श्री गुरुदत्त बोधामृत
||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||श्री स्वामी समर्थ||
--------------------------
अध्याय १ ला
श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाचा प्रारंभ मंगलाचरणाने झाला आहे.तसे प्रत्येक धार्मिक ग्रंथात मंगलाचरण असतेच असते.यात ग्रंथ कर्ता हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे सफल व्हावे म्हणून श्री गजानन,श्री सरस्वती,श्री कुलदेवता,श्रीपाद श्रीवल्लभ,श्री नृसिंह सरस्वती,अशा एकूण सहा आराध्य देवतांना, सकल कवींश्वरांना,श्रोत्यांना,सकल संतांना, सद्गुरुंना मनोभावे नमस्कार करुन कार्यसिध्दीसाठी आशिर्वाद मागतो.फक्त एखादी ग्रंथ रचनाच नाही तर आपले कुठलेच कर्म या दैवतांच्या कृपेशिवाय सफल होणार नाही अशी श्रध्दा त्याची आहे.अशा श्रध्देनेच आपल्याही दिनचर्येचा प्रारंभ व्हावा आणि आपले आचरण मंगल व्हावे.आपल्या बरोबर आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक जीवाचे मंगल व्हावे.
अशा उदात्त हेतूने जीवन जगायचे ध्येय ठेवले तर मनुष्याची नित्य नैमित्तिक कर्मे देखील अर्थपूर्ण होतात.तसा प्रत्येक माणूस लहानमोठी ध्येये उराशी बाळगून जीवन जगत असतो.पण आपण निवडलेले ध्येय उच्च असावे, त्यात पूर्तीच्या आनंदा बरोबरच अपूर्णतेची गोडीही असावी.आत्मज्ञानाची प्राप्ती हे असे ध्येय आहे.श्रीमद्गुरुचरित्राकडे वळणाऱ्या वाचकाकडून ग्रंथकर्ते सरस्वती गंगाधर यांना हीच अपेक्षा आहे.अत्यंतिक आर्ततेने सद्गुरुनाथांना साद घातली,त्यांची करुणा भाकली की श्री गुरु भक्तासाठी आपणहून धावत येतातच.मग तो अर्थार्थी असो किंवा मुमुक्षु सद्गुरुंना दोघेही प्रिय.मानवप्राणीच काय पृथ्वीवरील वृक्षवल्ली,पशूपक्षी, अशा सर्व जीवमात्रांवर त्यांची सारखीच कृपा.सारखेच प्रेम.या प्रेमाला भौगोलिक सीमा नाहीत.या प्रेमाचीच सत्ता सर्व जगावर चालते.अशा अलौकिक प्रेमाच्या साक्षात्कारासाठी,सरस्वती गंगाधरांसारखे सद्गुरुंच्या दर्शनासाठी आणि कृपेसाठी आपले हृदय व्याकुळ व्हायला हवे.पहिल्या अध्यायात ही व्याकुळी आपल्याला अनुभवता येते.या ओव्याच पहा : " पाव वेगी आता || नरहरी अनंता || बाळालागी माता केवी टाकी || " किंवा " बाळक तान्हेये || नेणे मायबापे || कृपा केवी होय || मातापित्या || " बाळापासी माता काय मागे ताता || ऐक गुरुनाथा || काय देऊ || " किती तळमळ,तडफड आहे या शब्दात..! सरस्वती गंगाधर सर्व भीड,संकोच दूर सारुन लहान लेकरासारखे टाहो फोडतायत.सगळं अंत:करण उघडं करुन साकडं घालतायत.असंच अगदी मनापासून आपण समरस होऊन श्रीगुरुचरित्र वाचले तर सद्गुरुंची प्रतिष्ठापना मग आपल्याही ह्रदयात होते सद्गुरुं बरोबर सुख संवाद सुरु होतो आणि दुष्कर जीवनाची वाट सुकर व्हायला सुरुवात होते.हेच प्रथम अध्यायाचे सार म्हणता येईल.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या:९०९६८००६५३
Comments
Post a Comment