सहज सुचलं म्हणून
सहज सुचलं म्हणून..
------------------------
एका मित्रानं मला हसून म्हटलं..
' तुम्हाला एवढं सगळं सहज कसं काय सुचतं? आम्हाला सहा-सहा महिन्यात काही सुचत नाही..' त्याचा प्रश्र्न ऐकून मी गालातल्या गालात हसलो.मग काही वर्षा पूर्वी सुचलेल्या ओळी मनात एकदम उसळी मारुन वर आल्या..त्या अशा-
' सहज हटाया परदा तूने सहज
दिखाया रुप..
सहज हो गया जीवन व्यापन
रही छांव ना धूप..'
बस्स खल्लास.आता आठ वर्ष होऊन गेली.सहज असं काही म्हणता काही सुचत नाहीय.जात्यावर बसलं की ओवी सुचते..या म्हणीवर विश्र्वास ठेऊन या ओळींच्या बाबतीत माझं मन लगेचच जात्यावर बसायला काही तयार होत नाही.माझ्या मनानं तसं बरेच वेळा समजावलं सुध्दा.कुसुमाग्रज म्हणायचे ना,कवितेत दैवी काही भाग असेलच तर तो खूप आतून ओठांवर आलेल्या कवितेच्या पहिल्या दोन ओळी.बाकी सगळा प्रयत्नाचा आणि बुध्दीचा विलास असतो.आता एवढ्या मोठ्या कवीच्या विधानाचा दाखला मिळाल्यावर तरी माझ्या मनानं जात्यावर बसायला पाहिजे ना? पण नाही.ते या ओळी थोडा वेळ गुणगुणतं आणि दुसऱ्या कशात तरी रमतं.फक्त याच दोन ओळींच्या बाबतीत हे घडतं बरं का..तशी मुद्दाम जात्यावर बसून मी अनेक गीतं लिहीलीत,लिहीतो सुध्दा पण या दोन ओळी? नको रे बाबाऽऽ असं होतं.कां होतं?- या प्रश्नाचं उत्तर शोधू जाल तर एक प्रश्र्न स्वतःलाच पडतो..सहज काही घडलंय कां? घडलं असेल तर ते काय?- म्हणजे सकाळी झोपेतून जाग येणे,हात-पाय ताणून आळस देणे.शिंक किंवा जांभई इतक्या सहज कुठलं कर्म होतं?-ब्राह्मो मुहूर्तावर सहज जाग येते बरेच वेळा, स्वामींचे स्मरणही होते पण नंतर? झोपच लागून जाते.सूचना मिळत असते ,'उठ ,१० मिनिटं का होईना ध्यानाला बस..पण मन?- मन हट्टी,लोभी बिलकुल ऐकत नाही.मग स्वामी काय करणार?- झोप किती झोपायचं ते.शांत डोक्यानं बसून किती सवयी? किती वृत्ती?किती विकार?-सहज सोडून गेले याची यादी करायची म्हटली तर स्वत:लाच अपराधी वाटेल.बरं अपराधी वाटून,स्वतःची लाज वाटून काही उपयोग होणार आहे का?- याचं उत्तर व्यक्ती गणिक वेगळं येऊ शकतं.स्वतःचीच लाज वाटून जगाला ललामभूत ठरेल असं स्वतःमधे परिवर्तन घडवून आणणाऱ्या थोर विभूती जशा आहेत,होऊन गेल्यात,तशा अनेक दुर्गुण असून सुध्दा विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करुन एक आदर्श समाजापुढे ठेवणाऱ्याही व्यक्ती या जगात होऊन गेल्यात.आता सगळीच माणसं काही संत होऊ शकत नाहीत.समजा झाली तर मग जे जगणं वाट्याला येईल ते किती संघर्षहीन,किती नीरस बेचव असेल?नाही का?-थोडक्यात काय तर अध्यात्म,अध्यात्म म्हणजे साधू संत जन्माला घालणारी रेडीमेड मूस नाहीय.साचा नाहीय.त्यामुळे आत्मनिंदेचे आसूड ओढत आयुष्यभर जगायचं काही कारण नाही.स्वतःला आपल्या गुणावगुणां सकट ,मर्यादां सकट ,ओळखणं जगण्याला छोटा-मोठा हेतू देणं गरजेचं आहे.हा छोटा-मोठा हेतू हाच ध्यास,हेच जीवन-सर्वस्व झालं पाहिजे.मानून उपयोग नाही,झालं पाहिजे.आपण आपल्या जीवनाला दिलेल्या हेतूवर अत्यंतिक प्रेम असेल तर या प्रेमामुळेच हेतू साफल्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सहज घडून येतात.त्या मुद्दाम कराव्या लागत नाहीत.त्या होतात.अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज होतात.ही किमया कशी होते हे आपल्याला कळत नाही म्हणून आपण म्हणतो-जेथे सर्व असमर्थ तेथे स्वामी समर्थ..!!!
©रमेश यशवंत वाकनीस ©
Comments
Post a Comment