यानबुच्या डायरी मधून
तीन
सौदी अरेबिया या देशातील यानबु शहरात माझ्या मुलाकडे आलो त्याला आज दहा दिवस झाले.जेध्धा एअरपोर्टवर उतरुन यानबुकडे प्रस्थान ठेवले तेंव्हा पासून मला सहज आभुटली बिलगते तशी बिलगली ती म्हणजे इथली प्रसन्न करणारी शांतता आणि स्वच्छता.या देशाची , देशातील शहराची झालेली ही पहिली भेट, पहिली ओळख. मैलोनमैल पसरलेल्या प्रशस्त रुंद रस्त्यावरुन कुठेही, कितीही दूर रपेट मारा कुठेही कुठल्याही चौकात ,फूटपाथवर वडापाव,आईस्क्रीम, पावभाजी,चायनीजच्या गाड्या त्या भोवती उभे राहून सतत खाणाऱ्या मुला माणसांची गर्दि दिसणार नाही. सिगारेट ओढणारी माणसं दिसतात पण जागोजागी पान तंबाखूच्या टपऱ्या कुठेच दिसत नाहीत.राजकिय नेत्यांचे,स्वयंघोषित भाई- दादांचे चौकाचौकात झळकणारे आणि शहर विद्रूप करणारे बॅनर्स, सार्वजनिक,धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने रस्त्यातच टाकलेले मांडव दिसणार नाहीत.डी जे वरच्या कानठाळ्या बसवणाऱी गाणी ऐकायला मिळणार नाहीत.इथे सहज कानावर पडते ती मशिदीं मधून येणारी कर्ण मधुर अजान.ती संपली की पुन्हा सर्व शांत. इथे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जवळ जवळ नाहीच.रीक्षा,टेम्पो,सिक्स सीटर ,प्रचंड संख्येने धावणाऱ्या टू व्हिलर्स काही म्हणजे काही दिसत नाही. इथे राहणाऱा सामान्य नोकरदार माणूस असला तरी त्याच्याकडे स्वत:ची कार असते.अत्यावश्यक गरजांसाठी माॅल आहेत.खवय्यांसाठी उत्तम हाॅटेल्स आहेत.हाॅटेल्स मधे भाजी बरोबर रोट्या पाहिजे तेवढ्या खा..फ्री..!!! मात्र बॅचलर्स किंवा सिंगल व्यक्तिंसाठी वेगळा विभाग असतो.कुटुंबा सह असाल तर वेगळ्या फॅमिली रुम्स असतात.आपल्या इकडे कसं कुणीही कुणा समोर ,शेजारी येऊन बसू शकतो. असला प्रकार नाही .स्त्रियांना घरा बाहेर पडायचं तर आबाया घातल्या शिवाय पर्याय नाही.अरब लोक बुरख्याला आबाया म्हणतात हे ऐकल्यावर मला गंमत वाटली.बायांना आत डांबून ठेऊन मुक्त जीवनाचा आनंद घेऊ देण्याची धार्मिक प्रथा असल्यामुळे पहरावात " आत बाया " झाकल्या जातील असा आबाया आला.बायकां प्रमाणे अरब पुरुष वर्ग पांढरा स्वच्छ गाऊन आणि डोक्याला लाल चौकडीचा रुमाल बांधतात तो गळून पडू नये म्हणून त्यावर एक रींग असते काळ्या रंगाची.अंगावरच्या पुरुषांच्या गाऊनला " थोब " म्हणतात.डोक्यावरच्या रुमाल आणि रींगला - ".अकल '' डोक्यावरच्या रुमालाला घुत्रा' डोक्यावरील घुत्राच्या आत गोल टोपी असतेच.नमाजाच्या वेळेला असावी म्हणून . स्त्रीने डोक्यावरुन पदर घेण्याची अंगभर वस्त्रं घालण्याची पध्दत आपल्याकडेही होती अजूनही ग्राम जीवनात ती पाळली जाते.पुरुष वर्ग फेटा,टोपी,घालताना शहरातही दिसतातच.वास्तविक पोषाखाच्या विविध पध्दतीचा धर्माशी काही संबंध दिसत नाही. सौदी किंवा गल्फ कंट्रीज मधील पेहरावांची ही प्रथा इथल्या अती उष्ण हवामानामुळे अस्तित्वात आली. ज्या ठिकाणचे तापमान ५० - ५५ च्याही पुढे जाते तिथल्या उन्हाचा चटका किती दाहक असेल? डासां पासून उन्हा पासून त्वचेचे संरक्षण व्हावे म्हणून बुरखा किंवा थोब .सामान्य माणसांची कळतं पण वळत नाही अशी स्थिती असते म्हणून त्याला धर्माची जोड दिली गेलीय.पण सगळेच सौदी पुरुष थोब वापरतात असं नाही.तरुण मुलं शर्ट पॅंट बूट वापरतात.काही पुरुष आतून शर्ट पॅंट असली तरी वरुन थोब घालतातच .
आम्ही मुलाकडे जिथे राहतोय त्या भागाला यानबु अल सिन्नयाह असे म्हणतात. यानबु अल बहार या मुख्य शहरातील ही औद्योगिक कर्मचाऱ्यांची वसाहत आहे.हे संपूर्ण क्षेत्र राॅयल कमिशनच्या आखत्यारीत येतं राॅयल कमिशन कमिशन म्हणजे आपल्या इकडची महापालिके सारखी संस्था. सरकारी संस्था म्हटलं की गलथानपणा वेळ काढू पणा,लाचखोरी या अपप्रवृत्तीं शिवाय असू शकत नाही असं एक उघड गुपित आहे.राॅयल कमिशन ही संस्था याला अपवाद आहे.इथे अनियमित पाणीपुरवठा,बेभरवशी विद्युत पुरवठा,ओसंडून वाहणाऱ्या कचरापेट्या अशा समस्यांना इथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत नाही.समस्या निर्माण होऊच नाहीत याची दक्षता घेणे,निर्माण झालेल्या समस्येचे ताबडतोब निराकरण करणे यासाठी राॅयल कमिशन सतत दक्ष असते.परंतू यानबु अल सिन्नयाह हा भाग सोडून यानबु सिटीत गेलात तर मात्र तिथला प्रशासकिय कारभार पुण्या मुंबई च्या महापालिका आणि एम एस इ बी सारखाच आहे. यानबु अल सिन्नयाह या भागातील वसाहतीची तुलना करायची झाल्यास ती आपल्या इकडच्या संरक्षण खात्यातील वसाहतींशी करता येईल.अल सिन्नयाह वसाहतीतील घरांची रचना एक सारखी दिसेल.घरांचा आतला बाहेरचा रंग एक तर आॅफ व्हाईट किंवा पांढरा दिसेल . अत्यावश्यक गरजांसाठी दाना माॅल आहे. प्रचंड मोठा.इथे वेगवेगळ्या कंपन्यांची दुकाने आहेत.आम्ही राहतो त्या परिसरात स्टार मार्केट आहे.तिथे बहुतेक सर्व अत्यावश्यक वस्तू मिळतात.शाहीन रेस्टाॅरंट आहे तिथे चेंज म्हणून जेवायला , चहापाण्याला जाऊ शकता.अल सिन्नायाह वसाहतीचे एकूण ७/८ विभाग आहेत प्रत्येक विभागात मशिदी आणि उद्याने आहेत.सर्वत्र कमालीची स्वच्छता आणि शांतता. घरा बाहेर तासनतास उभ्या राहून गप्पा मारणाऱ्या बायका इथे दिसणार नाहीत. कारण घराचे अंगण सोडून बाहेरच्या कचरापेटीत कचरा टाकायचा तरी आबाया घालावाच लागतो. " कांदे आले बटाटे आले, लींबू घ्या लिंबू " बोला परकर बोला परकर..' भंगार वाले..असे ओरडत येणारे फिरते विक्रेते इथे कुठेही दिसत नाहीत. सारं कसं शांत शांत. गेल्या कित्येक वर्षात अशी शांतता आम्ही अनुभवलेली नाही. ती अनुभवतोय, मजा येतीय एकंदरीत.आलो तसे पहिले चार दिवस इथल्या हवामानाशी शरीर- मन जुळवून घेण्यात गेले. मागच्या शुक्रवारी इथल्या काही मराठी परिवाराच्या सोबत जायचे ठरले होते.पण आभाला रात्रीत ताप भरला मग संध्याकाळी नुसतेच चायना बीच वरील पार्कमधे हींडून परत आलो.इथला समुद्र निळाभोर आणि शांत,स्थितप्रज्ञ आहे. इथल्या पार्कस् मधून तुम्ही एक-दोन रात्र तंबू ठोकून मुक्काम करु शकता.तो अनुभवही घ्यायचा आहेच.
©रमेश यशवंत वाकनीस©
१७/१२/२०१८
Comments
Post a Comment