यानबूच्या डायरी मधून

एक : यानबुच्या डायरी मधून

७ डिसेंबर...सवयीतून बाहेर पडण्याचा , सवयी मोडण्याचा आणि नवीन सवयींना (?) सामोरे जाण्याचा दिवस अखेर उजाडला.प्रत्येकाच्याच आयुष्यात असा दिवस येतोच येतो.लहानपणा पासून आपण आई , वडिल , बहीण , भाऊ , सगे- सोबती, यांच्या सहवासात वाढतो. ही वाढ काही फक्त शारिरीक नसते.मानसिक आणि बौध्दीक देखील असते.कुणाची सामान्य,कुणाची मध्यम तर कुणाची उच्च प्रतीची.इथे प्रत एवढी महत्त्वाची नाही. विशिष्ट वातावरणात आपण वाढतो.ते वातावरण आपल्याला आवडो किंवा न आवडो त्या वातावरणाशी, सहवासात येणाऱ्या माणसांशी जमवून घेत जगण्याची सवय आपल्याला जडते ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे. अचानक एखाद दिवशी बदलाला सामोरे जाण्याची वेळ आली तर शंभरातल्या नव्वद टक्के लोकांच्या मनाची तयारी नसते.काही तरी सबबी सांगून,शोधून, अशी मंडळी सवयीतून बाहेर पडण्याचा दिवस तो क्षण लांबणीवर ढकलायचा प्रयत्न करतात.त्यांना बदल नकोच असतो.पण कितीही नको असला तरी बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे.तो तुमची परवानगी न मागता तुमच्या सवयीच्या झालेल्या जगण्यात शिरतोच शिरतो. असा नाईलाजाने बदल स्विकारावा लागला तर माणूस जीवावर आल्या सारखा जगत राहतो.बदलातला आनंद तो लुटू शकत नाही.परिणामी दुसऱ्यालाही आनंद देता येत नाही.
   माझ्या बाबतीत म्हणाल तर मी सतत अधाशा सारखा बदलाची वाटच पहात असतो.वाट पाहून बदल होत नाही हे माहीत असल्यामुळे पेशन्स रहात नाहीत.मग काय काय बदलायला झालंय याची यादी मनातल्या मनात तयार करतो.जुना वाॅर्डरोप काढून टाकून नवीन बनवायचं ठरवतो.त्याचं एक असं डिझाईन बनवून बघतो की पाहणाऱ्याने बघता क्षणीच म्हटले पाहिजे- अरे व्वा...सोफा कम बेड बघितले खूप प्रकारचे पण  वाॅर्डरोप कम बेड कम स्टडी टेबल प्रथमच पाहतोय...!!! आता असली काही तरी अनकाॅमन वस्तू बनवायची म्हणजे सोपं काम आहे का? त्याला लागणारा पैसा, ती वस्तू बनवून देणारा कारागीर,वेळ आणि मुख्य म्हणजे बायकोची परवानगी या गोष्टी जुळून याव्या लागतात. मग काय बसा मनातले मांडे खात...पण किती दिवस? शेवटी त्याचाही कंटाळा येतोच आणि बदल हा प्रत्यक्षच अनुभवण्यातच मजा असते याची जाणीव होते. तर ७ डिसेंबरला आम्ही दोघेही जय्यत तयार होऊन कॅबने छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचलो पहिल्या काउंटरवर चेक इन करुन तिकिट,बोर्डिंग पास घेतले मग इमिग्रेशन...होऊन एकदाचे विमानात बसलो. अवती भवती सगळे पांढरे पंचे कमरेला गुंडाळलेले,अंगा भोवती पांढरीच वस्त्रं पांघरलेली मंडळी होती.मला हळूच अरुणा म्हणते , " निघताना देवाच्या पाया पडलात कां हो? " म्हटलो , हो..स्वामींना सवयी प्रमाणे म्हटलो देखील चला स्वामी सौदीला...आम्हाला आमच्या मुलांकडे सुखरुप पोचवा आणि परत या पाहिजे तर...!!! मी असं म्हटलो अरुणाला आणि एकदम लक्षात आलं अख्खं विमान खचाखच भरलय पण आमच्या शेजारचं तिसरं सीट रिकामंच होतं.मग अरुणाला म्हटलं," बघ दुष्यंत नी आपल्या दोघांचं नाही तिघांचं तिकिट बुक केल्या.हे सीट रिकामं दिसतंय पण रिकामं नाहीय.स्वामी बसलेत शेजारी..!!!  आजूबाजूला बसलेली स्त्री पुरुष मंडळी चाललीयत तरी कुठे? हा काही रमजानचा महिना नाही.मग एवढ्या मोठ्या संख्येने हे मक्केला चाललेत की हिंदूंचा असतो तसा यांचाही कुठे सत्संग आहे? असे अनेक प्रश्र्न मनात एकदमच उभे राहिले. माझ्या उजव्या बाजूला असलेल्या रांगेतल्या सीटवर बसलेला एक माझ्याच वयाचा गृहस्थ माझ्याकडे हसू की नको असं पहात होता.एकदोनदा अशी नजर भेट झाल्यावर मी त्याच्याकडे पाहून हसलो.वाटलं आता संवादाला सुरुवात होईल.पण नाही त्यानं हसल्या सारखं केलं आणि शेजारी बसलेल्या सोबत्याशी बोलायला लागला. काय गंमत असते नाही?...दोन अनोळखी माणसं समोरा समोर आली की आधी हसायचं कुणी? असं वाटून एक स्मित शेअर करायला संकोचतात.संकोच सोडून एक जण हसला की पुन्हा आधी बोलायचं कुणी?- असं वाटून पुन्हा संकोच.इतक्यात जणू माझे कुतुहल शमवायलाच एक चाळीशीचा,माणूस येऊन बसला. मी हसलो. म्हटलं," मक्का जा रहे हो क्या सब लोग?" - " हाॅं मदिना जा रहे है..आप कहाॅं जा रहे हो? "--तो. " हम यानबु जा रहे है..मेरे बेटेके पास.." इतक्यात त्याला मागच्या सीटवर बसलेल्या कुणी हाक मारली.त्याने मागे वळून पाहिलं. ही संधी साधून अरुणा लगेच कानाशी लागून म्हणाली, " अहो उगाच जास्त बोलू नका त्याच्याशी आणि काही सांगूहीनका." मी हसलो म्हटलं, टेन्शन घेऊ नको.तेवढाच टाईमपास..! तो माणूस परत माझ्याकडे बघून हसला.मी म्हटलं , " आपका कोई त्यौहार है क्या? " तेंव्हा तो म्हणाला, " हम लोग उमरा करने जा रहे है.. " उमरा ? वो क्या होता है?" मग त्यानं सांगितलं  ज्यांना हज यात्रा शक्य नाही त्यांनी किमान उमरा तरी करावा.आम्ही इंदूरहून आलोय.आमच्यात बरेचसे नवीन साधक आहेत. शिकतायत अजून.तो असं म्हणतो ना म्हणतो तोच आमच्या पुढच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या मौलवीने मोठ्या आवाजात सुरु केले...
         लब्ब ई  कला हुम्म लब्ब ई
         लब्ब ई कला शरीक लब्ब ई
         इन्नल हमदा वन्या मता
         दकवाल मुल्क...
         दा शरीक लब्ब ई..
तो सांगत होता तसे सर्व साधक एका सुरात म्हणत होते
जेध्धा येइ पर्यंत हे चालूच होते.मला दत्त माला मंत्राची आठवण झाली.चार धाम यात्रा नाही जमली तर निदान काशी यात्रा करावी, ती ही नाही जमली तर पंढरपूरची वारी करावी, ती ही नाही जमली तर कार्तिकात देहू आळंदी करावी. तसाच उमरा हा प्रकार आहेअल्ला म्हणा परमेश्र्वर  म्हणा त्याला भेटण्याची,त्याच्या महाद्वाराच्या  उंबऱ्याला स्पर्श करणारा इतकी पात्रता अंगी बाणवायची तयारी म्हणजे उमरा.आपल्याकडे तीर्थ यात्रा करण्याचे शास्त्र आहे, आहार विहाराचे नियम पथ्ये आहेत तसे उमरा करणारासाठी शास्त्र नियम आणि पथ्थ आहेतच. मंत्र किंवा श्र्लोक आहेत.यातलं काहीच येत नसेल तरी परमेश्वराचं द्वार सर्वांसाठी खुले आहेच.कारण तो तर तुमच्या आमच्या सर्व जीवमात्रांच्या ह्रदयात भरुन राहिला आहे.
      जेध्धाला विमानतळावर उतरलो तेंव्हा रात्रीचे १०.३० झाले होते. आता पुन्हा चेक आऊट काउंटरवर पासपोर्ट तिकिट दाखवले,फोटो हाताच्या बोटांचे‌ ठसे वगैरे उपचार पार पडले.मग बेल्टवरुन बॅगा घ्यायला किती वेळ लागतोय काय माहित असं मनात आलं तोच अरुणा म्हटली , अहो बॅगा आल्या पहा आपल्या..! बॅगा घेतल्या तेवढ्यात एक तरुण पोरगा पुढे आला आणि म्हणाला , ठहरो..ट्राॅली ला के देता हूॅं..ट्राॅली आणून त्याने आमच्या बॅगा ट्राॅलीवर उचलून ठेवलेल्या.एक्झिट डोअर दाखवले.आता बाहेर पडताना मनात धाकधूक सुरु झाली.आमच्या एका बॅगेत होमिओपॅथी औषधे होती.या औषधात अल्कोहोल असतं, तसं सर्वच पॅथीच्या औषधात ते असतं पण कां कोण जाणे होमिओपॅथी औषधाला सौदी सारख्या देशात औषध म्हणून मान्यता नाही.त्यामुळे स्कॅनिंग मधे जर आपले हे बिंग फुटले तर सगळंच मुसळ केरात जाणार होतं.एवढी पॅकींग करुन साड्यांच्या घड्यातून लपवून आणलेली औषधे फेकून तर द्यावीच लागली असती शिवाय औषधाविना
तीन महिने काढावे लागले असते ते वेगळंच.कधी कधी कायदा विचित्र असतो म्हणतात तो असा.चोरुन ,लपवून काही करावं असं‌ मनात नसताना ती गोष्ट चोरुन लपवून करावी लागते.एअरपोर्टच्या बाहेर पडलो तेंव्हा एकदम दोघं तिघं समोर टॅक्सी टॅक्सी म्हणत आले. त्यातला एकजण स्मोकिंग‌ करत होता.खाली आजूबाजूला सिगारेट्सची थोटकेही पडलेली दिसली.दुष्यंतला दाखवलं‌ तर म्हणाला इथे‌ हुक्का,सिगारेट जोरात चालते.अर्थात अधिकृतपणे नाही. दारु ,अफू गांजा यावर मात्र संपूर्ण बंदी आहे.
कुणाकडे यातलं काही सापडलं तर शिक्षाही जबरदस्त आहेत.स्त्रियांना आबाया मंजे बुरखा सक्तीचा आहे.आपल्या इथे तोकडे कपडे घालून देवळात जाऊ,मासिक पाळीच्या वेळेला देवळात गेलो तर तुमचा देव काय भ्रष्ट होतो काय? असले प्रश्र्न विचारण्याचे लाड इथे पुरवले जात नाहीत.नियम म्हणजे नियम तो पाळायचा.बस्स खलास.नाही तर भयंकर शिक्षा आहेतच.पण हळूहळू बदल होऊ लागलाय.आता स्त्रिया ड्रायव्हींग वगैरे करु शकतात .चेहरा,हाताची बोटे सर्वांना दाखवू  शकतात.सभ्यतेचे सर्वमान्य असे नियम जगातल्या प्रत्येक देशात संस्कृतीत आहेत.ते पाळावेत अशी अपेक्षा सर्वांना मंजूर असते.पण माणसाने नीतीमत्तेने वागावं, परमेश्र्वराचं अस्तित्व मान्य करावं म्हणून भरचौकात फाशी, हातपाय तोडणे,वगैरे शिक्षा बुध्दीवादी माणसाला मान्य नसतात.म्हणूनच मुस्लीम देश सोडले तर जगातल्या बहुतेक देशांनी लोकशाहीचा पुरस्कार केल्याचे दिसते. त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही त्या देशातल्या माणसांना भोगावे लागतातच. बॅगा स्कॅन होऊन ताब्यात घेऊन बाहेर पडे पर्यंत हे एवढे सगळे विचार मनात आले.बाहेर दुष्यंत ,स्नेहा आणि आभुटली वाटच पहात होते.दुष्यंतनी लांबूनच हात दाखवून हाक मारली.आभुटली पळत पळत येऊन आजीला बिलगली..चहा घ्यायचाय का बाबा?...दुष्यंतकडे बघून मी म्हटलं, हे काय विचारणं झालं? चहा घेत असताना आभा लांब उभं राहून आमच्याकडे अशी पहात होती की तिला जणू खरंच वाटत नसावं की व्हिडीओ काॅलवर येतो,येतो म्हणणारे आजी आजोबा चक्क खरंच आपल्या समोर उभे आहेत.इथून पुढे कारचा तीन साडेतीन तासांचा प्रवास होता.मुलां सोबत तो हा हा म्हणता संपला.राॅयल कमिशन, ५८१२ नंबरच्या आमच्या मुलांच्या घरात आम्ही प्रवेश केला तेंव्हा साडेतीन वाजून गेले होते.पण शीण कसा तो नव्हता.मनातला आनंद शब्द शोधत,वेचत बागडू लागला होता...!!!

©रमेश यशवंत वाकनीस ©
११/१२/२०१८ यानबु 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७