सहज सुचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून..
माणसानी साठी ओलांडली नं की खूप मजा मजा होते.मात्र त्याच्या पेक्षा तरुण असलेल्यांना ही मजा वाटत नाही.त्यांना सजाच वाटते ती.अपवाद असतील पण सर्वसाधारणपणे असं अनुभवास येतं खरं.परवा एक आजीबाई सांगत होत्या..'अहो,चहा करण्यासाठी म्हणून गॅस पेटवायला गेले तर माझा मुलगा इतका संतापला म्हणून सांगू..' मी विचारलं काय झालं असं?..तर म्हणाल्या,' अहो,जो बर्नर पेटवायचा त्याच बर्नरचं बटण आॅन करायला पाहिजे ना मी?..मी आपली मधल्या बर्नरचं बटण आॅन करुन कडेच्या बर्नरला काडी लावतीय..' तेवढ्यात तिथे मुलगा आला आणि इतका तोडून बोलला..' एवढी कशी शेण खायला जाते तुझी बुध्दी? तुला द्यायचा नसेल चहा तर देऊ नकोस ना..पण असले उद्योग करु नकोस.माझं लक्ष गेलं म्हणून बरं झालं नाहीतर सगळ्या घराला काडी लागली असती..!!' मग म्हटलं,' चुकलं बाबा नाही आलं लक्षात माझ्या.माफ कर..' आता एवढं म्हटल्यावर मुलानं समजून घ्यावं ना..पण तो तस्सा तणतणत आॅफिसला निघून गेला म्हणे..! आजीबाई नंतर स्वत:लाच बोल लावत रडत राहिल्या.एवढं वय झालेल्या माणसांकडून चूक होतेच कशी? असं एखाद्या मुलाला-मुलीला  वाटलं तर ते त्यांच्या वयाच्या दृष्टीने स्वाभाविकच म्हणायला पाहिजे.कारण साठी पार केल्या नंतरचा विसरभोळेपणा,चिडचिड,याचा अनुभवच नसतो त्यांना.मग ते तरी काय करतील? आजकाल तरुण मुलामुलींना पण टेन्शन काय कमी असतात का? आॅफिसमधे वेळेत पोचायचं टेन्शन,घराच्या हप्त्याचं,मुलांच्या फियांचं टेन्शन,एक ना दोन नाना प्रकारच्या तणावाखाली मुलं जगत असतात.अशा परिस्थितीत घरातलं म्हातारं माणूस म्हणजे 'असून अडचण नसून खोळंबा' वाटला मुलांना तर नवल नाही.पण म्हणून म्हाताऱ्या माणसानं सहानुभूतीची,समजुतीची अपेक्षाच ठेवू नये का?-आता मला भेटलेल्या आजीबाई कदाचित म्हणतील,' तुम्ही पुष्कळ ठेवाल हो अपेक्षा..पण मुलांनी पूर्ण तर करायला पाहिजेत ना?' अगदी खरं आहे.प्रत्येकाकडून ती पूर्ण होईलच असे नाही.घरातल्या वृध्द माणसांशी मुद्दाम,जाणीवपूर्वक,कोणतीच मुलं वाईट वागत नाहीत.अपवाद असतील तर ते प्रमाण भारतीय संस्कृतीतील कुटुंबात तुलनेनं कमी आहे.हरघडी चुकणाऱ्या,विसरणाऱ्या,म्हाताऱ्यांशी तरुणांनी कसं वागावं? या विषयावर प्रबोधन करणारे मेसेज वाॅट्सपवर हजारोंनी रोज येतात.अबालवृध्द ते दणादण फाॅरवर्डही करत असतात.त्यामुळे या लेखात वाचकांचं प्रबोधन वगैरे करण्याचा माझा अजिबात उद्देश नाहीय.मला एवढंच म्हणायचंय की तरुण काय,म्हातारे काय,शाळकरी पोरं काय,परिस्थितीकडे मग ती कितीही कठिण असो तिच्याकडे बघण्याची खिलाडूवृत्तीच अस्तंगत होत चाललीय.घरातलं माणूस चुकलं तर ती चूक हसत हसत गंमतीनंही लक्षात आणून देता येते ना? पण मानवी नाते संबंधातल्या व्यवहारात जरा काही खुट्टं झालं की नाकाच्या शेंड्यावर राग येऊन बसलेलाच असतो. हा राग मोठा वाईट.पण एखादं लहान मूल आपलं आवडतं टेडी दिवसरात्र छातीशी घट्ट धरुन ठेवतं तसा हा राग काही जणांचा खूप लाडका असतो.काय वाटेल ते झालं तरी आम्ही आमचा राग सोडणार नाही.बस्स खलास.अती राग अ न् भीक माग या म्हणी नुसार भीक मागायची वेळ आली तरी चालेल पण हा राग आम्ही सोडणार नाही म्हणजे नाही.खोट नाही.एकाच घरात राहणारे बाप-लेक कुठल्या तरी कारणावरुन भांडले आणि अबोला धरला तो कायमचा. इतका की बापाच्या मृत्यू नंतर अंत्यविधी करायला देखील मुलाने स्पष्ट नकार दिला.कारण राग.त्यातून मी अंत्यविधी केले तर बापाच्या पिंडाला कावळा शिवणार नाही असा त्याच्या पत्नीचा आणि तमाम नातेवाईकांचाही ठाम विश्वास.रक्ताची नाती पाण्या सारखी असतात कितीही काठी मारली तरी ती दुभंगत नाहीत अशी म्हण आहे पण अशी माणसंच ती खोटी ठरवतायत.रागा रागात एकमेकांना अद्वातद्वा बोलले,विसरुन गेले असं होत नाही.राग आला की माणसं लगेच निष्कर्ष काढून मोकळी होतात.मग हरामखोर,चारसोबीस,हलकट,नालायक अशा शब्दातच त्यांचा उल्लेख करायचा.पूर्वी राग आला की दहा अंक मोजावेत असं वडिल धारे सांगायचे.पण राग येण्याची ठराविक अशी वेळ नसते.तो आला की संपलं.प्रेमाचे,मैत्रीचे,आदर-भावाचे पार तीन तेरा वाजतात.बरं राग यायला खूप मोठं काही घडावं लागतं असं नाही.अगदी क्षुल्लक साध्या साध्या गोष्टींनीही माणसं एकमेकांशी बोलणं टाकतात.असा हा राग.न सांगता येतो आणि क्षणात सगळं उध्वस्त करुन टाकतो.काही जणं तर मी भयंकर रागीट आहे अशी अभिमानानं कबूलीच देतात.अशा कबूलीतच राग आपलं स्थान अधिक बळकट करतो.कौटुंबिक स्तरावरचा हा राग मग समाजात,विविध संघटनां मध्येही आपले प्रताप दाखवायला सुरुवात करतो.सोशल मिडीयावर एकमेकांच्या जवळ येऊ पाहणारी माणसं दूर जात असलेली आपण पाहतोच आहोत.विविध सामाजिक,राजकिय, संघटनां मध्ये या रागाने रौद्र-भीषण स्वरुप धारण केलेलं दिसतय.हिंसा क्रौर्य वाढतच चाललय.हे कुठे तरी थांबलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतय पण थांबायला,आपल्या आत डोकावून बघायला कुणीच तयार नाही.प्रेम आणि शांतीचं साम्राज्य कधी तरी अवतरेल अशा दुर्दम्य आशावादाने, विश्वासाने संत महंत,तत्वज्ञ,विचारवंत कवी झटत आलेत झटत आहेत.तरी पण संघर्ष संपला नाही.संपेल तरी कसा?...साहिर लुध्यान्वी माणूस म्हणजे पूर्ण विकसित पशू म्हणतो ते एका दृष्टीने खरंच म्हणायचं.अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करायचं तर आपलं भांडण दुसऱ्या कुणाशी नाही तर स्वत:शीच आहे.आपला अपमान करणारं, आपल्याला दु:ख देणारं दुसरं कुणी नसून आपणच आहोत हे जाणून घेऊन दुसऱ्या कुणाला दोष देणं बंद करायचं.दुसरी व्यक्ती कितीही भडकली तरी आपण शांत राहण्याचा,त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा.आपण त्या व्यक्तीच्या जागी असतो तर काही वेगळे रिअॅक्ट झालो नसतो.हे समजून घ्यायचं.समाज आपण बदलू शकत नाही.व्यवस्था आपण एका मर्यादे पर्यंतच बदलू शकतो हे लक्षात घेऊन स्वकल्याण साधायचं.एवढं तरी आपण प्रत्येक जण निश्चितच करु शकतो.ते करुया.स्वत:वर प्रेम असेल,स्वत:ला आनंदी ठेवणे जमत असेल तर आणि तरच आपण दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद पाहू शकतो तो पाहूया.इतकेच.
©रमेश यशवंत वाकनीस©

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७