सहज सुचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून
------------------------
एका देशातल्या एका आडगावात  एक सत्पुरुष होते.अतिशय सामान्य दिसणाऱा हा मनुष्य ज्ञानाचा महासागरच होता जणू. हळूहळू त्यांची किर्ती एवढी पसरली की पंचक्रोशीतून शेकडो स्त्री-पुरुष गुरु मंत्र घेण्यासाठी, ज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून येत असत.पुढे या सत्पुरुषाची ख्याती इतकी सर्वदूर पसरली की परदेशातून सुध्दा अबाल वृध्द लोक त्यांना भेटायला येऊ लागले.त्यामुळे असं होऊ लागलं की त्या देशाच्या राजाकडे कुणी जाईनासं झालं.हा राजाही सतशील,संतवृत्तीचा होता.प्रजेची सुखं दुःख जाणून घेण्यासाठी,त्यांचे प्रश्र्न सोडविण्यासाठी नित्यनेमानं तो दरबार भरवायचा.याचक जे मागायचा ते त्याला मिळायचच.प्रश्न कुठलाही असो चुटकी सरशी सुटायचा. पण कुण्या आडगावातल्या सत्पुरुषामुळे त्याचा दरबार ओस पडू लागला. राजालाही कळेना की भल्या सकाळी माझं दर्शन घ्यायला येणारी मुलं माणसं आडगावातल्या त्या सत्पुरुषाच्या झोपडीकडे का धाव घेऊ लागली. त्यानं फर्मान काढलं की त्या सत्पुरुषाला माझ्या पुढे आणून हजर करा.मला त्याला बघायचय.राजाचे सेवक गेले पण आठ दिवस झाले तरी त्या सत्पुरुषाला घेऊन आलेच नाही.पाठवलेले सेवक परत येत नाहीत म्हणून जेवढे सेवक राजा पाठवत होता त्यातले कुणीच परत आले नाहीत हे पाहून शेवटी राजा स्वतःच त्याला भेटायला निघाला. मजल दर मजल करत तो त्या आडगावात पोहचला तेंव्हा संध्याकाळ झाली होती.गावात सर्वत्र सामसूम झाली होती.आधीच शे-पन्नास व्यक्तीचं गाव बाकी सगळं जंगल.कुणाला विचारावं तर चिट पाखरु दिसेना.राजाला अत्यंत दुःख झालं.आपण येत असल्याचं अगाऊ कळवून सुध्दा आपल्या स्वागताची तयारी नाही.काही नाही.जी काही थोडी फार वस्ती होती तिथे जाऊन त्याने प्रत्येक घराचं दार ठोठावलं.पण कोणत्याच घरातून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.कुणीही दार उघडलं नाही.पण राजा सहजासहजी हार मानणाऱ्यातला नव्हता तरी हार मानावी लागली होती.हताश आणि निराश होऊन तो अखेर परत आपल्या नगरात आला. आपल्या भव्य प्रासादाच्या प्रवेशद्वारावर पहारेकरी दिसायच्या ऐवजी राजाला तिथे एक गाढव उभं असलेलं दिसलं.संतापानं लालबुंद होऊन त्यानं नोकरचाकरांना हाका मारायला सुरुवात केली.पण प्रतिसाद नाही.सर्वत्र शांतता.आत जाऊन एकेकाला फैलावरच घेऊ असा विचार करुन तो आत जायला लागला तेंव्हा 'कुणीही नाही तुझ्या प्रासादात' असा आवाज घुमला.राजा आत जाऊ लागला. गाढव त्याची वाट अडवून उभं राहीलं.आपल्या राज्यातील एका सत्पुरुषाला भेटायला जायचं म्हणून त्यानं शस्त्रही बरोबर नेलं नव्हतं.नाहीतर एकाच घावात या गाढवाचं मुंडकं धडा वेगळं करावं असं त्याच्या मनात आलं होतं.इतका तो संतापला होता. त्यानं खूप प्रयत्न केला पण गाढवानं त्याला प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकूच दिलं नाही.राजा रडकुंडीला आला.शेवटी हा काही तरी परमेश्वरी संकेत आहे असे वाटून त्यानं त्या गाढवा पुढे गुडघे टेकले.हात जोडून त्यानं त्याच्या पायावर डोकं ठेवलं.क्षमा मागितली.'गर्दभाच्या रुपातले आपण कुणी महान साधू दिसता.माझ्या हातातून जे जे उत्तम कार्य घडत होतं ते केवळ तुमच्या कृपेने माझे अपराध पोटात घाला आणि... 'राजाला पुढे बोलताना येईना.लहान मुला सारखा तो रडू लागला.त्या क्षणी प्रासादातून आवाज घुमला 'ये आत. तुझीच वाट पाहतोय..'राजानं डोळे उघडून समोर पाहिलं तेंव्हा हुबेहूब त्याच्या सारखीच एक व्यक्ती मंद प्रसन्न स्मित करीत उभी होती. सत्पुरुषाचं दर्शन झालं होतं.ज्ञान झालं होतं. नोकरचाकर दासदासी सगळं वैभव पाहण्याची दृष्टी पुन्हा मिळाली होती.आनंदाचे डोही आनंद तरंग उठत होते. ©रमेशयशवंत वाकनीस©

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७