बालकवींचे भावचरित्र
१
बालकवींचे भावचरित्र
----------------------
लेखक : रमेश वाकनीस
---------------------
थोडे मनातले..
( श्रावण महिना आला की बालकवींची " श्रावण मासी हर्ष मानसी " ही कविता सहजच ओठावर येते.बालकवींच्या कवितांनी मराठी काव्य रसिकांवर जे गारुड केले आहे ते कालातीत आहे.बालकवी तथा त्रयंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितांमधून त्यांचे एक भावचरित्र मांडण्याचा प्रयत्न दै." कानोसा " या पिंपरी-चिंचवड मधील वृत्तपत्रात दर रविवारी क्रमश: लिहीत होतो.त्यातील काही कात्रणे राहिली,काही माझ्याकडून गहाळ झाली.त्या लेखाचे हे पुनर्लेखन कविता प्रेमींसाठी समाजमाध्यमावर प्रकाशित करीत आहे.या प्रसंगी दै.कानोसा चे मालक,मुद्रक,संपादक,श्री आर.एस.कुमार यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो.माझ्यासारख्या लिहीत्या हातांना त्यांचे नेहमीच प्रोत्साहन होते.लेख आवडला तर माझ्या नांवासकट वितरीत कराल असा विश्वास वाटतो.)
वाचा आनंदे...
शाळेत असल्यापासून बालकवी तथा त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे एक निसर्गकवी म्हणून परिचित होते.पुढे स्वत: थोडीफार कविता लिहायला लागल्या नंतर व कविता वाचून,समजून घेण्याचा प्रयत्न करु लागल्या नंतर या कविराजाच्या कवितांवरील ' निसर्गकवी ' हे नामाभिधान काढून थोडं भावविश्वात डोकावून पाहावंसं वाटू लागलं.
बालकवींनी आपल्या कवितातून निसर्गाची नितांत रमणीय अशी चित्रे रेखाटली आहेत. परंतू शब्दातून साकार झालेली ही निसर्गचित्रे केवळ निसर्गासाठी निसर्ग एवढ्या मर्यादित अर्थाचीच नाहीत. नीट पाहिली तर लक्षात येतं की या कवितांमधील लतावेली,फुलेपाने,चंद्रचांदण्या,असा निसर्गाचा पसारा हा केवळ निमित्तमात्र आहे.निसर्गातल्या विविध गोष्टींवर मानवी भावभावनांचे आरोपण करुन बालकवी काही वेगळंच सांगू पाहात आहेत.कुणी म्हणेल असं तर प्रत्येकच कवी करतो.कशाच्यातरी मिषाने आपल्या स्वत:च्या भावभावना,अनुभव,अनुभूती प्रकट करतो.बरोबर आहे.पण निसर्ग किंवा तत्सम जडवस्तूजातावर सचेतनत्वाचा आरोप करण्याची गरज मुळातच बालकवींना कां वाटली?- हाच तरा खरा शोध घेण्याचा विषय आहे.
वयाच्या अवघ्या आठ्ठाविसाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतलेल्या या कवीच्या काही निवडक कवितांच्या आधारे त्याच्या भावविश्वात प्रवेश करुन बघायचा आहे.मराठी सारस्वतात ' औदुंबर ' सारखी श्रेष्ठ कविता मागे ठेवून अढळ ध्रुवाचे स्थान पटकवणाऱ्या या कवीच्या भावचरित्राची मांडणी करता आली तर करायची आहे.
भावचरित्राकडे वळण्यापूर्वी बालकवींच्या जीवन चरित्राचा धावता आढावा घेणं जरुरीचं आहे.कवितेचा आस्वाद घेताना कवीच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची गरज नाही असा एक मत प्रवाह आहे.पण इथे आपल्याला बालकवींचे भावचरित्र पाहावयाचे आहे म्हणून त्याची गरज आहे.या मांडणीतून बालकवी माणूस म्हणून आणि कवी म्हणून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील.
त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी १८९० साली जन्मले आणि १९१८ साली त्यांनी हा इहलोक सोडला.या काळातील त्यांचं बालपण,शिक्षण,नोकरी,लग्न,त्यांचा स्वभाव,त्यांच्या विषयीचं त्यांच्या आप्तस्वकियांचं मत,सुखदु:खाचे प्रसंग,इत्यादी तपशिलवार माहिती आपण घेणार नाही आहोत.त्यांची भावकथा जाणून घेण्यासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढाच भाग आपण पाहणार आहोत.या दृष्टीनं बालकवींकडून आत्मप्रकटीकरणासाठी कविता माध्यमाचीच निवड कशी केली गेली व त्यांच्या पहिल्यावहिल्या कवितेचा जन्म कसा झाला हे पाहण्यासारखं आहे.
दहाअकरा वर्षाचे असताना आपल्या एका मित्राबरोबर बालकवी नवापूर येथील घरा जवळच्या बागेत बसले होते.घरात त्यावेळेला लग्नाचं वातावरण होतं.त्या बागेतील लतावेली,पानंफुलं,पाहतापाहता बालकवींच्या मनात बागेवर कटाव रचण्याची कल्पना आली.त्यांच्या मित्राला ' कटाव ' म्हणजे काय हे माहित नव्हतं.बालकवींनाही खूप ज्ञान होतं असं नाही पण विशिष्ट चालीवर बांधलेल्या शब्दबध्द ओळींना ' कटाव ' म्हणतात एवढं ते सांगू शकत होते.कटाव रचण्याची कल्पना मनात येताच उचंबळून आलेल्या भावनांसाठी शब्दांची शोधाशोध जुळवाजुळव सुरु झाली आणि बालकवींची पहिली कविता ' वनमुकुंद ' जन्माला आली.एक दहाअकरा वर्षाचा मुलगा आपल्या संवगड्याबरोबर जातो आणि इतर काही खेळ खेळण्या ऐवजी कविता रचनेकडेच कां वळतो,हा प्रश्न समजून घ्यायला हवा.बालकवी स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मले.देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडण्याचा,स्वातंत्र्यसमरात उडी घेण्याचा, समाजासाठी झोकून देऊन काम करण्याचा तो काळ होता.या संदर्भात टिळक-आगरकरांसारख्या प्रभृतींमधला ' आधी स्वातंत्र्य की समाज प्रबोधन ' हा वाद प्रसिद्ध आहेच.सांगण्याचा मुद्दा असा की बालकवींच्या शरीर-मनाच्या विकासात तत्कालीन समाजरचनेचा व त्या विरुध्द दंड थोपटून उभ्या राहिलेल्या सामाजिक चळवळींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अत्यंत महत्वाचा वाटा आहे.बालकवींचा थोरला भाऊ जहालवादी चळवळीत सक्रिय होता.बालविवाह,सतीची चाल,बालजरठ विवाह,अशा अनिष्ट रुढींच्या फासातून समाज मुक्त व्हायचा होता.बालकवी,त्यांचं कुटुंब,आप्तस्वकिय,याला अपवाद नव्हते.बालकवींचं स्वत:चं लग्न देखील वयाच्या चौदाव्या वर्षी तेही मनात नसताना झालेलं आहे-
' दिडकीला सतरा पापे,धर्म धर्म म्हणणे सोपे
ब्रह्मचर्य तुमचे थोर,चवदाव्या वर्षी पोर
देहाचा बनला दास, मायेचा बसला फास
स्वार्थाने वेडे झाला, धर्माचा मुडदा केला.' अशा शब्दात त्यांनी आपल्या ' धर्मवीर ' या कवितेत विषाद आणि उद्वेग नोंदवून ठेवला आहे.हे सर्व मुद्दाम सांगण्याचं कारण असं की त्यावेळच्या मुलामुलींना लग्नसंस्था,त्या अनुषंगाने येणाऱ्या स्त्री-पुरुष संबंधांची ओळख दहावं ओलांडतानाच होत होती.घरात लग्नाचं वातावरण असताना बालकवी मित्राबरोबर बागेत आले होते ही गोष्ट विसरुन चालणार नाही.लग्न म्हटलं की अगदी रुक्षातला रुक्ष माणूस सुध्दा आपली काव्यमय वृत्ती दाबून ठेवू शकत नाही.मंगलाष्टकं रचून किंवा रचून घेऊन ती चढाओढीनं म्हणणं,काही नाही तर नांव घेण्याच्या कार्यक्रमात भाग घेऊन आपल्या जोडीदाराचं नांव उखाण्यात घ्यायला तसा प्रत्येकजणच उत्सुक असतो.बालकवींना आजोळकडून काव्याचा वारसा मिळाला होता.वडील बेताचेच शिकलेले होते तरी आई गोदूबाई यांनी रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप,इ.ग्रंथाचे वाचन,परिशीलन अगदी कळायला लागल्यापासून केलं होतं.मोठी बहिण मनूताई उर्फ जिजी हीनं तर आपल्या भावामधील कवी जपला.जिजी स्वत: कविता करीत नव्हती पण काव्य समजण्याची रसिकता तिच्यात होती.आई प्रमाणे तिनं देखील रामविजय, पांडवप्रताप,भक्तलिलामृत,असे ग्रंथ वाचले होते.जिजींबरोबरच बालकवींनी मोरोपंतांचं आर्याभारत वाचलं.तसंच तत्कालीन नियतकालिक ' नवनीत ' देखील ते जिजींमुळेच वाचू लागले.काव्याची आवड जिजींमुळेच बालकवींना लागली.भेंड्या खेळण्यासाठी कितीतरी कविता बालकवींनी जिजींबरोबर पाठ केल्या होत्या.त्यांच्या कवितांची पहिली रसिक वाचक जिजीच होती.इतकंच काय बालकवींच्या कुटुंबाचे निकटवर्तीय व लेखक कै.भा.ल.पाटणकर यांनी संपादित केलेलं बालकवींच्या समग्र कवितेचं पुस्तक त्यांनी जिजींनाच अर्पण केलेलं आढळतं.या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेवरील मजकूर वाचण्यासारखा आहे-
सौ.जिजी,
आज बालकवी हयात असते तर जिजी, त्यांनी हा कवितासंग्रह आपणास अर्पण केला असता अशी माझी खात्री आहे.म्हणूनच आपल्या परवानगीने आपल्या बंधूंचा संग्रह आपणाला अर्पण करीत आहे.
आपला
भा.ल.पाटणकर
(क्मश:-)
.
Comments
Post a Comment