आहेत,त्याच्या अर्थाच्या भानगडीत न पडता हा ग्रंथ प्रेमाने व श्रध्देने वाचावा म्हणजे भक्ताचे इहपर कल्याण होईल असे अनुभवी अध्यात्मिक साधकांचे सांगणे असते.तरी पण प्रस्तुत लेखकाला एक काव्यसाहित्याचा व तत्वज्ञानाचा विद्यार्थी या नात्याने समजून घ्यावा अशी उपरती झाल्यामुळे हे धारिष्ट करावेसे वाटले आहे.पात्रता म्हणाल तर इतकीच.त्यामुळेच-
मी सामान्य म्हणोनी | उदास व्हाल माझे वचनी | मक्षिकेच्या मुखातुनी | मधु केवी ग्राह्य होय |
या श्रीगुरुचरित्रातील सरस्वती गंगाधरांच्या ओळी त्यांच्यापेक्षा प्रस्तुत लेखकालाच जास्त लागू पडतात हे लक्षात घेऊनच वाचकांनी या लेखनाकडे पाहावे अशी विनंती आहे.
श्रीगुरुचरित्र ग्रंथ : स्वरुप व पार्श्वभूमी
--------------------------------------------
सध्या सर्वत्र उपलब्ध असलेले गुचरित्र हे ५३ अध्यायांचे आहे.त्रेपन्नाव्या अध्यायाला 'अवतरणिका' म्हणतात.यात ५२ अध्यायातील कथांची उजळणी आहे.एकूण ७३०० ओव्या असलेल्या ग्रंथाचा लेखनकाल व १४ व्या शतकातील श्रीनृसिंहसरस्वतींचा काल लक्षात घेतला तर हा काल वेदप्रणित हिंदू धर्म व सांस्कृतिक लोकजीवनासाठी अतिशय संघर्षाचा आणि आपत्तींचा होता.भारतावर मुस्लीम राजांची आक्रमणे होऊ लागली होती.एखाद्या परधर्मीय राजांची आक्रमणे होतात तेंव्हा ती फक्त भौगोलिक प्रदेश काबीज करण्या पुरतीच नसतात. देव, धर्म व लोकजीवनावरील ते आक्रमण असते.काल पर्यंत जगत आलो त्यापेक्षा अगदी अपरिचित जीवन पध्दती समोर आल्यामुळे समाजमनाच्या श्रध्देचा पायाच ढासळू लागतो.बळी तो कानपिळी अशी परिस्थिती निर्माण होते.कां जगायचे?- या प्रश्नापेक्षा कोणत्याही परिस्थितीत 'जगायचे कसे?'- हा प्रश्न 'आ' वासून उभा राहिलेला असतो.धर्माच्या शिकवणूकी पेक्षा पोटाची भूक मोठी होते.माणूस आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य विसरून सत्ताधीशांचे लांगूलचालन करीत पराभूताचे अपमानित जिणे पसंत करतो.अशा वेळी मनमनात आपल्या धर्म व संस्कृती विषयीचा जाज्वल्य अभिमान चेतवून समाजपुरुषाला श्रध्देच्या मजबूत पायावर उभा करणारा कुणीतरी मसिहा हवा असतो.श्रीनृसिंहसरस्वतींच्या रुपाने तो मिळाला.श्रीगुचरित्राची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली तर महाराजांचे आणि दत्तसंप्रदायाच्या परंपरेने निर्माण केलेल्या पुढील अवतारी संतांचे कार्य किती अलौकिक होते ही गोष्ट लक्षात येईल.म्हणूनच श्रीगुरुचरित्र समजून घेताना हा ग्रंथ म्हणजे फक्त सुरस आणि चमत्कारिक कथा नसून तो इतिहास होता व आहे ही बाब विसरुन चालणार नाही. हीच गोष्ट या ग्रंथातील श्रध्देचे,निष्ठेचे व व्रतस्थ जीवनाचे महत्व मनावर बिंबवणाऱ्या पौराणिक कथांबाबतही खरी आहे.'पुराणातली वानगी पुराणातच' असे म्हणून त्या सोडून देता येणार नाही.श्रीगुरुचरित्राच्या या महात्म्या बरोबरच आजच्या काळातील कोणत्याही जिज्ञासू वाचकांना अजिबात पटणार नाहीत किंबहूना त्या निषेधार्ह वाटतील अशा एकदोन गोष्टींकडेही दुर्वक्ष करुन चालणार नाही.त्याचाही संतुलीत परामर्ष घेण्याचा प्रस्तुत लेखकाचा प्रयत्न आहे.धर्म व अध्यात्मिक जागरण करण्यासाठी आपले जीवन वेचणाऱ्या लोकोत्तर योगी पुरुषांच्या कार्यशैलीचे एक वैशिष्ट्य आहे.ते असे की जीवमात्रांकडे ते अपार करुणेने आणि प्रेमाने बघतात.त्यामुळे समाजातील अर्थार्थी-मुमुक्षु,सुष्ट-दुष्ट,ब्राह्मण-ब्राह्मणेतर हिंदु-मुस्लीम,अशा सर्व स्तरातील माणसांकडे ते समदृष्टीने पाहतात आणि ज्याच्या त्याच्या योग्यते प्रमाणे समर्थ मानव घडवण्याच्या आपल्या कार्यात त्याला सहभागी करुन घेतात व आपण स्वत: अलगदपणे बाजूला होतात.निजानंदी निमग्न होतात.अशा सद्गुरुंची थोरवी सांगणारा हा ग्रंथ प्रसादगुणांनी ओतप्रोत भरलेला तर आहेच पण शब्दापलिकडचे एक आकाश कवेत घेत तो वाचकाला कथांच्या प्रवाहात ओढून प्रत्येक अध्याया शेवटी आत्मबोधाच्या किनाऱ्यावर आणून सोडतो.ग्रंथकर्ते सरस्वती गंगाधर नामधारक,सिध्दमुनी आणि प्रत्येक अध्यायातून भेटणारी सर्व पात्रे,घटना,प्रसंग,त्यांना भोगावी लागणारी सुखदु:खे,भावभावना, स्वत:च नटलेले आहेत.श्रीगुरुचरित्र वाचताना सरस्वती गंगाधरां इतकेच वाचक म्हणून आपण समरस झालो तर अननभूत आनंदाचे धनी तर होऊच पण इहपर कल्याणाच्या मार्गावर प्रचंड सकारात्मक उर्जेने भारले जाऊन जीवनाला सामोरे जाऊ.भौतिक समृध्दी बरोबरच आत्मिक समृध्दीची प्राप्ती करत या अनाद्यनंत जीवनाची यात्रा करण्यास समर्थ होऊ.
- रमेश यशवंत वाकनीस
कामायनी सह. गृह संस्था.
पेठ २५ घरांक ५०/२ सिंधुनगर
निगडी,पुणे ४११०४४
भटकबोल्या : ९०९६८००६५३
Comments
Post a Comment