श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय १७ वा
एका गावात एक वेदविद्येत पारंगत ब्राह्मण होता.पण वडील उच्च विद्याविभूषित,विद्वान असले तरी मुलगा तसा होतोच असं नाही.या ब्राह्मणाचा मुलगा मंदबुद्धी होता.त्यामुळे घरी दारी सर्वत्र त्याची निंदा होऊ लागली. शेवटी हा मुलगा निराश होऊन सर्वत्र भटकू लागला.जननिंदेला कृतीने उत्तर देऊन ज्ञान प्राप्त करणे हाच एक उपाय होता.पण हे घडायचे कसे?- कुठे जावे? कुणाकडे जावे? काय करावे? असे प्रश्न मनात खदखदत ठेवून हा मुलगा भटकत भटकत भिलवडी गावातील भुवनेश्वरीच्या मंदिरात पोहोचतो.तिच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडून तिथेच बसून राहतो.करुणा भाकतो.देवी काही प्रसन्न होत नाही.शेवटी आपली जीभ कापून तिच्या पायावर अर्पण करतो.स्वप्नात त्याला देवी सांगते," तू नदीच्या पैलतीरावर वर औदुंबर वृक्षा खाली एक सिध्दयोगी आहेत त्यांच्याकडे जा.तेच तुला हवं ते देतील " तो श्रीगुरुंकडे जातो.त्यांच्या चरणी मस्तक ठेवून आपली व्यथा सांगतो.त्याच्या मनातील भक्तीभाव,ज्ञानप्राप्तीची तळमळ पाहून ते प्रसन्न होतात.त्यांचे कृपाशिर्वाद मिळताच त्याला ज्ञान प्राप्ती होते.आजच्या काळात एखाद्या गुरुने मस्तकावर हात ठेवताच खरोखरच ज्ञान प्राप्त होते की नाही माहित नाही.पण एखादी गोष्टीची अत्यंतिक तळमळ लागून राहिली व ती गोष्ट मिळवल्या वाचून अन्नपाणी गोड लागणार नाही अशी मनाची अवस्था झाली की आपसूकच माणूस अंतर्मुख होतो.बाहेर धावणारे मन प्राप्तव्याकडे एकवटते.लोक काय म्हणतात याचा विचार न करता तो आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकतो व प्रयत्न करु लागतो.या कथेत जीभ कापून देवीला अर्पण करतो असा प्रसंग आहे.तो शब्दश: न घेता फालतू विचार आणि करणाऱ्या मनाला कह्यात आणून त्याचे सर्व सामर्थ्य ईप्सित कार्याकडे वळवले तरच अशक्य तेही शक्य होते हा अनुभव येतो.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment