श्रीगुरुदत्त बोधामृत
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
------------------------------------------
अध्याय २८ व २९ वा
----------------------------
अहंमन्य विप्रांना एका मातंग गावकऱ्या कडून पराभूत केल्या नंतर तो गावकरी आपल्या पत्नीला मुलाबाळांना ओळखेना.कारण मागील जन्मीच्या वेदरत विप्राच्या भूमिकेतून तो बाहेर आला नव्हता.श्रीगुरुंनी त्याच्या अंगाला लावलेली विभूती म्हणजे भस्म धुतल्यानंतर तो पुन्हा मातंगाच्या भूमिकेत आला.या निमित्ताने सद्गुरुंनी कर्मविपाकाच्या सिध्दांता प्रमाणे माणूस प्रत्येक जन्मात केलेल्या पापपुण्यादी कर्मामुळे पुनरपि जननं पुनरपि मरणं च्या फेऱ्यात कसा फिरत राहतो याचे विवरण केले आहे.सिध्द योगी पुरुषांना स्वत:चे व दुसऱ्याचे मागचे आणि पुढचेही जन्म दिसू शकतात.गौतमबुध्दाला आपले ५५० जन्म आठवत होते.जातक कथांमधे या विविध जन्मावर आधारीत कथा आजही वाचायला मिळतात.अध्यात्मिक साधनेत जसजशी साधकाची प्रगती होत जाते तसतशा काही सिध्दी त्याला प्राप्त होतात.स्पर्शाने रोग बरे करणे,दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखणे,हींस्त्र पशूंना आपल्या हुकमतीत ठेवणे,अशा सिध्दी प्राप्त झालेल्या योग्यांविषयी आजही आपण ऐकतो बोलतो.साधनापथावर अशा सिध्दीत न अडकता साधकाला परमहंसपदा पर्यंत प्रवास करायचा असतो.या प्रवासात सद्गुरुंवरील अनन्यसाधारण श्रध्दा व भक्ती त्याला साह्यभूत ठरते.शिष्याची पात्रता ओळखून सद्गुरु त्याचे जीवन घडवतात.हे लक्षात घेऊन साधकाने किंवा संसारी उपासकांनी " माझ्यासाठी जे योग्य व हितकारक आहे तेच मला सद्गुरु देतील " एवढीच दृढ श्रध्दा बाळगावी.आपल्यातील गुणवत्ता,क्षमता हेरुन त्या सिध्द कराव्यात.मागील जन्मात आपण कोण होतो आणि पुढील जन्म कोण असणार आहोत अशा विचारात वेळ न घालवता वर्तमानकाळात स्वत: आनंदी राहून दुसऱ्यालाही तो आनंद मिळेल असे वर्तन करावे.अखंड सावधान राहिल्यास हे शक्य होते.अर्थात अखंड सावधता किंवा जागृतता टिकवून ठेवणे म्हणजे तारेवरची कसरत असते.ती जमवण्याचा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे.तो करीत राहावा.बाकी सर्वकाही सद्गुरुंवर सोडून द्यावे.याच अध्यायात जाणता अजाणता मनुष्याच्या हातून कोणकोणती पापकर्मे घडू शकतात व कोणकोणता जन्म घेऊन यातना भोगाव्या लागतात याची मोठी जंत्रीच आहे.पाप म्हणजे काय? नरक म्हणजे काय? ब्रह्मराक्षस होणे किंवा मागे लागणे म्हणजे काय हे नीट समजून घेतले पाहिजे." पुण्य पर उपकार | पाप हे परपीडा | " अशी सोपी व्याख्या तुकाराम महाराजांनी केलीय.कोणत्या कर्मामुळे स्वत:ला दुसऱ्याला आनंद होईल आणि कोणत्या कर्मामुळे दुसऱ्याला मानसिक, शारिरीक त्रास होईल हे विवेकाने ठरवता येते.जेंव्हा दुसऱ्याला त्रास होईल असे कृत्य आपल्या हातून जाणता अजाणता घडते तेंव्हा त्याचे शल्य हे मनाला सतत टोचत राहते.हे शल्य,ही सततची टोचणी म्हणजेच ब्रह्मराक्षस.म्हणजेच पीडाकारक विचार,जे दिसत नाहीत.असा दुष्ट नकारात्मक विचार एकदा मागे लागला की तो मनुष्याचा मानसिक पातळीवर अनन्वित छळ सुरु करतो.हा छळ सहन करावा लागणे.मनोरुग्ण होणे म्हणजेच नरक.थोडक्यात स्वर्ग किंवा नरक हे आपल्याच कर्माचे फळ आहे.हे लक्षात घ्यावे.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
Comments
Post a Comment