श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
--------------------------------------------
अध्याय ४१व ४२
श्रीमद्गुरुचरित्र ज्यांनी लिहीले त्या सरस्वती गंगाधरांचे पूर्वज सायंदेव साखरे यांची व त्वष्टा ब्रह्म्याची अशा दोन कथा या दोन अध्यायात येतात.शिवाय याच अध्यायात तीर्थयात्रा कशी करावी हेही सांगितले आहे.
एकदा मठात एक भक्त येऊन स्वामींची पाद्यपूजा करुन,स्तुती करुन मला आपल्या सेवेत राहायचे अशी इच्छा प्रकट करतो तेंव्हा ते सायंदेवाची कथा सांगतात.तुमचे पूर्वज असेच एकदा आमचेकडे आले होते व तुमच्यासारखीच आमची सेवा करण्यासाठी याचना करु लागले.तेंव्हा आम्ही त्यांना सांगितले की आमची सेवा अत्यंत कठीण आहे.कारण आमचा एका स्थानी वास कधीच नसतो.सतत भ्रमण चालू असते.निबिड अरण्यातही आमचे वास्तव्य असते.खूप कष्ट करण्याचे सामर्थ्य अंगी असेल तरच ते शक्य आहे.सायंदेव आनंदाने तयार झाले.तीन महिने आम्ही त्यांची सेवा घेतली.एकारात्री अरण्यात वास असताना आम्ही सायंदेवाला थंडी वाजत असल्यामुळे शेकोटीसाठी अग्नी घेऊन यायला सांगितला.अग्नी आणायला जाताना व परत येताना डाव्या उजव्या बाजूला पाहायचे नाही असेही त्यांना बजावले.पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागली.वीजा चमकत होत्या त्या प्रकाशात वाट काढत सायंदेव गावाच्या वेशीपाशी पोहोचला.तिथल्या द्वारपालाकडून अग्नी घेऊन ते परतीचा रस्ता चालू लागले.सहज डाव्याउजव्या बाजूला बघितले तर दोन महासर्प सळसळत त्याचे मागे येत असताना दिसले.भीतीने गाळण उडाली पण धावत धावतच ते श्रीगुरुंजवळ पोहोचले.अग्नीने शेकोटी पेटवली.स्वामींना नमस्कार करुन उभे राहिले.तेंव्हा ते महासर्पही स्वामींच्या चरणी लोळण घेऊन निघून गेले.तेंव्हा सायंदेवाला समजले की आपल्या रक्षणासाठीच गुरुदेवांनी महासर्पांची योजना केली होती.सद्गुरुसेवा याहूनही अवघड असते हे मनी रुजवण्यासाठी त्वष्टाब्रह्म्याची कथा स्वामी सांगतात.त्वष्टाब्रह्मा म्हणजे ब्रह्म्याचाच अवतार.व्रतबंध झाल्यावर त्याला गुरुगृही पाठवले.विद्याध्यायन सुरु असताना एक दिवस गुरुदेवांनी त्याला एक असे घर बांधायला सांगितले की जे कधीही कुठल्याही ऋतून जीर्ण होणार नाही नेहमी स्थिर राहिल.जे चिरकाल सुंदर दिसेल.हे ऐकून गुरुदेवांच्या पत्नीने एक कंचुकी अशी मागितली जी कधी विटणार नाही, फाटणार नाही.मुलाने अग्नीवरुन,हवेतून,पाण्यावरुन,चिखलातून चालले तरी टिकू शकतील अशा पादुका मागितल्या.तर मुलीने खेळायला घरकुल मागितले.त्वष्टाब्रह्मा बाहेर पडला खरा पण या वस्तू कशा तयार करायच्या हे कळेना.गुर्वाज्ञेचे पालन कसे करावे या विचारात असताना त्याला एक जटाधारी अवधूत भेटला.या वस्तू म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सृष्टी जशी सतत नवसृजनात निमग्न असते तशी नवनिर्माणाची कला अवगत करणे आहे.या सर्व विद्या तुला तीर्थयात्रा केल्यानंतर प्राप्त होतील असे सांगून अवधूत तीर्थयात्रा कशी करायची ते सांगतात.चमत्कार असा होतो की ज्या ज्या तीर्थाचे ते वर्णन करतात त्या त्या ठिकाणी त्वष्टा पोहोचतो.नवनिर्माणाच्या सर्व विद्या प्राप्त करुन तो गुरुगृही परत जातो.
या कथेचा बोध इतकाच की सदाचारी,सदाजागृत ,विद्यासंपन्न माणूस घडवण्याच्या प्रक्रियेत शिष्याने आपला वाटा उचलावा व समाज जागरणाचे कार्य पुढे न्यावे.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment