श्रीगुरुदत्त बोधामृत

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 
|| श्री स्वामी समर्थ || 
------------------------------------------- 
अध्याय १४ वा 
मागील अध्यायात ज्या उदरव्यथेने पिडलेल्या ब्राह्मणाला स्वामींनी व्याधी मुक्त केले त्याचीच कथा पुढे येते.एका अतिशय क्रूर यवन राजाच्या पदरी केवळ अगतिक असल्यामुळे सेवा करत असून दरवर्षी एका ब्राह्मणाचा घात तो करतोच.आता माझी वेळ आली आहे पण सुदैवाने तुमच्यासारखा कृपासिंधु भेटल्यामुळे आता निश्चिंत झालो आहे.व्याधी मुक्त केलेत तसे या क्रूरकर्म्याच्या तावडीतूनही मला सोडवा.हे ऐकताच महाराज त्याला अभय देतात.तू निर्धास्त होऊन त्याच्याकडे जा तो तुला मारणार तर नाहीच पण सन्मानाने परत पाठवेल.तू येत नाहीस तो पर्यंत आम्ही इथेच आहोत असे आश्वासनही देतात.गुरुदेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून विप्र जातो.पण त्या यवनाला धारधार तलवारीने आपले अवयव कुणीतरी कापतो आहे स्वप्न पडते. मरणप्राय वेदना होऊन तो उठतो तेंव्हा ब्राह्मण समोर उभा असलेला पाहतो.' तुला इथे कुणी पाठवले? वस्त्रे भूषणे देऊन तुझा सन्मान करतो पण तू इथून निघून जा ' यवनराजाचे असे बोल ऐकताच विप्र श्रीगुरुंकडे परत जातो.संपूर्ण गुरुचरित्रातील त्रेपन्न अध्यायात हा चौदावा अध्याय म्हणजे मेरुमणी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.ज्या मृत्यूला माणूस घाबरतो तो मृत्यू म्हणजे जीवनाचा शेवट नसून नित्यनूतन जीवनाची सुरुवात आहे.देहाचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे.आत्मा अमर आहे.जो कर्दनकाळ वाटतो तो कर्दनकाळ नसून नवीन जन्माची वस्त्रे व नव्या ज्ञानाची भूषणे देणारा कृपासिंधू आहे.जगायचं कसं या प्रश्नाचं उत्तर मरायचं कसं हे जाणून  घेण्यात,शिकून घेण्यात आहे.कधी तरी मरायचंच मग आज आत्ताच कां नाही त्याच्यापुढे निधड्या छातीने हसत हसत उभं राहायचं?- आपत्ती,मग दैवी असो किंवा मानवी तिच्या मस्तकावर नर्तन करत जगण्यात खरा पुरुषार्थ आहे." तमसो मा ज्योतिर्गमय | असतो मा सद्गमय | मृत्यूर्मा अमृत गमय ! हा चिरंतन सत्याचा मार्ग दाखवणारा हा अध्याय आहे.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७