बालकवींचे भावचरित्र
२
बालकवींचे भावचरित्र
----------------------
आता जिजी आणि बालकवींच्या नात्याची
पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण बालकवींच्या मनोवस्थेकडे येऊ.घरात लग्नाचं वातावरण.जोडीला मित्र आणि लतावेलींनी,फुलापानांनी बहरलेली बाग.काही गोष्टी अगदी स्वत: जवळच बोलायच्या असतात.थोड्याच दिवसांत आपलंही लग्न होईल.ती आपली जोडीदारीण कशी असेल? - ती कुणीही असो पण ती आपल्या जिजीसारखी आपल्याला समजून घेणारी असेल कां?- असायला हवी.आपली जिजी तरी किती दिवसाची सोबती?- एक ना दोन अशा अनेक प्रश्नांची गर्दी त्यांच्या मनात झाली असली पाहिजे आणि भावी जीवनातल्या आपल्या काल्पनिक प्रेयसीचं अत्यंत धूसर चित्र त्यांच्या डोळ्यापुढं उभं राहिलं.मग तिला पानाफुलात,चंद्रचांदण्यात,डोंगरदऱ्यातून वाहात येणाऱ्या नदी-निर्झरात,शोधायला सुरुवात झाली..अंतर्मनात उसळणारी भावनांची गर्दी स्वस्थ बसू देईना.जवळ मित्र होता पण त्याला काय आणि कोणत्या शब्दात?- जे जाणवत होतं ते तर शब्दांच्या पलिकडलं होतं.मग सरते शेवटी एक साधा प्रश्न ओठावर आला,' आपण बागेवर कटाव करायचा कां?'
लहानगा त्र्यंबक नुसता प्रश्न विचारुन थांबला नाही तर त्याच्या ओठावर शब्द येऊ लागले-
' निंब जांभ जांभूळ शेंदरी
तुळशी बहुतचि झाक मारी
जणू काय ती येइ धावूनी
असेच वाटे पहा साजणी..'
इथे कवी जे काही बोलू पाहातोय दाखवू पाहतोय ते 'साजणी'ला.कवितेत शब्द काही एकटे येत नाहीत.कविच्या मनातील भावभावना विचार आदी सर्वच घेऊन येतात.' साजणी ' हा शब्द त्याच्या काल्पनिक प्रेयसीला घेऊन आला आहे.या साजणीला चिंच,खैरी वगैरे वनराजीतून फिरवून आणून पुढे बालकवी तिची भेट कृष्णा बरोबर घालून देतात-
' अशा वनी मी ऐकिली मुरली
तिला ऐकुनी वृत्ती निमाली
काय कथू त्या सुस्वर नादा
पुढे पाहिले रम्य मुकुंदा..'
भारतीय संस्कृतीत व समाजरचनेत राम-सितेच्या प्रेमाचा आदर्श अनुकरणीय मानला आहे.तो निकोप मानवी संबधासाठी योग्यही आहे.तरी पण प्राचीन काळापासून कविंनी राधाकृष्णाच्या नीतीनिरपेक्ष मुक्त प्रीतीचेच गोडवे गायले आहेत.लहानपणी शब्दरुप घेऊन भेटलेली ' साजणी ' म्हणजे नीतीनिरपेक्ष मुक्त प्रीतीची भावना होती.ही कविता वाड़मयीन दृष्ट्या श्रेष्ठ नसली तरी बालकवींची 'भावकथा' जाणून घेण्याच्या दृष्टीने या कवितेचं महत्व असाधारण आहे.या कवितेनं त्यांचं अवघं आयुष्यच स्वत:साठी मागून घेतलं आणि तिथेच ठरुन गेलं त्र्यंबक बापूजी ठोंबरे या माणसाने कवितेसाठीच जगायचं.जिजीनं दिलेलं निरपेक्ष निरतिशय प्रेम हा जीवनादर्श आता इथून पुढे कवितेत शोधायचा होता.आता व्यवहारी जगातल्या नातेसंबंधांची मोडतोड करुन शब्दांमध्ये त्यांची पुनर्मांडणी करायची होती.तरच जगणं सुसह्य होणार होतं.एक साधीच घटना त्यातून जन्मलेली तितकीच सामान्य कविता अशा प्रकारे त्र्यंबक बापूजीं मधल्या कवीला जन्म देऊन गेली..
यानंतर कविता लिहीली की सर्वप्रथम जिजीला दाखवायची हे ठरलेलं तर होतंच पण तिच्याकडून शाबासकी मिळणे महत्वाचे असे.जिजीने छान झालीय म्हटलं की मग ती इतर मित्रांना दाखवायची.थोडक्यात कालचा त्र्यंबक आता इतर चार मुलांसारखा जगाकडे बघत नव्हता.तर कवी म्हणून बघत होता.येणाऱ्या प्रत्येक छोट्यमोठ्या अनुभवांना कवी म्हणून सामोरा जात होता.उमेद्वारीच्या काळात कोणत्या विषयावर कविता करावी यावर कोणतंही बंधन किंवा मत नसतं.त्यामुळे भावाच्या संस्कृत प्रमाणपत्रांना कवितेचा साज चढवण्यापासून लग्नसमारंभादी मंगलकार्या निमित्त पदे रचणे,मोरोपंतांच्या वळणाची विशिष्ट रचना करणे,घरातील थोरामोठ्यांची नावे घालून कविता लिहीणे अशा विविध अंगांनी लिहीण्याचा आनंद त्यांच मन मिळवित होतं.नव्याने कविता लिहू लागलेल्या बहूतेकांची काव्यजीवनाची सुरुवात थोड्याफार फरकाने अशीच असते.यामुळे एक झालं मनातील विचार भावना व्यक्त करण्यासाठी जी शब्दांवर हुकमत असावी लागते ती त्यांना प्राप्त होऊ लागली. पुढे केशवसुत,रे.टिळक, गोविंदाग्रज,या सारख्या कवींच्या कविता वाचनात आल्यावर शब्दांची नुसती जुळवाजुळव म्हणजे कविता नाही याची जाणीव त्यांना झाली.काव्य विषयावरही त्यांचं मन वेगळा विचार करु लागलं.याच सुमारास म्हणजे साधारण १९०५ ते १९०६ या काळात एरंडोल इथे ' वनवासी ' तथा रामचंद्र कृष्ण वैद्य या प्रख्यात हरदासांची व त्र्यंबक बापूजींची भेट झाली.त्यांची विद्वत्ता,कथा निवेदनाची शैली व मुख्य म्हणजे त्यांचं कवित्व बघून बालकवी भारावून गेले.त्यांनी आपल्या कविता त्यांना बुवांना दाखवल्या.त्यांना त्या खूप आवडल्या.पुढे वनवासींच्या विनंतीवरुन व वडीलांच्या संमतीने ते त्यांच्या बरोबर गावोगावी फिरले.'वनवासी' राष्ट्रीय किर्तनकार होते.आबालवृध्दांना ऐतिहासिक कथा सांगून ते त्यांच्यातील शौर्यवृत्ती जागवण्याचं कार्य ते आपल्या परीने करीत होते.त्र्यंबक बापूजी जर या बुवांबरोबरच कायम फिरत राहिले असते तर महाराष्ट्राला ते ' बालकवी ' या नांवाने कदाचित माहिती झाले नसते.त्यांची कविताही वेगळ्या वळणाची झाली असती.' वनवासी ' यांचा सहवास लाभल्यामुळे,देशात सर्वत्र स्वातंत्र्य लढ्याचं व समाज परिवर्तनाचं जोरदार वारं वाहात असल्यामुळं त्यांनी सामाजिक आशया-विषयाची कविता थोडीफार लिहीली.त्यात ' गोंधळ ' भिकारी ' धर्मवीर ' ' ' राष्ट्रसेवा श्लोक ' अशा कवितांची नांवे घेता येतील. यातील ' धर्मवीर ' या कवितेच्या काही ओळी लेखाच्या ओघात आल्या आहेतच. पण एकूणच बालकवी रुढार्थाने सामाजिक आशयाच्या कवितेत फारसे रमलेले दिसत नाहीत.याचं महत्वाचं कारण म्हणजे समाज परिवर्तनापेक्षाही त्यांना आपल्या मानसिक स्वास्थ्याची अधिक काळजी होती.जिजींच्या सहवासात लाभलेलं निरपेक्ष प्रेम ही त्यांची खरी गरज होती.जिंजींचं लग्न झाल्यानंतर एकटेपणाच्या जाणीवेनं ती अधिक तीव्र झाली.बालवयात ज्या प्रीतीची नुसती ओळख झाली होती ती प्रीती,ती काल्पनिक प्रेयसी त्यांना साद घालू लागली.ती आणि त्यांची भेट एका बागेत,निसर्गाच्या सान्निध्यात झाली होती.ते स्मरुन त्यांचं मन ती भेट,ती प्रीती निसर्गातच शोधू लागलं.तशातच बालपणीचा काळ सुखाचा संपून तरुणाई फुलू लागली होती.बालपणी हवं असणारं आणि बहिणभावंडांकडून मिळणारं प्रेम आणि तरुणपणी हवं असणारं,अनुभवास येणारं प्रेम यात मूलभूत फरक आहे.पहिल्या अवस्थेत देह असून देखील देहभावना अनुपस्थित असते तर तरुणाईत देहीक जवळीक नसली तरी देहभावना मात्र प्रत्यक्षापेक्षाही जास्त खरी व तीव्र असते.शैशवातून पौगंडावस्थेतील सहजवृत्तीत स्वत:चे विसर्जन होत असतानाचा हा प्रवास बालकवींनी आपल्या ' संध्यारजनी ' या कवितेत अतिशय सुंदर दाखवला आहे.या कवितेच्या सुरुवातीच्या ओळीच पहा-
' अस्तगिरीच्या अभिनव कुंजी निजला निजनाथ..
' बघता बघता त्यास रंगले वारुणिचे चित्त..
' हळूच पाहते, मधुर हासते जाते लाजून
म्हणे मनाशी,जीव टाकू कां हा ओवाळून..!
' संध्या ' नावाची अल्लड मुलगी ' रजनी ' नावाच्या तरुणीला भेटायला निघाली आहे.जाता जाता ' अस्तगिरी 'च्या म्हणजे आता पर्यंतच्या आयुष्याच्या सरत्या काळाच्या कुंजात बालपणीचा सुखाचा काळ,' निजनाथ ' निजला आहे. त्याला ती डोळे भरुन पाहून घेते आहे.कारण तरुणाईत ' रजनी ' च्या भेटी नंतर तोच पुन्हा तिच्या ' हृदयाचा ' साजण ' म्हणून भेटणार आहे अशी तिची प्रामाणिक भावना आहे.त्यामुळे त्याला काही काळापुरतेही सोडून जायला तयार नाही.पण निसर्गाने दोघांचा विरह तर अगदी निश्चित करुन टाकला आहे.या सत्याची जाणीव होऊन संध्याराणी खिन्न झाली आहे.तिला अश्रू आवरत नाहीयत.अशावेळी दिशा तिला समजवायला आल्यात-
' किती पश्चिमे आता त्याचे चिंतन करशील
दृष्टि लावुनी अशीच बसशिल सांग किती वेळ?..
खिन्नपणा हा पुरे,पुरे ग अश्रूंची माळ...!
उद्या बरे कां तो राणीला आपुल्या भेटेल..!!'
असं म्हणून उद्याचं आश्वासन देत आहेत.तिलाही मग कळतं की आपल्यासारख्या कितीतरी मैत्रिणी,कितीतरी मुली या विरहावस्थेतही आनंदात राहताहेत. चांदण्या होऊन आकाशात चमकताहेत.नक्षत्रांनी खच्चून भरलेलं आकाश म्हणजे विश्वाच्या मस्तकावरचा जणू हिऱ्यामाणकांचा मुकुट आहे.त्याकडे बघता बघता ' संध्या ' स्वत:च एक चांदणी होते आणि ' रजनीदेवी ' दिसू लागते.साऱ्या चांदण्या मिळून आता या तरुणाईचं,या रजनीदेवीचं उत्साहानं स्वागत करताहेत.आपल्यकडे असेल ते सारं निरपेक्ष भावनेनं,उदार अंत:करणानं उधळून देऊन अवघं विश्व प्रेमानं भारुन टाक,म्हणून तिला विनवित आहेत.सर्वत्र काळोख दाटून येत असताना ब्रहमांडाचेही हृदय प्रेमरंगात नाचू देत अशी प्रार्थना करताहेत. हे सांगताना बालकवींनी-
' काळ्या काळ्या या पडणाऱ्या अंधारासंगे '
अशी शब्द योजना केली आहे.यात शैशवा नंतर आलेल्या तरुणाईचाही अस्त कुठेतरी केंव्हातरी होणार असल्याचं ते सूचित करतात आणि एकूण जीवनावर अतिशय सुंदर भाष्य पुढे ते करु लागतात-
' काळ्या अंधारात खेळते विश्व लपंडाव
ताऱ्यांवरती बसून बघती ते कौतुक देव
दहा दिशांनी पांघरुनी या काळ्या बुरख्याला..
काळा बागुल काळोखाचा एक उभा केला
मंद मंद तेजात शोधते गगनश्री त्यांना
पाजळुनी हे नक्षत्रांचे रत्नमणी नाना
खेळ चालला एकसारखा हा खालीवरती..
पूर्व दिशाही तोच हासली सापडली हाती..!
-इथे कवीच्या जीवनादर्शापुढे व्यवहारी जगातला जीवनादर्श त्याच्याच रुपात येऊन उभा ठाकला आहे.एका अर्थानं लौकिकाच्या अंधारात अध्यात्मिक अंधार लुप्त होतो की काय अशी सजग भीती व्यक्त झाली आहे.पण माणसाची ही भीती तशी निरर्थक आहे.कारण जीवनात चढ-उताराचा,यशापयशाचा,इतकंच काय जन्ममृत्यूचाही खेळ एकसारखा चालूच असणार आहे.अनुभवजन्य ज्ञानाची पूर्वदिशाही सहजच हाती सापडणार आहे.वरच्या तुकड्यातली शेवटची ओळ बालकवींनी अतिशय समर्थ अशी लिहीली आहे.कारण जीवनावर भाष्य करत असताना कवितेच्या विषय आशयाच्या रसपरिपोषाकडेही लक्ष असणं आवश्यक होतं.विषयापासून थोडं दूर जाऊन वेगळं काही सांगताना व पुन्हा मूळ विषय पुढे नेताना त्यांनी कवितेचा तोल कुठेही ढळू दिलेला नाही.थोडक्यात गायक बरोब्बर नेमक्या ठिकाणीच समेवर आला तरच त्याला दाद मिळते.'संध्यारजनीत' दाद देण्याची ही खरी जागा आहे.असो.तर आता संभ्रमाचे,भितीचे,ढग पांगून पूर्व दिशा हाती सापडली आहे.'रजनी'चा नाथ,तो चंद्र उदयगिरीवर नवतेजाची शांत शीतळ पताका घेऊन आला आहे.रजनीत विसर्जित झालेल्या 'संध्ये'ला एका अर्थाने निजाथच रजनीनाथ होऊन भेटला आहे.म्हणून बालकवी म्हणताहेत-
' तुमची राणी बसे सारखी तुम्हा न्याहाळीत
गगनाच्या चौकात चला हो या रजनीनाथ
धवलचंद्रिके दे आलिंगन दिव्य यामिनीला
बहिणी बहिणी तुम्ही सुखाने चंद्राशी खेळा
कां ताऱ्यांनो तुम्ही लाजता?हा मंगल काल
निर्मत्सर व्हा प्रेमसंगमी पोहा चिरकाल..! '
-अशा रितीनं प्रीतीची अपक्व भावना इथे पक्व होत असलेली दिसते.प्रीतीचं वात्सल्यात रुपांतर झालं आणि रजनी देवी साऱ्या जगालाच अंगाईगीत म्हणून जोजवू लागली आहे.गगनाची शय्या करुन तारका चंद्रतेजाची ओढणी पांघरुन झोपी जात आहेत.दहा दिशाही डोळे मिटताहेत.सारा ब्रह्मांडगोलच रजनीदेवीच्या अंगाईगीतावर डोलतो आहे.त्या बरोबर वैश्शिक प्रीतीची ही नवी अनुभूती गातगात कवीही प्रीतनिद्रेत रंगला आहे.या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे,इथे कुठेही मातृत्वाचा अनुभव अद्याप आलेला नाही.पुढे येऊ घातलेल्या अनुभवाची ही फक्त नांदी आहे. तरुणाईत येणाऱ्या प्रणयाराधनेच्या अनुभवा नंतरच वात्सल्य अनुभवास येणार आहे.या तरुण झालेल्या बालकवींच्या प्रेयसीचं तिच्या प्रियकरा बरोबर लग्न व्हायला हवं.तो लग्नाचा अपूर्व सोहळा आपल्याला ' फुलराणी ' या कवितेत पाहायला मिळतो. ' फुलराणी ' च्या लग्न सोहळ्याला निघण्यापूर्वी पुन्हा एक आठवण जागी करायला पाहिजे.बालकवी निसर्गाचे निमित्त करुन आपल्या आयुष्यातील घटनाक्रम मोडून कवितागत जीवनादर्शाशी सुसंगत होईल असा मांडू ईच्छित होते.अगदी लहानपणी व बालकवींच्या मनात नसताना त्यांचं लग्न तत्कालीन रितीरिवाजा प्रमाणे त्यांच्या आईनं करुन दिलं होतं.पण लग्न झालं तरी पत्नीबरोबर संसार थाटून सहजीवनाचा आनंद उपभोगावा अशी त्यांची परिस्थिती नव्हती.लग्न लागताच त्यांना शिक्षणासाठी नाशिकला जावे लागले.पुढे कुटुंबाचा भार त्यांच्याच अंगावर पडल्यामुळे नोकरी निमित्तही त्यांना पत्नीपासून दूर राहावे लागले.म्हणजे आधी उल्हास त्यात फाल्गुन मास अशी स्थिती झाली.ईच्छे विरुध्द लग्न झाले तरी परस्परांच्या सहवासाने प्रेमाचे धागे जुळू शकतात तेही परिस्थितीने जुळू दिले नाही. या पार्श्वभूमीवर कवितागत काल्पनिक प्रेयसीचा सततचा सहवास हा त्यांचा एकमेव दिलासा ठरला असल्यास नवल नव्हतं.ही त्यांची काल्पनिक प्रेयसी त्यांच्या प्रमाणेच तरुणाईत प्रवेश करती झालेली होती.तिचे लग्न तिच्या प्रियकराशी म्हणजे स्वत:शीच रविकिरणांच्या रुपात लावलेले दिसते. ' हरिततृणांच्या मखमालीवर त्यांची ही प्रेयसी,ही फुलराणी
खेळत असताना संध्यावात तिथे आला-
वडीलकीच्या नात्याने तिला जवळ घेऊन म्हणाला-
' छान माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती?
कोण बरे त्या संध्येतून हळुच पाहते डोकावून?
तो रविकर कां गोजिरवाणा आवडला आमुच्या राणीला?
लाजलाजली या वचनांनी साधीभोळी ती फुलराणी.. '
- अशा रितीनं काल्पनिक प्रेयसीच्या पूर्व संमती नंतर एक गोड स्वप्नरात्र बालकवी रंगवतात.लग्न ठरलेल्या एखाद्या मुलीला आपल्याच वयाची विवाहीत मैत्रिण भेटावी आणि तिनं आपल्या सुखरात्रींचा पट उलगडून दाखवावा तशी ही त्यांची ' फुलराणी ' प्रणयराधनेत बुडून गेलेली दिसते-
' कुणी कुणाला आकाशात प्रणय गायने होते गात..
हळुच मागुनी आले कोण? कुणी कुणा दे चुंबनदान..
प्रणय खेळ हे पाहूनी चित्ती विरहार्ता फुलराणी होती..
तो व्योमीच्या प्रेमदेवता वाऱ्यावरती फिरता फिरता..
हळूच आल्या उतरुन खाली फुलराणीसह करण्या केली..
परस्परांना खुणवुनी नयनी त्या वदल्या ही आमुची राणी..! '
- पुढे ही स्वप्नरात्र संपते.सकाळ होते.दाही दिशांवर तेजोमय मंडप घातला गेला आहे.लाल सोनेरी ढग वऱ्हाडी म्हणून जमले आहेत.आकाशात चंडोल पक्षी वाड्निश्चय करायला निघालेला दिसतो आहे.असे सगळे फुलराणीच्या लगीनघाईचे एक अतिशय सोत्साहपूर्ण वातावरण बालकवी आपल्या चपखल व नाचऱ्या शब्दकळेतून अक्षरश: खेळवतात-
' गाऊ लागले मंगल पाठ सृष्टीचे गाणारे भाट
वाजवी सनई मारुतराणा कोकीळ घे तानावर ताना..
नाचू लागले भारद्वाज- वाजविती निर्झर पखवाज..
नवरदेव सोनेरी रविकर नवरी ही फुलराणी सुंदर..!
लग्न लागते सावध सारे..! सावध पक्षी सावध वारे..!
दवमय हा अंतरपाट फिटला भेटे रविकर फुलराणीला...! '
अशी सगळी कविता अगदी सहजच माणूस ताल धरुन गाऊ लागतो आणि या जगावेगळ्या वधूवरांना आशिर्वाद देतो.संपूर्ण कवितेत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.ती म्हणजे 'रविकरा'च्या रुपात ते ' फुलराणीशी ' विवाहबध्द होतात आणि पुन्हा कवी म्हणून अलिप्त होतात,तसा प्रयत्न करतात.याचा अर्थ स्वत:च्या ईच्छा-स्वप्नांची पूर्ती काव्य निर्मितीतून करुन घेत असतानाच आपल्या कवितेकडे ते वेगळ्या जाणीवेने बघत होते.कारण अशा प्रकारे नैसर्गिक प्रेरणांची तृप्ती करुन घेणं हेच कवितेचं अंतिम उद्दीष्ट होऊ शकत नाही हे सत्य त्यांना माहित होतं.
पण माणसानं कामक्रोधादी प्रेरणांपासून कितीही दूर राहायचं ठरवलं तरी हे विकार,विचार पुन:पुन्हा तृप्त होण्यासाठी डोकं वर काढतातच.बालकवींनी ' फुलराणी ' बरोबर रविकराच्या रुपात लग्न करुन संसार थाटला खरा पण आपल्या वाग्दत्त वधू बरोबर शारीर अनुभव शब्दातून कसा घ्मायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालेला दिसतो.कारण संभोगसुखाची ओढ ही भितीयुक्त असते म्हणूनच ' तारकांचे गाणे ' लिहून सभोवताली आणि मनात जागं असलेलं विश्व ते प्रेमाने,वत्सलतेनं झोपवू बघतात व तारकांना विनवतात-
' एकादी तरुणी रमणी | रमणाला आलिंगोनी
लज्जा मूढा भिरुच ती | शंकित जर झाली चित्ती
तिच्याच नयनी | कुणी बिंबुनी
धीट तिला बनवा बाई | भुलवा ग रमणालाही '
- या कवितेत शारीर अनुभवाला सामोरं जाण्यापूर्वी एक गोड भिती कामोत्सुक जोडप्यात भरुन राहिलेली असते त्या भितीला पळवून लावून धीट होण्याचा जसा प्रयत्न आहे पण तो सफल झालेला दिसत नाही.त्यामुळेच शारीर पातळीवरील शृंगार त्यांच्या कवितांमधे दिसत नाही. विनायक जोशी यांच्या कन्येशी,पार्वतीबाईंशी, त्यांचा विवाह झाला पण पार्वतीबाईंचे आणि त्यांचे सूर कधी जुळलेच नाहीत. पार्वतीबाईंनी पुढे आपले आत्मचरित्र लिहीले त्यात त्यांच्या विफल वैवाहिक जीवनाची कहाणी वाचायला मिळते.अतिशय संवेदनशील आणि हळूवार मनाचे बालकवी एक नवरा,एक माणूस म्हणून आपल्या पत्नीशी फार कठोरपणे वागत.प्रसंगी तिला मारत सुध्दा.आयुष्याच्या एका नाजुक वळणावर ' रमाई ' नावाच्या एका तरुण सुंदर विधवा स्त्रीच्या प्रेमात ते पडले खरे पण ' प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर ' या न्यायाने हे प्रेम कवितेतच काय ते दिसते.' गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी ' या कवितेत त्यांची ही कथा-व्यथा व्यक्त झालेली आढळते.याच विषयावरील प्रा.वसंत कानेटकर यांचे ' तू तर चाफेकळी ' हे नाटकही ही प्रसिध्द आहे.
(क्रमश:- )
Comments
Post a Comment