श्रीगुरुदत्त बोधामृत

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 
|| श्री स्वामी समर्थ || 
------------------------------------------- 
अध्याय २२ वा 
गाणगापूरातील एका ब्राह्मण पती-पत्नी राहात असतात.त्यांच्याकडे एक वांझ म्हैस असते.काही गरजू गावकरी नदीकाठची वाळू वाहून आणण्यासाठी तिच्या नाकात वेसण घालून रेडा म्हणून करत असत व त्याचे या ब्राह्मणाला पैसे मिळत.वैशाखातल्या रणरणत्या उन्हात एक दिवस स्वामी त्या घरी भिक्षेसाठी उभे राहतात.ते पाहून ब्राह्मण पत्नी धावत येते.त्यांना मनोभावे दंडवत घालते.माझे पती भिक्षेसाठीच गेलेत ते आले की मी तुम्हाला स्वयंपाक करुन पोटभर जेवू घालते असे सांगते.कारण आज त्या वांझ म्हशीला कुणीच मोल देऊन नेलेले नसते.हे ऐकून स्वामी म्हणतात,"दारात म्हैस बांधलीय तिचे दूध आम्हाला दे.दुसरे काही नको." ती म्हैस वांझ असल्याचे सांगताच स्वामी त्या ब्राह्मण पत्नीला म्हणतात," खोटे बोलू नकोस.तू आमच्या समोर तिला दोहायला सुरुवात कर." मग ती आज्ञा शिरसावंद्य मानते. काष्ठपात्र म्हशीच्या आचळांपाशी नेऊन धार काढू लागते.दूध अक्षरश: बत्तीस धारांनी वाहू लागते.आश्चर्याने थक्क होऊन ती स्वामींकडे अनिमिष नेत्राने पाहू लागते. मग ते दूध गरम करुन स्वामींना देते.श्रीगुरु तृप्त होऊन तिला भरभरुन आशिर्वाद देतात.तिचे दैन्य संपून.लक्ष्मी स्थिर होते.
ही कथा वाचून सामान्य माणसाला एकच प्रश्न पडतो.जी कधी गाभण झाली नाही अशी वांझ म्हैस दूध देईल कां?-आजच्या काळात असे चमत्कार होतील कां?-कुणीही याचे उत्तर " नाही " असेच देईल.पण या चमत्कारा मागचा आशय लक्षात घेतला तर असे प्रश्नच चुकीचे आहेत हे समजेल.प्रत्येक मनुष्य काही विशेष गुण,विशेष क्षमता घेऊन आला आहे.पण याची त्याला सुतराम कल्पना नसते.त्यामुळे हे गुण,ओळखून त्यांचा विकास घडवण्याचे प्रयत्न च त्याने कधी केलेले नसतात.मग ते व्यवहारात सिध्द करण्याची गोष्टच सोडा.एखादा स्वामींसारखा गुरु भेटतो तेंव्हा आपली आपल्याला नव्याने ओळख होते.हे स्वत:च्या बाबतीत झालेले ज्ञान दूधासारखे पूर्णान्न होऊन आपल्या बुध्दीचा विकास घडवून आणते.अशक्य तेही शक्य होऊ शकते हा बोध.होतो.एक प्रकारे आपला नव्याने जन्म होतो. 

|| दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७