बातमीदारी २
बातमीदारी २
----------
कामायनी सह.गृह संस्था,
पेठ २५ घरांक ५०/२ सिंधुनगर,निगडी,पुणे.…
हे माझे कायमचे निवास स्थान झाले तेंव्हा महाराष्ट्रात गाजलेला भव्य दिव्य तीन दिवसाचा शाहीरी मेळावा संपन्न होऊन महिना १५ दिवसच झाले होते.एरवी कारखान्यांचे भोंगे ऐकत जाग्या होणाऱ्या शहराला साहित्य-सांस्कृतिक ओळख देण्याची धडपड सर्वस्तरातून होऊ लागली होती.नगराध्क्ष डाॅ.घारे यांच्या सारखे रसिक नेतृत्व या चळवळीच्या नुसते मागे नाही तर पुढेही होते.शहराच्या विविध भागात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था उभ्या राहात होत्या.यात नाट्य,नृत्य,संगीत,चित्र अशा कलां बरोबरच शिक्षण संस्थाही होत्या.एक उणीव होती ती म्हणजे या शहराचे असे वृत्तपत्र नव्हते. ही उणीव आजही आहे.पण असा प्रयत्न सुरु केला तो " दै.पवना समाचार" च्या श्री. भा.वि.कांबळे यांनी. हे जरी दैनिक होते तरी नियमित पण अनियमित होते.तरी त्यांचा प्रयत्न महत्वाचा होता. त्यांच्या पासून स्फूर्ती घेऊन " साप्ता.हलचल"(संपा.अजित किशोर) "हलचल" मधे जाहिरातींमधे बातमी शोधावी लागत असे.पण सिंधी-हिंदी भाषेतले हे साप्ताहिक नियमित निघत असे. "साप्ता.चिंचवड दिनांक"(संपा.मधु जोशी) "असिधारा"(संपा.कवी गिरिश प्रभुणे) "प्रहार"( संपा.कवी ग.रा.यादव) "समाचार"(संपा.विजय अंबाडे)पिंपरी चिंचवड टूडे"(संपा.गोविंद कुलकर्णी)दै."कानोसा"(संपा.आर.एस.कुमार) साप्ता."चाहूल" (संपा.डाॅ.सुरेश बेरी) "पवनेचा प्रवाह"( संपा.मामा शिर्के यांची माझी ओळख अगदी अलिकडची)यांनीही आपापली मुखपत्रे सुरु केली होती.शहरातल्या विविध समस्यांना वाचा फोडण्याच्या प्रयत्ना बरोबरच विविध क्षेत्रातल्या संस्थांच्या कार्यक्रमांना,उपक्रमांना या मुखपत्रातून प्रसिध्दी मिळत असे.पुण्यातून घरोघरी पडणाऱ्या महाराष्ट्रातल्या "सकाळ" "केसरी" "लोकसत्ता"अशा अग्रणी दैनिकांमधून या शहरातील राजकीय घडामोडी सोडल्या तर इतर सामाजिक,सांस्कृतिक,क्षेत्रातील कार्यक्रमांना यात स्थान मिळत नसे.काही नवे घडवू पाहणाऱ्या या संस्थांची प्रसिध्दीची गरज ही छोटी मुखपत्रे भागवत होती.एकदा साहित्यिक गजमल माळी(माजी अध्यक्ष मराठी साहित्य महामंडळ) यांच्या उपस्थितीत झालेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनात मधु जोशी यांची ओळख झाली.त्यांनी माझ्या हातात "साप्ता.चिंचवड दिनांक" चा अंक दिला आणि म्हणाले,"तुला मी पैसे देऊ शकेन असं नाही पण तुला आवडेल असे हे काम आहे -" मी तो अंक उभ्या उभ्या चाळला.उत्कृष्ठ छपाई,असलेला सोळा पानांचा तो अंक मला आवडला.जोशी सर स्वत: लेखक-कवी-संगीतकार होते.साहित्याचे जाणकार होते. कवींवर विशेष प्रेम त्यामुळे कवितांना या अंकात स्थान होतेच होते.मी तात्काळ होकार दिला.दिनांकचे काम मी जेमतेम चारेक वर्ष केले."श्रमिक विचार" मधे काम करत असताना त्याच्या आर्थिक गणिताचा विचार करण्याचे मला कारण नव्हते.पण "दिनांक"चे काम करताना मला जाणवले की ६०%जाहिराती व ४०% मजकूर असे स्थिर गणित बसवल्या शिवाय असे कोणतेही मुखपत्र चालणे शक्य नाही.स्वत:ची आवड आणि समाजाची गरज म्हणून एखाद्या व्यक्तीने पदरमोड किती काळ आणि कां करायची? सहाजिकच सोळा पानांचा अंक चार पानावर आला.त्यातही जास्तीत जास्त मौल्यवान,वाचनीय,देण्याचा आमचा प्रयत्न असायचा.सुहास कुलकर्णी नावाचे एक कवी मित्र दिनांक साठी वर्गणीदार गोळा करण्याचे काम करत असत.मी स्थानिक कार्यक्रमांच्या बातम्या,"वाचक:तत्र दुर्लभ:" या सदरासाठी वेगवेगळ्या नांवाने पत्र लिहीत असे.वर्गणीदार होते तरी त्यांच्याकडून नियमित लेखन सहकार्य नव्हते.अशा परिस्थितीत आपणच शहरातून फिरत असताना डोळे उघडे ठेवून निरीक्षण करायचे.कुठे पाईपलाईन फुटून पाणी वाया जातंय,कुठे कचरापेटी भरुन वाहतीय,कुठे वाहतुकीची कोंडी होतीय,ते बघायचं आणि वाचकांची पत्रं लिहायची.खाली कोणतंही नांव ठोकून द्यायचं.एकदा असंच मी पत्र लिहीलं.शीर्षक दिलं."असून अडचण नसून खोळंबा" पिंपरी चौकात बकाऊ वुल्फ च्या सौजन्याने एक कारंजं बांधण्यात आलं होतं.मी आॅफिस सुटलं की संध्याकाळी बसनी यायचो.रोज या चौकात वाहतुकीची कोंडी व्हायची.मी लिहीलं होतं बकाऊ वुल्फनी शहराला भेट म्हणून दिलेलं हे कारंज नेहमीच बंद असतं.ते चालू करुन शहराची शोभा तरी वाढवा नाहीतर ते हलवून वाहतुकीची कोंडी तरी टाळा.काय करायचाय असला असून अडचण नसून खोळंबा?-पत्रं छापायला दिलं आणि लक्षात आलं की अरे..! ज्या बकाऊ वुल्फचा आपण पत्रात उल्लेख केलाय त्या कंपनीत मधु जोशी सर पर्सनल मॅनेजर आहेत.मला धाकधूक आता सर काय म्हणतील देव जाणे.पण ते पत्र प्रसिध्द झालं आणि जोशी सर त्या बद्दल एका शब्दानंही कधी बोलले नाहीत.मला दिनांकचं काम करताना बरंच शिकायलाही मिळालं.बरं मी दिनांकचे खपवले तर त्याचे पैसे स्वत:साठी वापरण्याची मला पूर्ण मुभा होती.अर्थात पैसे मिळवण्याकडे माझा फारसा कल कधीच नव्हता.पण ज्या संस्थेच्या बातम्या,प्रश्न मांडले जातायत त्यांच्या पर्यंत अंक पोचवणे हे माझे काम होते.पैसे दिले वाहवा नाही दिले वाहवा अशी वृत्ती.दिनांक च्या माध्यमातून सरस्वती विद्या मंदिर,आकुर्डी येथे दोन दिवसाचे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते.या प्रदर्शनातूनच शाळेचे ग्रंथालय सुरु झाले होते.याच्या उद्घाटनाला मा.गजानन बाबर,नानासाहेब शितोळे,वगैरे उपस्थित होते.शाळेची इमारत ज्या ठिकाणी होती त्या शेजारी मोकळा प्लाॅट होता.त्यात पाणी साचून तळे झाले होते.शाळेतल्या मुलामुलींना स्वच्छता गृह नव्हते.मी या ग्रंथ प्रदर्शना निमित्ताने लेख पूर्ण दोन पाने लेख लिहीला. शीर्षक दिले-"तळे राखील तो रोगराई चाखील"त्याचे २५० अंक शाळेचे संस्थापक श्री दाभाडे यांनी विकत घेऊन सर्व पालकांना वाटले.शिवाय नगर पालिकेत जाऊन शिक्षण मंडळाच्या सर्व सदस्यांना वाटले.पुढे दिडदोन वर्षातच तळे दिसायचे बंद झाले.मुलांसाठी स्वच्छता गृह बांधले गेले.तसेच तळवडे येथे एक शाळा होती.त्या शाळेला नगरपालिकेचे पाण्याचे कनेक्शन नव्हते.कारण तळवडे त्यावेळेला नगर पालिकेच्या हद्दीत नव्हते.त्याही शाळेचा हा प्रश्न आणि इतरही काही अडचणी मांडल्या.नगर पालिकेत अंक वाटले.मानवतेच्या तत्वावर पाण्याचे कनेक्शन नगर पालिकेने मंजूर केले.हे सगळं लिहीण्याचं कारण असं की स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी अग्रणी दैनिकाचे माध्यमच आवश्यक असते असे नाही.दिनांक सारख्या छोट्या मुखपत्रांमुळेही अशी कामे शक्य होत होती.दिनांकचे दर वर्षी दिवाळी अंकही प्रकाशित होत त्याचेही सह संपादक म्हणून मला काम करायला मिळाले.त्यातून मोठ्या दैनिकां पेक्षा काकणभर जास्तच शिकायला मिळाले.कारण इथे तुम्हीच सर्वे सर्वा असता अग्रलेखा पासून शब्दकोड्या पर्यंत सर्व विषय हाताळायला मिळतात.सगळ्या चार पानांची जबाबदारी आपलीच आहे असं समजून या साप्ताहिकासाठी किंवा दैनिकासाठी कोणकोणत्या विषयावर लिहीता येईल असा विचार करुन त्या त्या विषयां वरील पुस्तके मिळवून ती वाचणे हा माझ्या दिनचर्येचा भागच बनून गेला होता. या मधे निसर्गोपचार,भविष्य,धार्मिक सण व उत्सव, चुंबक चिकित्सा,पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी,रोज मराठी दैनिकां व्यतिरिक्त इंग्रजी दैनिके ,मासिके,थोरांची चरित्रे,अशा नाना प्रकारच्या वाचनाचा समावेश होता.दिनांकचे काम करत असताना मी राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांच्या विक्रीचे कामही करत असे.आता साल नक्की आठवत नाही पण राजहंस प्रकाशनाचे तीन दिवसाचे ग्रंथ प्रदर्शन व कथा कथन,प्रख्यात विनोदी अभिनेत्यांच्या प्रकट मुलाखती असे " आनंदजत्रा"चेआयोजन "पहाट,पुणे"संस्थेने केले होते.या संस्थेच्यावतीने पिंपरी चिंचवड मधे फत्तेचंद जैन विद्यालयाचे सभागृह मिळवण्या पासून सांगते पर्यंतची सर्व कामे करण्याची संधी मला मिळाली.पुण्यातील कामे सुधाकर नेर्लेकर,दीपक करंदीकर,मनोहर सोनावणे हे कवि मित्र करत होते.असो.तर सांगायचा मुद्दा असा की या निमित्ताने राजहंसच्या दिलीप माजगावकरांची माझी ओळख झाली होती.त्यामुळे पुस्तक विक्रीचे हे काम मला मिळाले होते. यातूनच "चिंट्या पिंट्या बाल वाचनालय" माझ्या घरातच मी सुरु केले.माझी पत्नी अरुणा ते काम संभाळायची.एकीकडे लघु पत्रकारीता करत असतानाच साहित्य-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व सहभाग ए सी इएम शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कोचिंग,असे उद्योग फुल स्विंग मधे चालू होते.दिनांकच्या एका दिवाळी अंका नंतर साप्ताहिकाच्या प्रकाशनात अनियमियत पणा येऊ लागला व अखेर ते थांबवण्याचा निर्णय मधु जोशींना घ्यावा लागला.मला वाईट वाटलेच पण जोशी सरांना ते खूपच यातनादायक झाले असणार.अर्थात लघु पत्रकारीतेची एक गंमत असते एक बंद पडले तर दुसरे सुरु होते.तसेच झाले.माजी महापौर आर एस कुमार यांनी दै."कानोसा" सुरु केले.पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.चिंचवडच्या पंचशील हाॅटेलच्या जवळ याचे कार्यालय व प्रेस होता.मी कुमार साहेबांना जाऊन भेटलो.ते म्हणाले," तुमची पगाराची काय अपेक्षा आहे?" म्हटलं काम तर सुरु करतो.मानधन म्हणून काय द्याल ते आनंदाने स्विकारीन.इथे बातमीदारांना,माझ्यासारख्या लेखकांना,उपसंपादकांना,पूर्ण स्वातंत्र्य होते.कुमारसाहेब काॅंग्रेसचे होते म्हणून काॅंग्रेसचीच तळी उचलली पाहिजे असला प्रकार नव्हता. एकदा "छांदसी" चा अंक बघून ते म्हणाले," याची छपाई आपल्याकडे विनामुल्य होऊ शकते.बघा विचार करा." आॅफर चांगली होती पण मी ती मी नम्रपणे नाकारली."छांदसी" हे वाङमयीन त्रैनियतकालिक होते आणि ते होता होईल तो आपल्या एकट्याच्या जीवावरच चालवायचा असे माझे मत होते.पण "कानोसा"मधे माझी ललित लेखनाची हौस पुरेपूर भागली.मी संध्याकाळी प्रेस मधे प्रवेश केला की कंपोझिटर म्हणायचे बास आता मॅटरची काही चिंता नाही..
(क्रमश:)
©रमेश यशवंत वाकनीस©
Comments
Post a Comment