बातमीदारी १

बातमीदारी १
-----------
१९७५ सालच्या नोव्हेंबरमधे मी केंद्रसरकारच्या सेवेत रुजू झालो.इथे शिफ्ट ड्यूटीज् असायच्या.सेकंड आणि थर्डशिफ्ट मधे जो मोकळा वेळ मिळायचा तो सत्कारणी लावावा,म्हणून मी काही काम शोधत होतो.अर्थात पैसा कमावणे हा हेतू नव्हता.इच्छा एवढीच होती की आपला लेखन-वाचनाचा छंद जोपासला जाईल असे काम मिळावे.मानधन म्हणून पाच-पन्नास मिळाले,वाहवा..नाही मिळाले वाहवा..! सुदैवाने मला असे एक काम मिळाले.शनिवार पेठेत "पर्सनल प्रेस सर्व्हिस" या नांवाची  खाजगी संस्था होती.मालक ठाकूर म्हणून होते.बोर्ड वाचून कुतुहल वाढले. सरळ आत घुसलो,म्हटलं, "माझ्या योग्य काही काम आहे कां?- मी मॅट्रीक पास आहे.लेखन-वाचनाची आवड आहे.." ठाकूरांनी हसून "आहे की" असं म्हणून त्यांच्या समोर बसलेल्या महिलेला " यांना काम समजावून द्या " अशी सूचना देवून म्हणाले," तुम्ही आठ दिवस करुन पहा काम तुम्हाला आवडलं तर कंटिन्यू करा.पगार असा नाही पण काही तर टोकन म्हणून देऊ." हे काम अतिशय सोपं आणि आनंदाचं होतं.या संस्थेत महाराष्ट्रभरातील अग्रगण्य दैनिके,साप्ताहिके मासिके येत.समाजातल्या विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ति, संस्था,"पर्सनल प्रेस सर्व्हिसच्या" सदस्य होत्या. सामाजिक,सांस्कृति,राजकिय कार्यक्रमांच्या आलेल्या बातम्या वाचायच्या.त्याची कातरणे काढून ती संबंधित व्यक्ती किंवा संस्थाच्या फाईलला चिकटवायची.हे काम पंधरा तीन आठवडेच केलं.पण हे काम करत असताना कळलं की तुमच्याकडे कल्पकता आणि कष्ट करायची तयारी असेल तर  पैसे मिळवणं सोपं आहे.ज्यांना आपल्या कार्यक्रमांच्या बातम्या वाचायला सुध्दा वेळ मिळत नाही अशा व्यक्तींना,संस्थांना, दर दोन वर्षांनी उत्तम सजवलेला आल्बमच हातात मिळाला तर आनंदच होतो.त्यासाठी ते पैसेही मोजायला तयार असतात.असो.तर हे काम करत असतानाच कधी तरी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची जाहिरात वाचनात आली.पत्रकारीता पदविका अभ्यासक्रम मुदत ३ महिने.पात्रता एस एस सी उत्तीर्ण.मी आॅफिसमधे साहेबांना विनंती करुन तीन महिन्यासाठी नाईट शिफ्ट मागून घेतली आणि या कोर्ससाठी प्रवेश घेतला.आमचे साहेब साॅलोमन म्हणून होते.पण सर्व कामगारांशी मित्रा सारखे वागायचे.नवीन लग्न झालेल्या कामगाराला तर आठ दिवस सुट्टी द्यायचे म्हणायचे," जा साले हनिमून करके आ और सालके अंदर पेढा खिला सबको..!"
पत्रकारीतेचा तीन महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला पण परिक्षा दिली नाही.परिक्षा या प्रकाराचा मला जरा रागच आहे.काॅपी करण्यात पटाईत असलेली मुलं आदर्श विद्यार्थी म्हणून प्राईज घेताना मी पाहिलेली आहेत.त्यामुळेच उत्तम मार्क मिळवण्यापेक्षा तो विषय समजून घेण्याची अभ्यास प्रक्रिया मला नेहमीच आकर्षक वाटत आली आहे. तर पदविका परीक्षेला चक्क दांडी मारुन मी त्या दिवशी मॅटिनी टाकला.दुसऱ्या दिवसांपासून परत वृत्तपत्रांच्या कचेऱ्यां मधून प्रत्यक्ष काम मिळतंय कां याचा शोध सुरु झाला."सकाळ" "केसरी" " "लोकसत्ता" सारखी मोठी दैनिके होती पण तिथे संधी नव्हती. होती तिथे पूर्णवेळेसाठी होती. काॅलम सेंटीमीटर तत्वावर बातमीदारी करता आली असती पण माझी पूर्णवेळ नोकरी करुन बातम्यांसाठी सायकलवर फिरणे शक्य नव्हते.एकदा प्रभात टाॅकीज समोरच्या  अमृततुल्य मधे चहा प्यायला गेलो असताना."श्रमिक विचार" या नांवाचे दैनिक पाहायला मिळाले.त्यात जाहिरात होती.लगेचच सायकल दामटंत "लाल निशाण" पक्षाच्या  कार्यालयात ए.डी.भोसलेंच्या पुढे जाऊन उभा राहिलो.ते ही म्हणाले या उद्या पासून. त्यावेळी टेलिप्रिंटरवर जगभरातल्या बातम्यांची भेंडोळी येत राह्यची.त्या सर्व बातम्या इंग्रजीत असायच्या.त्याचे अनुवाद करुन मराठी वृत्तपत्रात छापल्या जायच्या. यात अंतरराष्ट्रीय राजकारण,देश पातळीवरील राजकिय, सामाजिक,क्षेत्रातल्या महत्वाच्या घडामोडीं वरील बातम्यांची संख्या जास्त असे. या यंत्रामधून सतत येत राहणाऱ्या बातम्यांच्या भेंडोळ्यांना आम्ही गंमतीने कडबा म्हणायचो.हे काम करताना माझे इंग्रजी वाचन आपसूक होत गेले.अवघड शब्दांचे अर्थ बघायला आॅक्सफर्डची डीक्शनरी होतीच.पदविका अभ्यासक्रमात पीटीआय,यू एन आय,राऊटर,वृतसेवा संस्थांकडून बातम्या येतात हे माहितच होते. या ठिकाणी आम्हाला "केसरी"चे संपादक चंद्रकांत घोरपडे आणि किरण ठाकूर शिकवायला होते.दै.केसरी त्यावेळेला खरोखरच केसरी होता. आजच्या सारखा भांग पाडलेला नव्हता."श्रमिक विचार" हे दैनिक खास करुन औद्योगिक क्षेत्रातील घडामोडी,कामगारांच्या समस्या,त्यांच्या सोडवणूकीसाठी उभे राहिलेले लढे,चळवळी,संप,मोर्चे,या संदर्भातल्या बातम्यांना प्राधान्य देणारे दैनिक होते.ए.डी भोसले हे नांव कामगार चळवळीच्या क्षेत्रात सुपरिचित,आदरणीय,व्यक्तीमत्व.माझ्या वडीलांनी आॅल इंडीया डीफेन्स एम्प्लाॅइज युनियनची स्थापना केली(हा त्यावेळी फौजदारी गुन्हा होता.या गुन्ह्या बद्दल त्यांना तुरंगवास भोगावा लागला होता) आणि १९६० साली महागाई भत्यासाठी देशव्यापी संप ज्यांच्या सहकार्याने घडवून आणला त्यात एस एम जोशी,एस.के.लिमये, काॅ.डांगे,हे जसे होते तसे ए.डी.भोसले हे ही एक नांव होते.कामगारांनी कामगारांच्या समस्यांसाठी महाराष्ट्रातले पहिले दैनिक सुरु केले त्या "श्रमिक विचार" संदर्भात लिहीताने हे सगळे ओघाने आठवले.थोडे विषयांतर वाटले तरी विशिष्ट ध्येयाने प्रेरीत झालेल्या तत्वनिष्ठ नेतृत्वाने सुरु केलेले हे दैनिक पिंपरी-चिंचवड,पुणे परिसरातील कामगार संघटनांच्या वर्गणीवर कसेबसे ७ वर्ष चालले.कारण अर्थातच राजकारण.राजकिय नेतृत्व मग ते कुठल्याही पक्षाचे असो,सर्व सामाजिक,सांस्कृतिक संस्थांकडे व्होट बॅंक म्हणून बघत आले आणि देशभरातल्या कामगार चळवळीचे कंबरडेच मोडले.त्यात भांडवलशाही च्या धनदांडग्यांची "डिव्हाईड अॅंन्ड रुल" पाॅलिसी.सांगायचा मुद्दा काय तर तत्वनिष्ठ नेतृत्वाला आणि त्यांच्या कार्याला भांडवलशाही विचारसरणीत शून्य किंमत आहे.आपल्या देशात लोकशाही आहे असं आपण समजतो काही प्रमाणात ते खरंही आहे पण कोणत्याही लोकशाही देशात भांडवलशहाच खऱ्या अर्थाने सरकार चालवत किंवा पाडत असतात. त्यामुळे तत्वनिष्ठांपुढे दोनच पर्याय राहतात एक- तत्वाशी तडजोड करुन जिवंत राहायचं किंवा आपलं तत्व,ध्येय उराशी कवटाळून मरुन जायचं."श्रमिक विचार"बंद पडण्यामागे आणखीही कारणं असतील पण ते बंद पडलं याचं एक कामगार,एक कवी म्हणून मला अतिशय दु:ख झालं हे जाता जाता नोंदवून पुढे जातो. तर "श्रमिक विचार" मधेही मला फार दिवस काम नाही करता आलं कारण १९८१ साल उजाडलं होतं आणि मी माझी पत्नी व मुलगी असे पिंपरी-चिंचवड मधे कायम स्वरुपी वास्तव्यास आलो होतो..
(क्रमश:-)
©रमेश यशवंत वाकनीस©

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७