श्रीगुरुदत्त बोधामृत

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 
|| श्री स्वामी समर्थ || 
-------------------------------------------- 
अध्याय ११ व १२ 
श्रीगुरु दत्तात्रयांचा दुसरा देहधारी अवतार म्हणजेच कारंजा नगरातील माधव व अंबा यांच्या पोटी जन्मला.जन्मत:च ॐ कार म्हणणाऱ्या या बाळाच्या लीला बघून मातापिताच नाही तर सारे करंजा नगरातील लोक आश्चर्याने थक्क होऊ लागले.लोखंडाला हात लावताच त्याचे सोने होणे.दूध अत्यंत कमी येणाऱ्या मातेच्या स्तनांना या बाळाचा हात लागताच बत्तीस धारांनी दूध वाहू लागणे.अशा बाळलीला दाखवत बाळ सात वर्षाचे होते.पण ॐकारा खेरीज दुसरा कुठलाच शब्द ते बोलत नव्हते.भविष्यात हे विद्याभ्यास कसे करणार अशा चिंतेत असलेल्या आईवडिलांना खूणेनेच मुंज करायला सांगते.भिक्षावळीच्या समयी ते चारही वेद म्हणू लागते.आठव्या वर्षीच हा बाळ  तीर्थयात्रेसाठी गृहत्याग करतो.आईवडिलांना तुम्हाला विद्यासंपन्न असे चार पुत्र होतील व ते तुमची सेवा करतील असे आशिर्वाद देतो.आपला जन्म संसार करण्यासाठी नसून लोककल्याणासाठी आहे असे निक्षून सांगतो.वयाच्या तीसाव्या वर्षी मी तुम्हाला भेटायला येईन असा शब्द देऊन तीर्थाटनास निघून जातो.पुढे कृष्णसरस्वती या वयोवृधद यतींकडून रीतसर संन्यास ग्रहण करतो.नृसिंह सरस्वती असे त्याचे नामकरण होते.अनेक तीर्थांवर तप अनुष्ठाने करीत भ्रमण करत असतानाच माधव नामक विप्राला दीक्षा देऊन ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो.इथूनच नृसिंहसरस्वतींच्या अवतार कार्यास प्रारंभ होतो.अकराव्या व बाराव्या अध्यायातील संन्यास दीक्षेचा भाग समजून घेतला पाहिजे.वैदीक परंपरेत मनुष्याला आपले जीवन चार आश्रमातून व्यतीत करावे असे सांगितले आहे.ब्रह्मचर्याश्रम,गृहस्थाश्रम,वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम हे ते चार आश्रम.चार आश्रमात धर्म,अर्थ,काम व मोक्ष,चार पुरुषार्थ गाजवणे हे मनुष्याचे कर्तव्य सांगितलेले आहे.सामान्य माणसासाठी ही जीवनव्यापनाची सुंदर शिस्तबध्द व्यवस्था होती.पहिल्या आश्रमात विद्यार्जन हे प्रमुख कार्य.दुसऱ्या आश्रमात विवाहबध्द होऊन प्राप्त केलेले ज्ञान पुढील पिढीला निरपेक्षपणे देत  प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या.तिसऱ्या आश्रमात प्रपंचातून निवृत्त होऊन अलिप्ततेची साधना करायची आणि चौथ्या आश्रमात रक्ताची सर्व नाती तोडून जनसामान्यांच्या ह्रदयाशी नाते जोडून त्यांच्या कल्याणासाठी काया झिजवायची.ज्याची ईच्छा आणि पात्रता आहे अशी कुणीही व्यक्ती विद्यार्जना नंतर संन्यास घेऊ शकत होती व लोककल्याणासाठी जन्म व्यतीत करु शकत होती.आजच्या काळातही लग्न बंधनात न पडता लोककल्याणासाठी जन्म वेचणाऱ्या व्यक्ती आहेत.मनुष्याच्या जन्माचे सार्थक फक्त स्वत:साठी जगण्यात नाही तर लोककल्याणासाठी झिजण्यात आहे.मनाला अशा अत्युच्च अवस्थेत स्थिर करुन अखंड कार्यमग्न राहण्यातला आनंद उपभोगत व वाटत जगणे हाच मोक्ष.नृसिंहसरस्वती ज्या काळात जन्मले तो काळ धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रावर यवनांंकडून होणाऱ्या आक्रमणाचा होता.वैदीक परंपरेतून निर्माण झालेली व जपलेल्या समाज रचनेची घडी पार विस्कटून गेली होती.यवन राजे व त्यांच्या सैनिकांकडून अत्याचार व अन्यायाचे सत्र संपत नव्हते.सर्वत्र दहशत आणि भितीचे साम्राज्य माजले होते.स्त्रियांना तर अत्याचार सहन करत जगण्यापेक्षा मरण जवळ करणे हाच एक मार्ग राहिला होता.या पार्श्वभूमीवर नृसिंहसरस्वतीचे कार्य अलौकिकच म्हटले पाहिजे.तेच आता पुढील अध्यातून आपण पाहणार आहोत..
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७