श्रीदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
--------------------------------------------
अध्याय ४९
या अध्यायात भीमा अमरजा संगमाचा महिमा श्रीगुरुंनी कथन केला आहे.या संगमात स्नान केल्याने सर्व पापांचे क्षालन होते अशी दत्तभक्तांची आजही श्रध्दा आहे.या संगमाला एवढे महत्व प्राप्त झाले याचे कारण एका पुराण कथेत आहे.जालंधर नांवाच्या राक्षसाने सर्व देवादिकांना मारले व स्वर्गलोकावर राज्य करु लागला.गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी देवेंद्र महादेवाकडे आला आणि म्हणाला," दैत्यांना दिलेल्या वरदानामुळे जालंधराच्या सैन्यातले सगळे मृत राक्षस रक्ताच्या थेंबातून पुन्हा पुन्हा जन्म घेतात.आता देवांचे राज्य स्थापित करण्यासाठी तुम्हीच काही उपाय करा " महादेवाने तात्काळ अमृतमंत्र उच्चारुन संजीवन उदकाचा घट दिला व ते उदक सर्व देवांवर शिंपल्यास ते पुन:श्च अमर होतील असे सांगून आशिर्वाद दिले.ते उदक मृत सूरवरांवर शिंपण्यासाठी अमरनाथला जात असता त्यातील काही थेंब अमरजा संगमात पडले व त्यामुळे संजीवनी नदी म्हणून भूमीवर प्रसिद्ध झाली.या संगमाला काशी क्षेत्रापेक्षाही अधिक महत्व असून येथील नद्या उत्तर दिशेस वाहतात. म्हणजेच साधकांची प्रगतीकडे वाटचाल होते.नागेशी खेरीज आणखी कोटीतीर्थ,रुद्रपाद,चक्रतीर्थ,मन्मथदहन व कल्लेश्वर अशी आठ तीर्थे आहेत.साधनकालात येथे स्नान केल्यास अष्ट सात्विकभाव स्थिर राहण्यास मदत होते.दीपावलीचे दिवशी स्वामींनी आपल्या शिष्यांना येथे स्नान घडवले व महिमा सांगितला.याच अध्यायात नागेशीच्या ब्राह्मणाने भगवान शंकराला प्रसन्न करुन घेतले व मला इथेच काशी व विश्वेश्वर दर्शन हवे असा वर मागितला. मणिकर्णिका कुंड निर्माण झाले त्यातून विश्वेश्वराची मूर्ती निघाली त्याची कथा आहे.तसेच स्वामींची बहिण रत्नाबाई हीला पूर्व जन्मात घडलेल्या मांजरीच्या पिलांच्या पातकातून मुक्त केले याची कथा आहे.तीर्थक्षेत्रांवरील नदीत फक्त स्नान केल्याने पापातून मुक्त होता येत नाही त्यासाठी साधना अत्यंत आवश्यक असते.संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, " नाही निर्मळ मन | काय करील साबण?| ..
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा||
Comments
Post a Comment