श्रीगुरुदत्त बोधामृत

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय ३३ व ३४ वा
मृत पतीला योग सामर्थ्याने जिवंत केल्या नंतर.तो व त्याची पत्नी नृसिंह सरस्वतींना भेटायला आले.तेंव्हा पत्नी त्यांना विचारते की सहगमनाची तयारी करण्यासाठी तुम्ही ४रुद्राक्ष मणी व विभूती दिली होतीत तुम्ही़, ती कां?-कशासाठी?- असे विचारतात.तेंव्हा सद्गुरु रुद्राक्ष व  विभूती महिमा सांगतात. यात भद्रसेन राजा व त्याचा मंत्री यांच्या दोन मुलांची कथा येते.ही दोन मुले अलंकार अजिबात घालत नाहीत फक्त रुद्राक्ष परिधान करतात.असे कां? याचे कारण त्यांच्या पूर्व जन्मातील कर्मात आहे असे पराशर ऋषी सांगतात.मागील जन्मी हे दोन्ही पुत्र नंदीग्राम मधील एका लावण्यवती श्रीमंत वेश्येकडे कुक्कुट व मर्कट होते.हीला जे जे उत्तम ते ते मिळवण्याचा सोस होता.असे असले तरी ही वेश्या शिवभक्त होती.तिने या दोघांच्या गळ्यात रुद्राक्षमणी बांधले होते.त्यांना नृत्य शिकवत असे.एक दिवस तिची परिक्षा घेण्यासाठी भगवान शंकर एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या रुपात येतात.त्यांच्या हातात एक रत्नजडीत शिवलिंग होते.तिला त्या शिवलिंगाचा मोह पडतो.ती ते मिळवण्यासाठी आपण तीन दिवस तुमची पत्नी म्हणून सर्व प्रकारे सेवा करु असे वचन देते.रात्री समगमाच्या वेळेला शिवलिंग ती काढून ठेवण्यास सांगते.तेंव्हा हे माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असून याचे काही नुकसान झाले तर आपण प्राणत्याग करु असे व्यापारी होऊन आलेले भगवान शंकर सांगतात.त्याच रात्री शयनमंडपाला आग लागून शिवलिंग जळून खाक होते.व्यापाऱ्याच्या रुपात आलेले शंकर भगवान आपणच लावलेल्या आगीत भस्मसात होतात.तीन दिवसांसाठी असला तरी हा व्यापारी आपला पती होता हे लक्षात घेऊन ती पण अग्नीज्वालात उडी घेते पण दयाघन शिवशंकर तिला वरचेवर झेलून अभय देतात.या प्रसंगी लागलेल्या आगीत कुक्कुट व मर्कट असलेले दोन पुत्र मरतात व राजा भद्रसेन व त्याच्या मंत्र्याच्या कुळात जन्म घेतात.अंत:करणापासून भक्ती केली तर एखाद्या वेश्येचाही उध्दार होतो हे तर ही कथा सांगतेच पण पूर्व जन्मातील खुणा मनुष्याच्या दैनंदिन वर्तनातून कशा दिसतात याकडेही निर्देश करते. पुढे राजा पराशर ऋषींना राजपुत्राचे भविष्य विचारतात तेंव्हा ते तुझा पुत्र बाराव्या वर्षी मरण पावणार आहे असे सांगतात तसेच मृत्यूच्या दाढेतून पुत्रास बाहेर काढायचे असेल तर शंभर विद्वान ब्राह्मणांकडून दहासहस्त्र रुद्राचे पठण करवून घ्यायला सांगतात.त्याप्रमाणे राजा करतो व त्याचा पुत्र पुढे दहा हजार वर्षे राज्य करतो.या कथेच्या निमित्ताने रुद्राक्षाचा महिमा आलेला आहे.त्याकडे एक दृष्टीक्षेप टाकू. दक्षराजाच्या यज्ञात सतीने उडी घेतल्यानंतर भगवान शंकराला तिच्या विरहाने त्याला अश्रू अनावर झाले ते अश्रू ज्या भूमीत पडले त्यांचेच रुद्राक्षाचे औषधी वृक्ष झाले.या किंवा राजा भद्रसेन व मंत्र्याच्या पुत्रांच्या पौराणिक कथेच्या सत्यासत्यतेचा भाग सोडला तरी रुद्राक्षाचे आरोग्याच्या दृष्टीने काही फायदे जरुर आहेत.इलाओकार्पस गॅनिट्रस नावाच्या वृक्षाच्या बिया म्हणजेच रुद्राक्ष.याचा वातपित्त,मनोविकार,रक्तदाब,अपस्मार,ताप व यकृताच्या रोगांवर आयुर्वेद शास्त्रात केला जातो.शरीरातील विविध सकारात्मक उर्जेचे संतुलन राखण्यासाठी व संरक्षक कवच म्हणून देखील याचा उपयोग केला जातो. भगवान शंकर रुद्राक्ष अंगावर धारण करत होते त्यामुळे अध्यात्मिक साधकांमधे रुद्राक्षाला महत्व प्राप्त झाले.हे एकमुखी,त्रिमुखी पंचमुखी,चौदामुखी व २१ मुखी असतात.पूर्वीच्याकाळी किंवा आजही साधु संन्यासी हे धारण करताना दिसतात.निसर्गाच्या सानिध्यात सतत विहार करत असल्यामुळे,कोणती फळे,पाणी,सेवनास योग्य कोणते स्थान निवासास पवित्र हे रुद्राक्षाच्या साह्याने  ठरवता येत असे.आज प्रचलित असलेल्या डाऊझिंग किंवा लोलक विद्येमधेही रुद्राक्ष मण्यांचा,माळेचा उपयोग केला जातो.रुद्राक्ष धारण करण्यामागे धार्मिक श्रध्देचा भाग असला तरी त्याचा साधक आपली साधना किती मनापासून व निष्ठेने करतो त्यावर साधकाची प्रगती अवलंबून आहे.एरवी रुद्राक्ष धारण करणे म्हणजे केवळ एक बाह्य आभूषण ठरेल.हीच गोष्ट विभूती किंवा भस्म विलेपना बाबतीत लक्षात घेतली पाहिजे.स्मशानातील राख म्हणजेच भस्म अंगाला फासून ऋषीमुनी अरण्यात,हिमालयासारख्या पर्वत शिखरांवर तप करीत असत.तपश्चर्येसाठी असा संचार करत असताना त्वचा रोगांपासून भस्मामुळे संरक्षण होत असे.भस्माचेही विविध प्रकार आहेत. कोणताही पदार्थ जाळला तर त्याची राख म्हणजेच भस्म किंवा विभूती होते.श्रौत,स्मार्त व लौकिक श्रुती द्वारे केलेल्या यज्ञातील भस्म म्हणजे श्रौत.स्मृतीद्वारे केलेल्या यज्ञातील भस्म स्मार्त व काष्ठाद्वारे केलेल्या यज्ञातील भस्म हे लौकिक.आयुर्वेदात विविध औषधी ही भस्मरुपात देतात.जे रुद्राक्षाच्याबाबतीत तेच भस्मविलेपनाबाबतीत म्हणता येईल.अंगाला नुसते भस्म फासून कुणी साधु होत नाही.त्यासाठी निष्ठेने योगसाधना,ध्यानधारणाच करावी लागते. या संदर्भात कवी मंगेश पाडगावकरांचे " कुठे शोधीसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी " हे गीत आठवते.त्यात ते म्हणतात," रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा.. कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती..हाय अभाग्य भगवे नेसून घर संन्यासुन जाशी " श्रीगुरुचरित्रातील ३३/३४ व्या अध्यायातील हा आशय लक्षात घेऊन रुद्राक्ष परिधान करावे की नाही,तसेच भस्म विलेपन करावे की नाही हे आपापल्या श्रध्दे प्रमाणे व अंतरात्म्यात स्थित असलेल्या सद्गुरुंच्या आज्ञे प्रमाणे ठरवावे.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७