श्रीगुरु दत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
-------------------------------------------
अध्याय १५ व १६
चौदाव्या अध्यायातील विप्राची कथा ही प्रातिनिधिक आहे.श्रीगुरुंनी असे अनेक चारित्र्य संपन्न व ज्ञानी शिष्य घडवले.गुरु-शिष्यांची ही गौरवास्पद परंपरा अखंड सुरुच आहे.पंधराव्या अध्यायात तीर्थमहिमा सांगितला आहे.भारतात असंख्य तीर्थक्षेत्रे आहेत.नदीतटाकी हजारो वर्षापासून असंख्य ऋषीमुनींनी तपश्चर्या केली.त्यांच्या पुण्यपावन स्पर्शाने व सानिध्याने पवित्र झालेली स्थाने म्हणजे तीर्थक्षेत्र.संन्यास्यांनी एका ठिकाणी पाच दिवसापेक्षा अधिककाळ राहू नये असा नियम आहे.या नियमालाही एक महत्वाचे कारण आहे.सतत भ्रमण करीत जनसामान्यांना पात्रतेनुसार भक्ती व ज्ञानाच्या मार्गी लावणे,थोडक्यात नराचा नारायण घडवण्याचे कार्य करीत व्रतस्थ जीवन व्यतीत करत असताना अशा सिध्द योगी पुरुषांच्या भोवती मुमुक्षु किंवा जीवन सन्मार्गाने जगण्याची कांक्षा बाळगणारे उपासक फार कमी गोळा होतात.शंभरातली पंचावण्णव मंडळी सद्गुरुंनी काही चमत्कार करावा आणि आपली प्रापंचिक समस्या सोडवावी अशी ईच्छा बाळगणारे म्हणजेच अर्थार्थी भक्ती करणारेच असतात.अशा मंडळींच्या संपर्कात आल्या नंतर चित्त आणि शरीर शुध्दीची गरज असते.तीर्थक्षेत्री निसर्गाच्या सान्निध्यात,एकांतवासात योग साधना करुन खर्ची पडलेली उर्जा पुन्हा कमवावी लागते.औरा स्वच्छ करावा लागतो. उदर व्यथेच्या ब्राह्मणाला कृपाशिर्वाद देऊन १५ वर्षा नंतर पुन्हा भेटू असे आश्वासन देतात आणि वैजनाथला येतात. "ऐसे परी सांगोनी श्रीगुरु निघाले तेथोनी | जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते | "या ओवीत वैजनाथला आरोग्य भवानी असे म्हटले आहे.हे आरोग्य प्रामुख्याने चित्ताचे आहे.कारण कितीही योगसाधना केली तरी देह नाशिवंत आहे आणि त्याला काही न काही रोग जडणारच.हा देह योग्यवेळी सोडावाच लागतो,आत्मा अमर आहे, याची तीव्रतर जाणीव सिध्दयोग्यांना असते आणि म्हणून ते लोकांपासून दूर,निसर्गाच्या सानिध्यात,एकांतात राहणे पसंत करतात हे इथे समजून घेतले पाहिजे. सर्वसामान्य माणसाला सुध्दा शरीर व मनाची शुध्दी आवश्यक आहेच.आज योगासने,प्राणायाम यांचे महत्व जगात सर्वांना कळले आहे ही गोष्ट स्वागतार्ह आहे..त्या विषयी मुद्दाम सांगायला नको.पण भौतिक सुखाची जेवढी ओढ आपल्याला असते तेवढी ओढ आत्मसुखाची नसते ही गोष्ट मान्य करुन अमर्याद भौतिक सुखाच्यामागे धावणे थांबवले पाहिजे.आपण सत्व रज व तम गुणांनी युक्त आहोत.सदाचार,प्रामाणिकपणा,औदार्य,दया,क्षमा,शांती व प्रेम हे गुण सत्व.रज गुण म्हणजे सतत शरीराची व मनाची तहान व भूक भागविण्यासाठी अस्वस्थ राहून कर्म करीत राहणे आणि तम म्हणजे प्रगतीला खीळ घालणारे आळस,कपटीपणा,दुष्टपणा,नैराश्य इत्यादी गुण.या तीन गुणांचा असमतोल आतल्या व बाहेरच्या जगात सतत समस्या निर्माण करतो.यातल्या कुठल्याच गुणाच्या आहारी न जाता त्यांचा व्यवहारात खुबीने वापर करुन आपले व्यक्तीगत व सामाजिक जीवन समृध्द करतो तो खरा शाहणा माणूस.संत नाही होता आले तरी शाहणे तर होता येईल प्रत्येकाला?- सद्गुरु,सद्ग्रंथ,शिष्याचा सद्विविवेक जागा ठेवून हेच कार्य करत असतात.पण यासाठी आपल्यातील सत्शिष्य कसा असावा हे समजून घ्यायला पाहिजे.१६ व्या अध्यायातील गुरुची निंदा करणाऱ्या ब्राह्मणाला धौम्य ऋषी आणि त्यांच्या तीन शिष्यांची सांगितलेली गोष्ट या दृष्टीने लक्षात घेतली पाहिजे.शिष्याच्या इहपर कल्याणाची तळमळ असलेले ऋषीवर धौम्य आणि गुर्वाज्ञा किंचितही तक्रार न करता शिरसावंद्य मानणारे,आरुणि,बैद व उपमन्यू आपल्या ह्रदयातच विद्यमान आहेत.हाच या दोन्ही अध्यायाचा आशय.आपल्या तीन शिष्यांना तीन कामे सांगितली होती.पहिल्या शिष्याला शेताला पाणी द्यायला सांगितले.दुसऱ्याला पिकलेले धान्य गाड्यात भरुन घरी आणायची जबाबदारी दिली.तिसऱ्याला गुरांना चरायला घेऊन जाऊन संध्याकाळी घरी आणायला सांगितलं.पहिल्या दोन शिष्यांना नैसर्गिक आपत्तीशी सामना करावा लागला.तिसरा शिष्य खादाड होता त्यामुळे स्थूल होत होता म्हणून त्याला अत्यल्प आहार घेऊन दिलेले काम पूर्णत्वास न्यायचे होते.थोडक्यात तिघांपुढे तीन आव्हाने होती.जीवनात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना असेच संकटांचे हरघडी आव्हान उभे राहते.ही संकटे कधी दैवी असतात कधी कार्मिक म्हणजे आपल्याच चुकीच्या वर्तनाने निर्माण होतात.अशा वेळेला आपणच धौम्य ऋषी व आपणच शिष्य होऊन समोर आलेल्या समस्येचे स्वरुप समजाऊन घेऊन मार्ग काढावा लागतो.हा मार्ग चोखाळताना जीवावर बेतण्याचे प्रसंग येतात.पण न डगमगता त्यातून सहीसलामत सुटण्यासाठी प्रयत्न करावा लागतो.असे प्रामाणिक प्रयत्नच कर्तव्यपूर्तीचे समाधान देतात.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment