श्रीगुरुदत्त बोधामृत

|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
-------------------------------------------
अध्याय २३/२४/२५/२६/२७
वांझ म्हैस दूध देऊ लागली आणि तिला रेडा म्हणून मोलाने देण्यास तो दरिद्री ब्राह्मण तयार होत नाही.त्याच्या परिस्थितीत दिवसेंदिवस सुधारणा झाल्याची वार्ता गावभर पसरते.हा चमत्कार एका यतीमुळे घडून आल्याचे कळताच त्या नगरीचा राजा सद्गुरुंना साष्टांग दंडवत घालतो.या ब्राह्मणाचा जसा उध्दार केलात तसा आमच्या गावातील सर्वांचा करा असे विनवतो.त्याचे मनोरथ पुरवण्याचे ठरवून स्वामी त्याच्या गावी येतात.गावाच्या पश्चिम दिशेला एका अश्वत्थ वृक्षाजवळ एक ओस पडलेले घर दिसते.गुरुदेव तिथेच राहण्याचे ठरवतात.त्यांना पाहताच तिथे राहणारा ब्रह्मराक्षस मला सद्गती द्या अशी करुणा भाकतो.श्रीगुरुही त्याला मुक्ती देतात.थोडक्यात धर्माच्या संदर्भातल्या अनेक वेड्या समजुतींना घट्ट चिकटून बसलेल्या माणसांमधे परिवर्तन घडवून आणतात.सद्गुरु कृपेनं स्वत:ची ओळख झाली आणि नित्य नवे ज्ञान प्राप्त करण्यात जीवनाचा खरा आनंद आहे हे कळले की माणूस क्षुद्र,क्षणभंगुर सुखाकडे पाठ फिरवतो.गावातली सगळी माणसं सद्गुरुंच्या विचारांचा अनुनय करु लागतात.गाणगापूरातील परिवर्तनाची किर्ती कुमसी या गावातील त्रिविक्रमभारती नावाच्या संन्याशाला कळते.पण तो सद्गुरुंची मनातल्या मनात निंदा करु लागतो.ही गोष्ट स्वामींना अंतर्ज्ञाने समजताच ते कुमसी गावात त्याच्या भेटीला निघतात. नेहमीप्रमाणे त्रिविक्रमभारती नरहरीची मानसपूजा करीत असताना नरहरीची मूर्ती काहीकेल्या डोळ्यापुढे येत नाही हे पाहून तो अत्यंत अस्वस्थ होतो.पण श्रीगुरु फक्त  नरहरीच्याच नाही तर माणूस ज्या ज्या रुपात ईश्वराला पाहतो त्या सर्वच रुपात त्याला दर्शन देतात.सद्गुरुंचे असे विश्वरुप पाहून त्रिविक्रम त्यांच्या पायावर लोळण घेतो.अनन्यभावाने शरण गेल्याशिवाय परमेश्वराच्या खऱ्या स्वरुपाचा अनुभव येत नाही.नृसिंहसरस्वतींनी आपल्या कार्यकाळात अनेक शिष्यांना भक्ती व परमज्ञानाचा जीताजागता अनुभव दिला.  धर्मावरील श्रध्देचा पाया बळकट केला. पुढील चोवीस,पंचवीस व सव्विसाव्या अध्याया पर्यंत विदुरा नगरीच्या मुस्लीम राजाचे लांगुलचालनात स्वत्व गमावून बसलेल्या दोन अहंमन्य ब्राह्मणांचे गर्व हरण करुन त्यांना कायमची कशी अद्दल घडवतात त्याची कथा आहे.परोपरीने समजावूनही ते गर्विष्ठ विप्र वेदांवर चर्चा करुन आम्हाला हरवा नाही तर पराभव मान्य करा,आम्हाला जयपत्र लिहून द्या असा हट्ट धरुन बसतात.मग एका शूद्र जातीत जन्मलेल्या माणसाला पूर्व जन्मीचे ज्ञान देऊन त्याच्या तोंडून वेद ऐकवून त्यांना पराभूत करतात. यात वेद नुसते मुखोद्गत असणं आणि वेदांचे प्रत्यक्ष ज्ञान असणं यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे हे स्पष्ट होतेच पण यात ब्रह्मांडाचे ज्ञान जसजसे होते तसतसे अज्ञान अजून शिल्लक आहे याची प्रखर जाणीव वैदिक ऋषीमुनींना होती.आजचे वैज्ञानिकही हीच गोष्ट मान्य करताना दिसतात.
थोडक्यात मुस्लीम संस्कृतीच्या आक्रमणाला हे प्रत्यक्ष कृतीतून दिलेले उत्तर होते.हे ऐतिहासिक दृष्ट्या अलौकिक होते.

|| दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७