सहज सुचलं म्हणून
वाचन वेड
८व्या इयत्तेत असताना मी एक ' हुकलेला डाव ' या नावाची रहस्य कथा लिहीली होती.ती फारच चांगली जमलीय असं वाटून मी ती 'रोहीणी' मासिकात पाठवली.आठ दिवसा नंतर हा माझा उद्योग घरात सर्वांच्या लक्षात आला.कारण एक पोस्ट कार्ड आले.आपली कथा मिळाली वाचून निर्णय कळवू वगैरे.नंतर ती साभार परत आली ते सोडा.पण यामुळे वडिलांनी माझी कथा वाचली आणि एवढंच म्हणाले,'तू अरविंद गोखलेंच्या कथा वाच..अर्नाळकर काही कामाचे नाहीत..' त्यांनी अर्नाळकर हे नाव कसे घेतले ते आता आठवत नाही पण कुणी तरी कधी तरी आणलेले एक छोटेखानी पुस्तक आमच्या घरात इकडे तिकडे लोळत असायचे.मी ते वाचले होते.ते वाचुनच मला कथा लिहायची बुध्दी झाली होती.पुढे असं कळलं की बऱ्याच मोठ्या साहित्यकारांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात अर्नाळकर वाचले होते.वडिलांनी अरविंद गोखल्यांचे नाव घेतले पण आमच्या मराठीच्या पुस्तकात त्यांचा कुठलाच धडा नव्हता.पुढे एक दिवस माझा भाऊ लायब्ररीतुन प्र.के.अत्र्यांच 'मी कसा झालो' झालो घेऊन आला.संध्याकाळी तो वाचायचा आणि आम्ही सगळे ऐकायचो.पोट धरुन हसायचो.अत्रे मला माहित होते.त्यांचा 'कुत्र्याच पिलू' हा धडा वाचताना मलाशेवटीशेवटी रडू यायचं.माझी कथा 'रोहिणी'त प्रकाशित झाली नाही.पण त्यांनी आमच्या पत्त्यावर अंक पाठवला.एकदा तो अंक चाळून बाजूला फेकत वडील म्हणाले,' हे काय मासिक आहे? निम्मा अंक वधुवरांच्या माहितीनी भरलाय..' आई म्हणाली,अंक खपायला पाहिजे न त्यांचा.त्या 'मेनका' 'रंभा' त घाणेरडं काहीतरी छापण्या पेक्षा वधुवरांची माहिती छापलेली चांगली.आईनं बोलण्याच्या ओघात जी नवीनच दोन मासिकांची नावं घेतली ते ऐकून घाणेरडं काहीतरी छापणाऱ्या या मासिकां विषयी उत्सुकता निर्माण झाली.एक दिवस टिळक रोडच्या फुटपाथवर ती मासिकं मला दिसलीच.त्यावर एकमेकांच्या मिठीत असलेल्या स्त्री-पुरुषांची चित्रं होती.एक माणूस त्यातलं एक मासिक उचलून चाळत होता.ते पाहून मलाही ईच्छा झाली उचलून बघावं तरी काय आहे? पण धाडस झालं नाही.दुसरं असं की तू अरविंद गोखले वाच असं वडिल म्हणाले होते त्यांची कथा यात नसेलच तर?..असा ही विचार मनात आला..मग सरळ घरी आलो..
मी कसाबसा मॅट्रिक झाल्या नंतर काॅलेजला गेलो खरा पण प्रीडीग्री आर्टसच्या पुढे काही गाडी जाईना.घरच्यांनाही शिक्षण पूर्ण होण्यापेक्षा मी पोटाला कधी लागतोय याची घाई झालेली.मलाही औपचारिक शिक्षणात रस वाटेनासा झाला होता.अशा सिच्युएशन मधे ओगले,चंदूमामा,(चंद्रकांत सहस्रबुध्दे) हे समदु:खी मित्र भेटले..त्यांनाही लिहायचा वाचायचा छंद.त्यांच्यामुळे फक्त दहा नव्या पैशा मधे वाचनाची सोय असलेली 'प्रभात वाचनालय ' ही लायब्ररी सापडली. पुढे बेकारीच्या काळात तर हे माझं आत्मिक भूक भागवणारं आवडतं स्थान ठरलं.शिक्षणात लक्ष नाही,नोकरी मिळवत नाही म्हणून घरी आई -वडीलांची बोलणी खाण्यापेक्षा मला या लायब्ररीतलं शब्दांचं खाद्य बरं वाटायचं.इथे मला महाराष्ट्रातली एकूण एक साप्ताहिकं,मासिकं,कथा संग्रह,कादंबऱ्या सगळं वाचायला मिळत होतं.मी खूष होतो. कारण मला इथे भेटलेले सर्व लेखक माझं ऐकत होते,मला समजून घेत होते.शाळा,महाविद्यालयातून मिळणाऱ्या औपचारिक शिक्षणा पेक्षा पुस्तकं काही मोलाचं,अलौकिक गोष्टी सांगत होती.इथे मला अरविंद गोखले,विद्याधर पुंडलीक,दि बा मोकाशी,व्यंकटेश माडगुळकर,शंकर पाटील,गोनिदा,अशी सगळीच महान मंडळी भेटली.इथेच मला सत्यकथा,साप्ता.माणूस,साप्ता.सोबत,अनुष्टभ,अशी दर्जेदार नियतकालिके वाचायला मिळाली.इथेच मला कळलं की आपल्याला,भालचंद्र,मानिनी,सुवासिनी,गावकरी,मेनका,रंभायातल्या कथा कविता आवडत नाहीयत.मेनका,रंभा मधे आई म्हणाली तसं घाणेरडं काय असतं तेही बघून झालं.दर दोन पानं उलटली की,' मग त्यानं तिला आपल्या बाहूपाशात ओढली आणि तिचे ओठ आपल्या ओठात घेतले' बहुतेक सगळ्या कथां मधला हा श्रुंगार मिठी आणि चुंबना पलिकडे जात नसे.फक्त मिठी कधी घट्ट तर कधी अलगद पडलेली असायची आणि चुंबनं दीर्घ,खोल वगैरे असायची.बाकी त्यात विशेष असं काही नसे.पुढे एका कुठल्या तरी कार्यक्रमात ग.वा. बेहेरे यांनी मेनका,रंभा,ही श्रृंगारिक मासिकं मी पैसे मिळवण्याठीच काढतोअशी स्पष्ट कबुलीच दिली.याच ग.वांचं 'सोबत'हे साप्ताहिक वैचारीक मेजवानी देणारं म्हणून बुध्दीजीवी वर्गात अतिशय लोकप्रिय होतं.यातली माधव मनोहरांची नाट्य परिक्षण अतिशय वाचनीय असत.आठवडाभरातल्या राजकिय,सामाजिक, साहित्यिक घडामोडींवर रोखठोक लेख असायचे. मराठीतील थोर नाटककारांची,साहित्यिकांची ओळख होत होती तसतसं सकस,अंतर्मुख करणारं वाचायचं हे वेड वाढतच गेलं.याच प्रवासात ' सत्यकथा 'अनुष्टुभ' 'अभिरुची'अशा नियतकालिकांची भेट झाली.यातल्या कथा,कविता मनावर गारुड करत होत्या.आरती प्रभू,विंदा,पाडगावकर,ग्रेस,अशा अनेक दिग्गजांच्या प्रारंभीच्या कथा कविता यात प्रकाशित झालेल्या होत्या.साहित्यिक म्हणून जगाने आपल्याकडे बघावं असं वाटत असेल तर तुमच्या कथा,कविता सत्यकथेत प्रकाशित व्हायला पाहिजेत असा दृढ समज त्यावेळी होता.तो खराही होता काही प्रमाणात. सत्यकथा,माणूस,अनुष्टुभ ,मधे भेटणारी लेखक मंडळी काही वेगळं सांगतायत.काहीतरी वेगळं शोधतायत.मग मला आवडणारी ही मंडळी ज्यात सापडतील तीच मासिकं हातात घ्यायची हे नकळत ठरुनच गेलं.पण काळाचा महिमा और असतो.महाराष्ट्रात तळागाळातल्या तरुण कवी साहित्यिकांनी आपल्या लेखणीने सत्यकथेच्या ख्यातीला व दबदब्याला आव्हान दिले.सत्यकथेची भरचौकात होळी केली.साहित्यक्षेत्रात उमेदवारी करणाऱ्या मंडळींचं आशा स्थान असलेलं 'सत्यकथा' श्री.पु.भागवतांनी बंद केलं.असं झालं तरी श्रेष्ठ साहित्याच्या प्रवाहाचे उगम स्थान ही सत्यकथेची ओळख कोणी पुसू शकलं नाही.आजही ती आहे व उद्याही ती तशीच राहील. पुढे नोकरी लागल्यावर पगार झाला की पुस्तकाचं दुकान गाठून मी सदानंद रेगे,खानोलकर,ग्रेस,जीए,दीपु चित्रे,गोनीदा,ढसाळ,भाऊ पाध्ये,चंद्रकांत खोत,दया पवार,प्र.ई. सोनकांबळे,विश्राम बेडेकर,विलास सारंगअशा माणसां पैकी एखाद्याला घरी घेऊन यायचो.कधी विकत ,कधी लायब्ररीतून.बाकीच्यांना भेटायला प्रभात वाचनालय,पुणे मराठी ग्रंथालय,नगर वाचन मंदीर अशा ठिकाणी जायचं.काही कविता संग्रह मी इंटरनॅशनल बुक डेपो, मॅजेस्टिक बुकस्टाॅल अशा ठिकाणी उभ्याउभ्यावाचले आहेत.पुस्तक विक्रीची एक नवीन पध्दत अस्तित्वात आली होती.या,पुस्तके चाळा,वाचा विकत घ्या.खिशात पैसे नसले की हे बरं पडायचं.फुटपाथवर सुध्दा जुनी दर्जेदार पुस्तकं अजूनही मी पैसे असतील तर विकत घेतो किंवा त्या विक्रेत्याशीच थोड्या गप्पा मारुन मी एखादा कविता संग्रह वाचून काढायतो,काढत असे..वाचन वेडाच्या या प्रवासात मला एवढं समजलं की प्रकाशित झालेलं सर्वच साहित्य हे साहित्यकृती म्हणून जरी मिरवत असलं तरी ते वाचणारा वाचकवर्ग आहे त्याच्या अनेक परी आहेत.गंभीर,अंतर्मुख करणारं हवं असणारा वाचक वर्ग आहे यांची संख्या कोणत्याही समाजात कमीच आढळत असली तरी महत्त्वपूर्ण असते.याहून अल्पसंख्यच असलेला ही एक वाचकवर्ग असतो याला फक्त रुक्ष,वैचारिक,संशोधनपरच वाचायला आवडतं.तिसरा एक वाचकवर्ग असतो तो पहिल्या दोन प्रकारांच्या मधला असतो.त्याला जीवनातल्या विविध अनुभवांचं प्रत्ययकारी दर्शन देणारं काहीतरी हवं असतं.असा वाचकवर्ग पहिल्या दोन प्रकारच्या साहित्यकृतीं बरोबरच ह्दयस्पर्शी,भावनिक आवाहना बरोबरच बुध्दीलाही आवाहन करणाऱ्या साहित्यकृतींचे स्वागत करणारा असतो.तिसरा वाचकवर्ग फक्त दोन घटका करमणूक व्हावी म्हणून वाचनाकडे वळतो.याला फक्त हलकंफुलकं काहीतरी हवं असतं.डोक्याला ताप देणाऱ्या साहित्याकडे आयुष्यात कधी वळतच नाही.चौथा प्रकार असतो तो फक्त धार्मिक,अध्यात्मिक ग्रंथच पसंत करतो.बाकी साहित्याचा जीवनाला काडीचाही उपयोग नाही असंच त्यांचं मत असतं.समाजातली यांची संख्या लक्षणीय असते.चौथा आणि शेवटचा एक वाचक वर्ग असा असतो ज्याला संस्कृती,समाज प्रबोधन,साहित्य संमेलने साहित्यिकांचे समाजातले स्थान वगैरे गोष्टींशी काहीही घेणं नसतं.हा आधी वाचनाकडे फारसा फिरकत नाही.चुकून फिरकला तर त्याला स्वत:चं असं कोणतंच मत नसतं.हा मनापासून काहीच वाचत नाही.किंवा काहीही वाचतो.आत्मिक,बौध्दीक भूक या वर्गाला नसतेच. हा वाचकवर्ग जी.एं ची कथा वाचेल आणि 'त्या गुरुनाथ नाईक सारखं नाही हो..' असं म्हणेल.चिं त्र्यं खानोलकरांना एकदा लोकल मधे चांदोबा वाचणारा एक माणूस दिसला त्याला पाहून ते पाडगावकरांना की कुणाला म्हणाले,'माझ्या हातात बंदूक असती तर मी त्याला गोळीच घातली असती.वाचकांच्या जेवढ्या परी आहेत तशा साहित्यिकांच्याही परी आहेत.साहित्यकृतीच्यानिर्मितीच्या प्रक्रियेत असणाऱ्या लेखकाच्या किंवा कवीच्या समोर ठराविक असा वाचकवर्ग नसतो.पण लिहून झाल्यावर त्याला हे कळू शकतं की आपण लिहीलेली ही साहित्यकृती कोणता वाचक वर्ग पसंत करेल? यातून आपल्याला पैसा मिळेल का? किंवा त्यासाठीच आपल्याला लिहायचय कां?की आपल्यासाठी जीवनाचा,स्वत:चा शोध महत्त्वाचा आहे आणि जीवन सत्याचं दर्शन घडतं आणि घडवणं हेच आपलं अंतिम उद्दीष्ट आहे? असे प्रश्र्न प्रत्यक्ष लिहीताना सहसा कुणाला पडत नाहीत.ज्यांना हे पडले आणि जाणीवपूर्वक स्वत:ला मिळालेल्या उत्तरासाठी लिहीत राहीले असा लेखक कवी मला अद्याप भेटलेला नाही.मघाशी लिहीण्याच्या ओघात गुरुनाथ नाईक हे नाव आलं.नुकतच ते विपन्नावस्थेत असल्याचं कळलं .हजारच्या आसपास त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली.लिहीता हात होता तोवर त्यांचं बरं चाललं असावं.पण म्हातारपणी आर्थिक ओढगस्ती वाट्याला येऊन हाल आपेष्टात जीवन संपुष्टात आलं.लेखनातून पोटा पुरतं मिळालं.जीवन सार्थकी लागलं असं त्यांच्या अंत:समयी त्यांना वाटलं असेल का? बरं एवढी पुस्तकं लिहून साहित्यिक म्हणून मानसन्मान,प्रतिष्ठा वाट्याला आली कां? तर तेही नाही.मान्य आहे की यासाठी कुणी लिहीत नाही.लिहू नाही पण माणसाला आयुष्यभर केलेल्या कामातून एकतर भौतिक समाधान मिळायला पाहिजे.किंवा आत्मिक समाधान तरी मिळायला पाहिजे.पण सर्वांच्याच वाट्याला ते येत नाही.गुरुनाथ नाईकांनी सारखी अनेक उदाहरणं घडून गेली असतील तरीही पिढ्यां मागून पिढ्यात हात उगवतायत.नवीन साहित्य सृजन करायला शिवशिवतायत.ही किमया आहे जीवनोत्सुकतेची.निसर्गदत्त सृजनशक्तीची.मनुष्याच्या या सृजनशक्तीला माझे कृतज्ञतापूर्वक दंडवत..!!!
©रमेश यशवंत वाकनीस©
१६/३/२०१९
Comments
Post a Comment