सहज सुचलं म्हणून
सहज सुचलं म्हणून...
पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवसृष्टी म्हणजे निसर्गाची किमया आहे.जन्माला येणाऱ्या प्रत्येक सूक्ष्म-स्थूळ जीवाला तीन महत्त्वाच्या देणग्या दिलेल्या आहेत.एक स्वत:साठी योग्य काय अयोग्य काय याचा निर्णय करण्याची बुध्दी भावना आणि स्वसंरक्षणासाठी एक हत्यार किंवा कवच.या तीन देणग्या देताना त्याने जीवांच्या गरजे नुसार प्रतवारीही निश्र्चित केली आहे.ही गरज गरज म्हणजे नेमके काय तर वारंवार मिळावं असं सुख किंवा आनंद.यालाच दुसऱ्या शब्दांत तहान-भूक असं म्हणता येईल.ही तहान-भूक भागल्या शिवाय कुठल्याच जीवाला सुखाची किंवा आनंदाची प्रचिती येत नाही.ही तहान-भूक शारीरीक व भावनिक अशा दोन्ही पातळीवर शमवण्यासाठी जीवमात्र संघर्ष करीत असतात.सर्व जीवमात्रात मनुष्य वेगळा उठून दिसतो त्याचं कारण त्याला निसर्गाकडून लाभलेली उच्च प्रतीची बुध्दी..!
निसर्गाने दिलेल्या या प्रज्ञेच्या जोरावर माणसाने सर्व क्षेत्रात प्रचंड प्रगती केल्याचे आज दिसते आहे.संगीत,नाट्य,चित्र,नृत्य,वाङमय,विज्ञान,तंत्रज्ञान, मनोकायिक शास्त्र,ज्योतिष,खगोल...मारुतीच्या शेपटा सारखी ही यादी वाढतच राहील..!! सांगण्याचा मुद्दा असा की वयाच्या अगदी. चौथ्या-पाचव्या वर्षात कोणत्या विषयात नैसर्गिक ओढ आहे,कोणकोणत्या क्षमता आहेत हे आपलं आपल्याला कळायला लागतं आणि आपण त्या विषयात रस घ्यायला लागतो.आवडीच्या विषयातल्या मित्र-मैत्रिणींचा शोध सुरु होतो.त्यांचाच सहवास हवाहवासा वाटू लागतो.अंगी असलेल्या क्षमता सिध्द होणं त्यांचा योग्य दिशेनं विकास होणं व त्या विषयातले तज्ज्ञ म्हणून समाजात आपली ओळख निर्माण होण्या पर्यंतचा हा प्रवास म्हणजे आपली आपल्यातच सुरु झालेली व कधीच न संपणारी शोध यात्रा असते.या यात्रेत स्पर्धा दुसऱ्या कुणाशी नाही तर स्वत:शीच करायची असते.कालच्या पेक्षा आजची माझी कथा,कविता,चित्र,दर्जेदार झाले आहे की नाही हे तपासत पुढे जात रहावे लागते.या मार्गातआपले आई-वडील,गुरु,शिक्षक, मित्र-मैत्रिणी,यांचं मार्गदर्शन जरुर लाभतं पण मरे पर्यंत त्याच एका विषयाचा ध्यास घेऊन यात्रा करणारे तुम्ही एकटेच असता.' ही यात्रा सुफळ संपूर्ण व्हायची असेल तर तुम्हालाच तुमचे क्रिटीक व्हावे लागते.नुसते एवढेच नाही तर आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहोत त्यात आपल्या हातून काही 'युनिक' निर्मिती होते आहे का?ही निर्मिती आहे की फक्त उत्पादन आहे?असे प्रश्न स्वत:लाच विचारावे लागतात.त्याची उत्तरेही स्वत:नेच मिळवायची असतात.तज्ञ म्हणून ओळख समाजात आहे असे गुरु आजकाल भेटतात पण त्यांचा शब्द अंतिम न मानता आपल्या
स्वत:ला, अंतरात्म्याला,काय वाटते हे महत्वाचे.त्यानुसारच निर्णय घेणे योग्य ठरते.'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती | चालविशी हाती धरोनिया | ' असं म्हणणारे तुकोबांनी देखील ' विठ्ठल ' या एकाच विषयाच्या ध्यासात एकाकीच यात्रा संपवली.विषय कोणताही असो त्या ध्यासात यात्रा करत राहणे,चालत राहणे सोपे नसते.कारण आपण ज्या विषयाचा ध्यास घेऊन काम करत असतो त्याचा प्रसार करण्याचे कामही आपल्यालाच करावे लागते.आपण आपल्या विषयात केलेले काम सर्वोत्तम व्हावे म्हणून केलेल्या प्रयत्नांचा प्रवास जेवढा आनंददायी असतो तेवढे आनंददायी असे जगात काहीही नाही.भौतिक यश औषधांच्या साईड इफेक्ट सारखे कमीजास्त प्रमाणात ओघाने मिळतेच त्याची फिकीर करु नाही.आपले आवडते काम कोणत्याही परिस्थितीत करत राहणे जितके आनंददायी आहे तितके आनंददायी जगात दुसरे काहीही नाही एवढे कायम लक्षात ठेवावे म्हणजे झाले.
©रमेश यशवंत वाकनीस©
भटकबोल्या:९०९६८००६५३
Comments
Post a Comment