लघुकथा
कथा : सलोमी
--------------
मित्रांनो,आपल्या काॅलेजच्या वाङमय मंडळाचे वतीनं होत असलेल्या कथा कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या प्रा.वसंत चव्हाण व आपणा सर्व विद्यार्थ्यांचे मी मना पासून स्वागत करते.. सरांच्या मराठी साहित्यातील योगदाना बद्दल,त्यांच्या एकूण साहित्यिक कामगिरी विषयी बरंच बोलता येईल पण स्वागत,परिचय,सत्कार वगैरे गोष्टीत वेळ घालवू नका अशी सक्त ताकीद दिल्यामुळे मी आता आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रा.चव्हाण सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कथा लेखन कार्यशाळेचं प्रथम पुष्प गुंफायला सुरुवात करावी.." एवढ बोलून संजना कांबळे चव्हाण सरां समोरच्या बेंचवर बसली.संजनाच्या काळ्याभोर विशाल डोळ्यात चव्हाण सरांचे डोळे क्षणभर थांबले मग पुन्हा ते डोळे भूता सारखे उलटे चालू लागले तशी परत वर्तमानकाळात येऊन साऱ्या वर्गावर स्थिरावले..
प्रा.चव्हाण सर उठले चष्मा काढून कोटाच्या खिशात नीट ठेवत त्यांनी टेबलवर ठेवलेला आपला मोबाईल उचलला स्वाईप करुन एकदा वरुन खाली अशी तर्जनीनं स्क्रिनवर रेघ ओढली उजव्या बाजूला टॅप केलं.मग सगळ्या वर्गाकडे बघत हसून म्हणाले," आत्ता मी जे केलं ते सर्वांनी करा "
सगळ्या मुलांनी आपापले मोबाईल सायलेंट मोडवर टाकले. गुड..असं म्हणून ते जरा वेळ खिडकी बाहेर बघत राहिले.मग डाव्या हाताच्या बोटानं आपला उजवा गाल जरासा खाजवून बोलू लागले..
" आपल्या पैकी बहुतेकांनी लहानपणी चिऊकाऊची गोष्ट ऐकली असेल आपल्या आईकडून,आजीकडून..ऐकलीय ना? असं विचारुन मग म्हटले आईच्या,आजीच्या तोंडून ऐकलेल्या चिऊकाऊ सारख्या गोष्टी म्हणजे कथा..म्हणजे प्रारंभीच्या काळात कथा लिहीली जात नव्हती.सांगितली जात होती. ऐकवली जात होती. धार्मिक क्षेत्रात कथा- किर्तनकारही कथा ऐकवत होते.तोंडोतोंडी सांगितल्या जाणाऱ्या या गोष्टीचा प्रवास लिखित संहीते पर्यंत,पुस्तका पर्यंत झाला आणि वाङमयाच्या प्रांतात आपले विशिष्ट स्थान प्राप्त करुन बसलेला आपल्याला दिसतो.आता कथा लेखक व्हायचं असेल तर तुमच्या नावावर चारपाच पुस्तकं असणं अनिवार्यच झालंय जणू. पण त्या आधी उत्तम सकस कथा लिहीता येणं आवश्यक आहे.कथा लेखनाचं तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठीच आपण सर्व इथे उपस्थित झाला आहात.आज गूढकथा,भयकथा,ग्रामीण कथा,रंजक कथा,विनोदी कथा विज्ञान कथा,अशा विविध अंगांनी कथा वाङमय बहरलेले दिसते.एवढ्या विवेचनावरुन.. सर पुढे असेच संथ लयीत बोलत राहिले..आणि एकदम म्हणाले तर मित्रांनो कथा म्हणजे घडून गेलेली हकीगत किंवा घटना असं म्हटलं तरी आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना कथा होऊ शकत नाही.. अचानक समोर बसलेल्या विद्यार्थ्यां मधून एक आवाज आला- " कां ? " - कां होऊ शकत नाही माझी कथा? "
सर अचानक भांबावल्या सारखे सर्वांकडे पहात राहिले.आवाज इथे उपस्थित असलेल्यां पैकी कुणाचाच नव्हता. कारण सगळे विद्यार्थी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पहात होते.पण तरीही आवाज ओळखीचा वाटत होता. या पूर्वीही अनेकदा या धारदार कातर आवाजानं त्यांचा ताबा घेतला होता.आत्ताही तसंच झालं.असं होता कामा नाही.तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यां समोर उभे आहात..कळत होतं पण मन शरीर सोडून अनावरपणे त्या आवाजाच्या दिशेनं धावू पहात होतं...सलोमीऽऽ थांब. थांब मी येतो. मग आपण बोलू.हे बघ हा मी निघालोच..तू ,तू तिथेच थांब.जाऊ नकोस कुठे..
सगळा वर्ग स्तब्ध होऊन सरांकडे बघत होता.सर आत्ता खिडकी बाहेर खिळलेली नजर आपल्याकडे वळवतील.बोलतील बोलत राहतील.. पण नाही. सर खिडकीतून खिडकी बाहेर गेले होते." सलोमीऽऽ सलोमीऽऽ " पुन्हा तोच धारदार कातर आवाज, "नाही.नको.नको मला तुझा सहवास.नाही करायचा मला तुझ्या शब्दां मधे वास.. नको आहे मला तुझ्या बरोबरचा प्रणयरास.नकोत मला तुझे डोळे..नकोत तुझे भुरळ पाडणारे रंगबिरंगी पोषाख. ..मी प्रछन्न उघडी नागडी आंधळीच बरी आहे नकोत मला तुझे डोळे संजना..संजना?प्रमिला?की सलोमी?- सलोमी एक घटना.एक स्वप्न.एक सत्य.. मनातला गोंधळ पहात सर जणू स्वत:शीच हसले.व्याख्यान पुढे नेण्यासाठी शब्द जुळवू लागले.." मन वढाय वढाय..उभ्या पिकातलं ढोर.."
* *
पाठीवर मोकळे सोडलेले केस. कपाळावरचं कुंकू फिसकटलेलं हातात धारदार सुरा..माझ्याकडे पहात ती विकट हसली.म्हणाली," मारुन टाकलं मी माझ्या पोटात वाढणारं आपलं बाळ..हेच हवं होतं ना तुला?-झालं तुझ्या मना सारखं?"
आपण स्तब्ध,हतबुध्द होऊन पहात राहिलो.सलोमीच्या वेडसर चमकदार डोळ्यांकडे..! सलोमी आयुष्यात अशी अचानक वेगवेगळ्या टप्प्यावर भेटत राहीली स्वप्नात..भासात..श्वासात..पाठलाग करत राहिली सतत.ध्यानी मनी नसता खिंडीत गाठत राहिली.पेचात पाडत राहिली.खेचत राहिली..नाही जगू दिलं तिनं कधी धडपणे.प्रमिला प्रत्यक्ष भेटायच्या आधीही भेटली होती स्वप्नात..तोच केस पाठीवर मोकळे सोडलेला विकट हसणारा..कपाळावरचं कुंकू फिसकटलेला..डोळ्यात वेडसर चमक असलेला गोरापान चेहरा..हातात तळपणारा धारदार सुरा..तेच शब्द.." मारुन टाकलं मी माझ्या पोटातलं आपलं बाळ.हेच हवं होतं ना तुला?-झालं तुझ्या मनासरखं?"
सलोमी एक घटना. माझा सतत पाठलाग करत आलेली..!!
* *
बी.ए.च्या वर्गात शिकत असताना प्रमिला प्रथम भेटली.मी अवाक,आश्चर्य चकीत होऊन तिच्याकडे पहात राहिलो होतो.किती वेळ कुणास ठाऊक.एकदम माझा हात हातात घेऊन त्यावर आपला दुसरा हात ठेवून प्रमिला विचारत होती," वसंत चव्हाण..अहो कुठे हरवलायत?- मी प्रमिला गायकवाड.."
"आं?- हां हां हो,हो..प्रमिला गायकवाड नाव सांगितलं नाही कां तुम्ही?"
मला कळत नव्हतं.स्वप्नात विचित्र अवस्थेत भेटलेली सलोमी आणि समोर प्रत्यक्ष उभी असलेली प्रमिला दोघी इतक्या सारख्या कशा?- कुणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण हे खरं होतं.स्वप्नातली सलोमीच प्रमिला म्हणून माझ्या पुढे होती.फक्त सोज्वळ,लोभस रुपात..! पहिल्याच भेटीत कसं सांगणार की या आधी वर्षभरा पूर्वी आपण स्वप्नात भेटलो होतो.काहीच बोललो नाही.हसून म्हणालो," कां कुणास ठाऊक पण तुम्हाला कुठे तरी पाहिल्या सारखं वाटलं..म्हणून जरा.."
" अहो होतं असं कधी कधी. चालायचंच..चला आपण काॅफी घेऊया कां?"
" आनंदान..! पण बील मीच देणार हं.."
" अजिबात नाही.काॅफी मी पाजणाराय तेंव्हा बील मीच देणार.."
" अहो कशाला खर्चात पडताय मी पाजतो ना.."
" नाही म्हणजे नाही.उद्या तुम्ही पाजा.ओके? "
" ओक्के..एक दिवस तुम्ही एक दिवस मी. ठरलं तर.."
" म्हणजे रोज काॅलेज सुटलं की काॅफी बरोबर गप्पा मारायच्या आणि मगच निरोप घ्यायचा एकमेकांचा.."
" अगदी मनातलं बोललात..!! "
* * *
भेटी वाढत राहिल्या.प्रत्येक भेटीतल्या सहवासाचा सुवास दोघां भोवती दरवळत राहिला.दोन जीवांना एकमेकात गुंतवत राहिला.इतका की दोघांना एकमेकां शिवाय करमेनासं होऊ लागलं.काॅफीपानाच्या निमित्ताने पंधरा-वीस मिनिटात एकमेकांचा निरोप घेणारे वसंत आणि प्रमिला दिवस दिवस एकमेकांना सोडेनासे झाले.मग संध्याकाळही अपुरी पडायला लागली.दोघं होस्टेलवर राहात होते.बागेत एकमेकांच्या बाहूपाशात भावी जीवनाची स्वप्न रंगवत कसा वेळ जायचा कळायचा नाही.बागेतला रखवालदार बाग बंद व्हायची शिटी वाजवू लागला की मग यांना भान यायचं.होस्टेलचं गेट बंद व्हायच्या आत कोणत्याही परिस्थितीत पोहोचावं लागायचं.वसंताकडे त्याची बाईक होती त्यामुळे वसंता बेफिकीर असायचा.एक दिवस हा बेफिकीरपणा त्याच्या चांगलाच अंगलट आला.नेहमी प्रमाणे बाग बंद होण्याची शिट्टी वाजली आणि वसंतानं प्रमिलाच्या ओठातले ओठ काढले..मिठी सैल झाली.दोघेही उठले.बागे बाहेरच्या पार्किंग मधे लावलेली गाडी वसंताने स्टॅन्डवरुन खाली काढली आणि त्याच्या लक्षात आलं दोन्ही चाकात हवाच नाहीय.बाहेर पडताना त्यानं स्टॅन्डच्या मालकाला विचारलं तर मालक हसून म्हणाला," अहो,साहेब तुमची गाडी सांभाळण्याचे आम्ही पैसे घेतो.तुमच्या गाडीच्या चाकातल्या हवेची,टायर-ट्यूबची जबाबदारी आमची नाही.आता दहा रुपये भरल्याची पावती दाखवा आणि बाहेर काय दुरुस्ती करुन घ्यायची ती करा.वसंतानं घड्याळ बघितलं साडेनऊ होऊन गेले होते.प्रमिलाला म्हणाला,"आता कुठलं गॅरेज उघडं मिळणार? होस्टेलचं गेट तर बंदच झालेलं असणार.." प्रमिला म्हणाली," पण काही तरी मार्ग तर काढला पाहिजे.रात्र घालवायची कुठे?"
प्रमिलाचा प्रश्न बरोबर होता. वसंताच्या मनात आलं,जवळपासचं एखादं लाॅजच बघावं लागेल.पण हे प्रमिलाला सांगायचं कसं?- पण सांगावं तर लागणारच होतं.वसंतानं पार्किंगच्या मालकाकडे वळून म्हटलं," साहेब गाडी रात्रभर इथेच राहू दे उद्या येऊन घेऊन जाईन मी"
"५०/₹ पडतील.." मालक म्हणाला.वसंता मोठ्या बापाचा मुलगा होता त्यामुळे पैशाचा प्रश्न नव्हता.त्यानं गाडी पुन्हा पार्किंग शेड मध्ये लावली.त्याची वाट पहात उभ्या असलेल्या प्रमिलाला म्हणाला," तुझे कुणी नातेवाईक राहतात कां इथे?"- " छे रे आमचं कुणीच नाही इथे पुण्यात.आपण रिक्षेनं होस्टेलवर जायचं कां? " वसंतानं तिच्याकडे पहात विचारलं," तू रेक्टरची परमिशन न घेता गुपचूप बाहेर पडलीयस.लक्षात आहे ना? " प्रमिला एकदम गप्प बसली.तिनं घड्याळ पाहिलं.रात्रीचे दहा वाजून गेले होते.रात्र पाळीचा खडूस वाॅचमन ड्यूटीवर आला असणार.त्याला फोन केला तर डायरेक्ट रेक्टरला फोन करुन बोलवून घेईल. शिवाय अगाऊपणानं लेक्चर झोडेल ते वेगळंच.मग काही आपलं खरं नाही. रेक्टर डायरेक्ट डॅडींना फोन लावतील.आधीच तीन वेळा वाॅर्निंग लेटर मिळालंय.डॅडींना आपण प्राॅमिस केलंय की संध्याकाळी सात नंतर होस्टेलच्या बाहेर पाऊल टाकणार नाही.डॅडींना कळलं तर ते शिक्षणच बंद करतील आणि कुणाशी तरी लग्न लावून मोकळे होतील.छे: पंचाईतच झालीय. मनातल्या विचारांना मागे हटवत ती एकदम वसंताकडे पहात म्हणाली,"इतके कसे आपण मूर्खा सारखे वागतो?.." वसंता हसून म्हणाला," आज मी नाही हं मूर्खा सारखं वागलो.आठ वाजता मी तुला म्हटलो होतो,चल आता निघू ..पण तू जरा जास्तच लाडात आली होतीस आज.." प्रमिलानं लाजून दोन्ही हातांच्या ओंजळीत आपला चेहरा झाकला आणि म्हणाली," तू असा बघत जाऊ नकोस रे..मग माझी मी राहातच नाही " इतक्यात पार्किंग मधून एक स्कूटरवाला दोघांच्या अगदी जवळ येऊन हाॅर्न वाजवत हसत उभा राहिला.दोघे रस्त्याच्या एका कडेला येऊन उभे राहिले.स्कूटरवाला त्यांच्याकडे पहात हसत हसत निघून गेला." लाॅजवर रात्र काढण्याची आयडीया मनातल्या मनात ड्राॅप करत वसंता म्हणाला,"चल जरा समोरच्या बुथवर जाऊन फोन करु.." असं म्हणत वसंतानं प्रमिलाच्या कमरे भोवती हात घातला आणि ते दोघं रस्ता क्राॅस करुन बुथवर आले.रिसिव्हर उचलून त्यानं नंबर फिरवला," हां संक्या लेका काय करतोयस?- काही नाही यार प्राॅब्लेम झालाय जरा..तू आजची रात्र तुझ्या अंकलकडे जा नं झोपायला..आं? मी सांगतो तुला नंतर सगळं..थॅंक्स अ लाॅट संक्या.." वसंतानं फोनचं बील दिलं. रिक्षा थांबवली.दोघे एका चांगल्या हाॅटेल मधे जेवले.रिक्षेनं फ्लॅटवर आले.फ्लॅट उघडत असताना कानावर गाण्याचे शब्द पडत होते..रुप तेरा मस्ताना..प्यार मेरा दिवाना..भूल कोई हमसे ना हो जायें..!!! दार बंद केलं तरी गाण्याचे स्वर ऐकू येतच होते.वसंता तिच्या डोळ्यात बघून हसला.प्रमिलानं लाजून दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहरा झाकला..आणि बघता बघता वसंताच्या मिठीत विरघळून गेली..!!!
* * *
- तर मित्रांनो,सकस,सरस कथा कार म्हणून स्वत:ची वाढ करण्यासाठी आपल्या ठिकाणी असलेल्या कल्पना शक्तीचा,निरिक्षण शक्तीचा विकास घडवून आणण्याचा,काल्पनिक किंवा प्रत्यक्ष घेतलेल्या अनुभवाचा चौअंगानी विचार करण्याचा गुण अंगी बाणवता येणं फार आवश्यक असतं.यासाठी जशी वाचनाची गरज असते तशीच गरज असते ती दैनंदिन जीवन समरसतेनं,सजगतेनं जगण्याची.. असं विकसित मनच एखादं कथा बीज फुलवू शकतं.बरं,कथा बीज शोधणं फार अवघड असतं कां?-तर नाही.ते रोजमर्राच्या जिंदगीतच सापडतं.रोजचं वर्तमानपत्र उघडून पाहिलंत तरी प्रत्येक बातमीत एक कथा बीज सापडेल.फक्त ते पाहण्याची नजर हवी..बरोबर की नाही?- असं म्हणून चव्हाण सरांनी संजनाकडे पाहिलं. "बरोबर आहे सर..आजच " परजातीतल्या मुलीशी लग्न केलं म्हणून मुलाची वडीलांकडून हत्त्या " अशी बातमी आलीय.यावर पण कथा होऊ शकते ना?..संजनाचा हा प्रश्न म्हणजे सरांच्या वर्मावरच घाव होता.क्षणभर काय बोलावं त्यांना समजेना पण लगेचच," होऽ कां नाही होऊ शकत? नक्कीच होऊ शकते." स्त्री भ्रूण हत्येच्या एका बातमीवर तर एक चित्रपटही निघालाय " इसाक शेख असं म्हणताच एकानं " लपाछपी " असं त्या चित्रपटाचं नांवही सांगितलं.अख्ख्या वर्गातली मुलं एकमेकात बोलू लागली.चव्हाण सरांनी मोबाईल काढून किती वाजले ते बघितलं.मोबाईल परत खिशात ठेवत असताना सहज वर्गा बाहेर बघितलं तर प्राचार्य बर्वे दारात उभे असलेले दिसले." या सर.." दोन्ही हात जोडून चव्हाण सरांनी त्यांचं स्वागत करताच सगळी मुलं पटकन उभी राहिली." बसा बसा.." असं म्हणत प्राचार्य संजनाच्या शेजारी बसले. पुढच्या आडव्या फळीवर कोपरं ठेवून दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफून त्यावर हनुवटी ठेवत त्यांनी आपले मांजर डोळे चव्हाण सरांच्या चेहऱ्यावर खिळवले.चव्हाण सरांनी पुन्हा डाव्या हातानं उजवा गाल खाजवल्या सारखा केला आणि ते परत खिडकीतून बाहेर पहात राहिले..
* * *
वसंता बंगल्याच्या हाॅलमधे वडिलां समोर उभा होता.वडिल आबासाहेब त्याचा प्रस्ताव फेटाळत बोलत होते..
" हे पहा वसंतराव तुम्ही काॅलेजात जाता वेगवेगळ्या जाती-धर्माच्या मित्र-मैत्रिणीं बरोबर राहता,खातापिता,आमचं काही म्हणणं नाही.समाजात राहायचं म्हणजे जातीचा अभिमान बाजूला ठेवावाच लागतो.पण रक्ताच्या नात्यात भेसळ झालेली आम्हाला चालणार नाही. शाहण्णवकुळी मराठा आहोत आपण.."
" पण आबासाहेब..आम्ही एकमेकां शिवाय जगू शकत नाही.प्रमिला.."
" या घरात मांगाची मुलगी खपवून घेतली जाणार नाही.एवढाच तिच्यावर जीव असेल तर तिला कायमची ठेवा. पण लग्न आम्ही सांगू त्याच खानदानातल्या मुलीशी होईल."
" पण प्रमिलाच्या पोटात माझं बाळ वाढतंय.."
" म्हणूनच म्हटलं तिला ठेवा कायमची..परमेश्वर कृपेनं आपल्या घरी लक्ष्मी पाणी भरतीय.या पोरीला न् आमच्या होणाऱ्या नातवंडाला काही कमी पडणार नाही.."
" हे माणुसकीला न् नीतीला शोभणारं नाही "
" तुम्हाला सरळ सांगितलेलं समजत नाही कां?- चार बुकं शिकलात.काॅलेजात मास्तरकी करायला लागलात म्हणजे काय फार अक्कल आली कां तुम्हाला?
" तसं नाही आबासाहेब.."
" तसं नाही तर मग कसं?- शेण खाऊन येताय न् पुन्हा आम्हालाच शिकवताय? माणुसकी आहे,नीतीमत्ता आहे म्हणून म्हणतोय तिला कायमची ठेवा.जबाबदारी घ्या तिची.. नीतीला धरुन नाही म्हणे..लाज वाटायला पाहिजे लाज..!
बाप-लेकात हा असा वाद चालू असतानाच कधी तरी प्रमिला तिथे येऊन उभी राहिली होती.
आळीपाळीनं एकदा आबासाहेबांकडे एकदा वसंताकडे ती पहात होती.
वसंताला काय बोलावं सुचत नव्हतं.मुठी आवळून दातावर दात दाबून धरुन तो खाली मान घालून फक्त जमिनीत नजर गाडून उभा होता.आपल्या आडमुठ्या बापाला कसं समजावून सांगाव ते त्याला कळत नव्हतं. बापलेकात पसरलेल्या मैलोमैल नि:शब्द शांततेताचा काही अर्थच लागत नव्हता.प्रमिलाला पाहून इतका वेळ डोक्याला हात लावून बसलेली वसंताची आई एकदम उसळून म्हणाली,"आता असं करा.कुठून तरी वीष आणून द्या आम्हाला..आई-बाप कशे तडफफडून मरतायत ते बघा मंग करा खुशाल लग्न..कुठल्या जन्मी कुठलं पाप केलं होतं म्हणून ही अवदसा घरात शिरली रं देवाऽऽ " धायमोकलून रडणाऱ्या आईचा आवाज ऐकून वसंताचं सारं अवसान गळून पडलं आणि तो मागच्या खुर्चीत कोसळून प्रमिलाच्या कमरेला मिठी मारुन लहान मुला सारखा रडू लागला.प्रमिला त्याच्या केसातून हात फिरवत दाता खाली ओठ दाबून डोळे मिटून घळघळा अश्रू ढाळत राहिली.वसंता विचारत होता, "कसं समजवायचं सांग अशा आई-बापांना.." प्रमिला बोलत नव्हती पण तिला माहित होतं.अशा वेळेला समजवायचं कुणालाच नसतं.आपणच समजून घ्यायचं.सर्वांना सुखानं जगायचा मार्ग मोकळा करायचा असेल तर त्या मार्गात धोंड म्हणून येणाऱ्या जीवाला जगायचा काहीच अधिकार नाही.ह्दयावर भला मोठा दगड ठेवून प्रमिला तिथून बाहेर पडली ती परत वसंताच्या आयुष्यात आलीच नाही.स्वप्नात पाहिलेली सलोमी, एक घटना प्रमिलाच्या रुपानं अशी प्रत्यक्ष घडली..
* * *
प्रा.चव्हाण सर आपले व्याख्यान संपवून खाली बसले.संजना कांबळेंनी प्राचार्य बर्वें यांना समारोपासाठी पाचारण केले. प्राचार्यांनी आपल्या गोऱ्या पान टकलावरुन हात फिरवला.एकदा डावा-खांदा गोल फिरवला.पांढऱ्या ठिपक्या ठिपक्यांचा नेव्हि ब्लू बुशर्ट पुढून मागून ओढून सारखा केला आणि मनगटावरील घड्याळात पहात म्हणाले," संध्याकाळचे सहा वाजत आलेत.मी थोडा उशीरा आलो पण मीही समोर बसून पाऊणतास त्यांचं व्याख्यान ऐकलं.कथा लेखन तंत्राची नुसतीच छापील माहिती न पुरवता त्यांनी आपले काही अनुभवही शेअर केले.मला ही बाब जास्त महत्वाची वाटली.तुमच्या सारख्या नवीन लिहीत्या हातांना त्यातून बरंच काही शिकता येण्या सारखं आहे.मुळात चव्हाण सरांचं कौतुक यासाठी वाटतं की आपला अत्यंत खाजगी अनुभव त्यांनी काही आडपडदा न ठेवता मोकळेपणानं मांडला.असं करण्यासाठी एक वेगळं धाडस अंगी असावं लागतं.एका भ्रूण हत्येच्या पातकाला आपण जबाबदार ठरलो या अपराध भावनेतून ते कधी बाहेर पडू शकले नाहीत.प्रा.चव्हाणां सारखा एखादा मोठा साहित्यिक जन्मभर अविवाहित राहण्याचा निर्णय घ्यायला कां प्रवृत्त होतो यावरही त्यामुळे प्रकाश पडला.चव्हाण सरां प्रमाणे माझ्याही जीवनात तसा प्रसंग उद्भवला पण त्यांच्यापेक्षा आम्हाला दोन शिंगं जास्तच फुटली होती.आम्ही बापाची परमिशन वगैरे मागायला गेलोच नाही.आम्हाला आवडलेल्या पारशी पोरीशी लग्न करुन मोकळे झालो. आमचे वडिलही भारी.घराचा दरवाजा त्यांनी आम्हाला कायमचा बंदच करुन टाकला.तर सांगायचा मुद्दा काय ?-एखाद्या ओढवून घेतलेल्या संकटात,पेच प्रसंगात तुम्ही कसे वागता या मागे तुमच्यावरचे संस्कार,तुमच्या जीन्स मधून आलेले गुण-अवगुण अशी बरीच कारणं असतात.आता चव्हाण सरांच्या जीवनात ही घटना घडली तो काळ वेगळा होता. गर्भपात करुन घेणं किंवा करणं कायद्यानं गुन्हा होता.पण पुढे कुमारी मातांच्या समस्या वाढायला लागल्या.त्याचं प्रतिबिंब साहित्यातून उमटायला लागलं.वृत्तपत्रातून, मासिकातून यावर बरंच विचार मंथन झालं आणि गर्भपात कायदेशीर झाला.अनेक मुलींच्या आत्महत्या वाचल्या.लग्न करुन सुरक्षित जीवन जगायला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.गर्भपात हा गुन्हा नाही असा विचार रुजायला लागण्याचा गैरफायदाही काही समाजकंटक,स्वैराचारी मंडळी घ्यायला लागली. आता काळ आणि काळा बरोबर समाज पुष्कळ बदललाय.स्त्री-पुरुष संबंधाकडेही पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चाललाय.हे बदल होतच राहणार आहेत पण बदल स्विकारताना किंवा नाकारताना माणसाची शाहणीव सक्रिय असते कां?- हा प्रश्न आहे
एखादी सुधारणा होते तेंव्हा तिचे चांगले आणि वाईट असे परिणाम होतातच.तर मित्रांनो साहित्य म्हणजे समाजमनाचा आरसा आहे.हा आरसा सातत्यानं समाजापुढे धरणं आणि त्याला सांगणं की तू असा असा आहेस.चांगला-वाईट,योग्य-अयोग्य तू ठरव.मला वाटतं साहित्यिकाचं एवढंच कार्य आहे.नव्हे ती त्याची जबाबदारी आहे.फार बोलत नाही. शेवटी,मोजक्या पण दर्जेदार साहित्यकृतींची निर्मिती तुमच्या हातून होवो असे आशिर्वाद देतो आणि थांबतो. प्राचार्य बोलत असताना संजना कांबळे एकटक चव्हाण सरांकडे पहात होती.चव्हाण सर अस्वस्थ होत होते.पण तिला काही विचारु शकत नव्हते. बोलू शकत नव्हते.त्यांना कळत नव्हतं की संजना इतकी कशी काय प्रमिला सारखी दिसतेय..तिच्या काळ्याभोर विशाल डोळ्यात ते खोल खोल बुडी मारुन शोधत होते..अखेर हे सगळं आहे तरी काय?..
* * *
दोन्ही हात दोन तरुणांच्या कमरे भोवती घालून संजना समोर उभी होती.म्हणत होती," तुम्हाला एक गुड न्यूज देण्यासाठी मी इथे बोलावलंय.माझ्या भावी लाईफ पार्टनर्सना भेटा.हा केतन गुंदेचा याचं बाळ माझ्या पोटात वाढतंय.केतन बरोबर सेक्स करणं म्हणजे एक फंटास्टीक अनुभव असतो आणि हा विराग बर्वे हो प्राचार्यांचा मुलगा आर्किटेक्ट आहे.हा माझा मित्र,सखा,, पती..प्रसंगी बाबा सुध्दा होऊ शकतो.. याच्याशी लग्न करुन मी आता इंग्लंडला नव्या जीवनाची सुरुवात करणार आहे.चला सर..विल हॅव डीनर टूगेदर..!!!
सलोमी,सलोमी अगं काय सांगतीयस तू हे? तुझं तुला तरी कळतंय कां आपण काय करतोय?- असं म्हणतच
वसंत खडबडून जागा झाला तेंव्हा पहाटेचे सव्वाचार झाले होते.त्याला दरदरुन घाम फुटला होता.स्वप्नात सलोमी म्हणून भेटली ती पुढे प्रमिला म्हणून जीवनात आली.संजना स्वप्नात आली तिला मी," सलोमी,सलोमी म्हणून साद घालत होतो..म्हणजे सलोमी नांवाची खरंच कुणी स्त्री आयुष्यात येणाराय कां?आणि असंच सगळं घडणार आहे कां?-डोकं तिनतिनदा झटकून वसंतानं ते दोन्ही हातांनी दाबून धरलं.त्याला सुटका हवी होती आणि सलोमी त्याचा पाठलाग सोडणार नव्हती..!!
©रमेश यशवंत©
६/१/२०२१
Comments
Post a Comment