श्रीगुरुदत्त बोधामृत

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
----------------------------------------
अध्याय ३५ व ३६
या अध्यायात ज्या स्त्रीला रुद्राक्ष महिमा सांगितला तीच स्त्री स्वामींना मंत्रोपदेश मागते त्यावर श्रीगुरु स्त्रियांना मंत्रोपदेश कां करु नये हे कच,देवयानी व दैत्यगुरु शुक्राचार्य यांची कथा सांगतात.शुक्राचार्यांना महादेवाने मृत व्यक्तीला जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्राचे सामर्थ्य प्रदान केले होते.यामुळे देव दैत्यांचा युध्दात पराभव करण्यास असमर्थ ठरत होते.ब्रह्मदेवाला ते यावर उपाय विचारतात. तेंव्हा मंत्र षटकर्णी झाला तर त्याचा प्रभाव नष्ट होईल असे सांगतात. या कामगिरीवर कचाला पाठविले जाते.तो शुक्राचार्यांचा शिष्य होतो पण हे इतर दैत्य शिष्यांना कळते व ते त्याचा वध करुन त्याचे भस्म मदिरेतून गुरु शुक्राचार्यांना पाजतात.कचाच्या प्रेमात पडलेली देवयानी त्याला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट धरते.शुक्राचार्य अंतर्दृष्टीने ते पाहतात की कच आपल्या पोटात आहे.याला जिवंत केले तर आपण‌ मरु असे सांगून ते देवयानीला नकार देतात.देवयानी यावर तो मंत्र तुम्ही मला शिकवा म्हणजे त्याच्या सामर्थ्याने मी तुम्हाला जिवंत करीन.वडिलांनी शिकवलेला मंत्र कच पोटात असताना ऐकतो व स्मृतीत जतन करतो. देवयानी पित्याला मंत्र सामर्थ्याने जिवंत करते खरी पण कच तिच्याशी विवाह प्रस्तावाला नकार देतो. संतापून त्याला तुझी सर्व विद्या निरुपयोगी ठरेल असा शाप देते.तेंव्हा कचही शाप देतो. संजीवनी मंत्र षटकर्णी झाल्यामुळे तो प्रभावशून्य होईल.या कथेचा आशय समजून घेण्यासाठी मंत्र म्हणजे काय हे पाहिले पाहिजे.'विचार बदला, नशीब बदलेल' असं  आज आपण‌ सर्व मान्य करतो.त्यामागे मन्वंतर घडवण्याचे मानसशास्त्र आहे.जो विचार किंवा कल्पना आपण सातत्याने करतो त्याप्रमाणे कर्म करायला आपण उद्युक्त होतो.ते कर्म योग्य दिशेने होण्यासाठी सकारात्मक विचारांचा उपयोग होतो.पण हाच विचार किंवा संकल्प आपण सर्वांना सांगत सुटलो तर त्याचा प्रभाव कमी कमी होऊन नष्ट होतो.म्हणून आपल्याला जी गोष्ट करायचीय ती फक्त आपल्यापूर्तीच ठेवावी.इतरांना सांगू नाही.कारण इतरांचे त्या विषयीचे मत,विचार,आपल्या मनावर चुकीचा परिणाम घडवू शकतात.पौराणिक कथांमधून येणारी देवदानवांची युध्दे म्हणजे भौतिकविकासवादी विरुध्द आत्मिकविकासवादी समूहांमधील प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष संघर्ष. जो आजही राजकिय सामाजिक चळवळीत दिसतो.स्त्रियांच्या पोटात काही राहात नाही असा अनुभवही या कथेमागे दिसतो.म्हणूनच स्त्रियांसाठी आपल्या धर्मात व्रतवैकल्ये सांगितलेत.याच अध्यायात चित्रवर्म्या राजाची मुलगी सिमंतीनीची कथा आहे.ही कन्या १४ व्या वर्षी विधवा होईल असे भविष्य होते.इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याचेशी सिमंतीनीचा विवाह होतो पण जलक्रिडा करताना तो नाहीसा होतो.त्याचे प्रेतही कुठे सापडत नाही‌.त्यामुळे सिमंतीनी सती जाऊ शकत नाही.शोकमग्न अवस्थेत खूप दिवस काढते.पती परत यावा म्हणून सोमवारचे व्रत करते.चित्रांगद वाहात वाहात खोल पाताळात तक्षकनगरीत जातो.तिथला राजा त्याची प्रेमाने चौकशी करुन‌ त्याला परत पाठवतो व एका सोमवारचे दिवशीच तिला तिचा पती भेटतो.मंत्र म्हणजे काय ते आपण बघितले.आता व्रत म्हणजे काय ते पाहू.व्रत करत असताना त्यासंबंधातले नियम पाळून,उपवास करुन,विशिष्ट उपास्य देवतेजवळच आपल्या मनोकामना व्यक्त करायच्या असतात.व्रताला देवपूजेचे अधिष्ठान असल्यामुळे व्रत कशासाठी करतो आहोत हे चार लोकांना कळले तरी देवच त्या ईच्छा पूर्ण करणार अशी श्रध्दा असल्यामुळे त्यात बाधा येत नाही.व्रतवैकल्ये करतानाही मनात जी काही ईच्छा असेल तिच्या विषयी सकारात्मक विचार तर असतोच पण देव ते निश्चित करणार आहे अशी अतीव श्रध्दा असते.मंत्र काय,व्रतवैकल्ये काय,त्यामागील सकारात्मक विचार आणि त्या दिशेने होणारे प्रयत्न हे महत्वाचे. हे प्रयत्न करताना शरीराला मनाला क्लेश होतात.ते आपण आनंदाने भोगतो.कारण यात आपलेच कल्याण होणार आहे अशी खूणगाठ मनात पक्की असते. थोडक्यात असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून स्वस्थ बसणे नुकसानकारकच.स्वकल्याण प्रयत्नाने साधणे म्हणजेच देव देव करणे..

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||





Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७