श्रीगुरुदत्त बोधामृत

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय ४५ व ४६ वा
मागे जशी कुष्ठ व्याधीतून एका भक्ताला मुक्त केल्याची कथा आपण पाहिली तशीच याही अध्यायात श्वेतकुष्ठाने ग्रस्त असलेल्या भक्ताची कथा आहे.नंदीनामा श्वेतकुष्ठ झाल्यामुळे अत्यंत दु:खी अवस्थेत तुळजापूरच्या देवीची कठोर आराधना करतो.त्याचे गाऱ्हाणे ऐकून देवी त्याला चंद्रलापरमेश्वरीच तुला व्याधी मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल असा स्वप्नात दृष्टांत देते.तो चंद्रला परमेश्वरीला साकडे घालतो.तेंव्हा ती त्याला गाणगापूरात एक दत्तात्रयांचे अवतार आहेत त्यांच्याकडे जा असा स्वप्नात आदेश देते.
तेंव्हा तो चिडतो, देवीपुढे प्राणत्याग करीन अशी भाषा करु लागतो.पण तिथे जमलेल्या सर्व भक्तांनाही असाच आदेश स्वप्नात मिळालेला असतो.ते त्याला गाणगापूरला पाठवतात.त्याला बघताच स्वामी," कां रे नंदी,माणूस काय करणार अशी शंका होती ना तुझ्या मनात‌? मग आता आमच्याकडे कां आलास? " हे ऐकताच नंदी त्यांच्या पायांवर लोटांगण घालतो.क्षमा याचना करतो.मग ज्या भक्तांना असा कुष्ठी माणूस डोळ्या समोर पण नको होता त्यांनाच नंदीला संगमावर नेऊन अंघोळ घालायला सांगतात.त्याचे कुष्ठ बरे होते.अत्यंत हर्षभरीत होऊन तो स्वामींपुढे पुन्हा लोळण घेतो.तेंव्हा ते त्याला सगळ्या अंगावरचं कुष्ठ पूर्ण गेलंय की नाही ते बघायला सांगतात.मांडीवर थोडेसे राहिलेले असते.ते पाहून नंदी स्वामींना विचारतो की असे कसे झाले?- तेंव्हा स्वामी त्याला, " कवित्व करायचा आदेश देतात " कवित्व करु लागल्यानंतर त्याचे थोडे राहिलेले कुष्ठही पूर्ण बरे  होते.आज वैद्यकशास्त्र इतके पुढे गेलेले असूनही श्वेतकुष्ठ पूर्ण बरे झालेले आपण पाहिलेले नाही.कुष्ठरोगाची लक्षणे वेळीच लक्षात आली तर हा रोग बरा होऊ शकतो इतपत प्रगती झालेली आहे.हे दोन्ही प्रकारचे रोग संसर्गजन्य नाहीत हेही हळूहळू लोकांना कळू लागले आहे.त्याकाळी असा काही चमत्कार खरंच झाला होता कां?- असा प्रश्न विज्ञानयुगात पडू शकतो.पण या गोष्टीकडे चमत्कार म्हणून न बघता अशा रुग्णांना माणूसकीने,प्रेमाने जवळ केले पाहिजे.इतकेच काय माणसाच्या एखाद्या व्यंगाकडे किंवा रोगाकडे पाहून नाक मुरडण्यापेक्षा त्यांच्यातल्या असामान्य गुणांचे कौतुक केले पाहिजे.त्यांना आदराने वागवले पाहिजे.प्रत्येक मनुष्यात काही विशेष गुण असतात त्यांचा विकास होण्यासाठी माणूस म्हणून आपण मदत केली पाहिजे.असाध्य रोगावर किंवा जन्मजात व्यंगावर मात करुन असामान्य कर्तृत्व गाजवणारी माणसं आज आपण बघतो.त्यांचे कौतुकही करतो.पण हा बदल अचानक नाही झाला.समाजाची मानसिकता बदलण्यासाठी व जीवनावरील श्रध्देचा पाया मजबूत करण्याचे कार्य नृसिंहसरस्वतींनी शेकडो वर्षे आधीच सुरु केले होते हे लक्षात घ्यायला हवे.
यापुढच्या अध्यायात म्हणजे ४६ व्या अध्यायातही एका कवीचीच कथा येते.हीप्परगी गावात नरकेसरी नांवाचा कल्लेश्वराचा भक्त कवी होता.रोज कल्लेश्वराची मनोभावे पूजा करुन तो आपल्या दैवताची महती काव्य रचून गात असे.काही गावकरी त्याला म्हणतात गाणगापूरला एक दत्तावर प्रकटला आहे.त्याची कवित्वावर प्रीती आहे.तू त्यांच्याकडे जा.त्यांचा महिमा तुझ्या कवित्वातून गा.यावर नरकेसरी नकार देतो.माझी जीभ मी कल्लेश्वराला विकलीय.त्याला सोडून मी एखाद्या माणसावर कवित्व करणार नाही.पण त्याच रात्री स्वप्नात आपण कल्लेश्वराची पूजा करत असताना लिंगस्थानी नृसिंहसरस्वतीच बसलेत असे पाहतो.नृसिंहसरस्वतींना आपण सामान्य माणूस समजून कमी लेखले याचा पश्चाताप होऊन नरकेसरी गाणगापूरला येऊन आपण साक्षात त्रेयमूर्तीचे अवतार आहात असे म्हणून  स्वामींच्या पायावर लोटांगण घालतो.गूरु आणि देव हे भिन्न नाहीत.किंबहूना सद्गुरुच या जगाचे तारणहार आहेत याची खात्री त्याला पटते.सद्गुरु प्रसन्न होऊन त्याला भरभरुन आशिर्वाद देतात.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७