सहज सुचलं म्हणून
सहज सुचलं म्हणून
-------------------------
निवडणुकीचे पडघम वाजायला लागले की राजकीय मंडळींना भिकारी करुन ठेवलेल्या मतदार राजाचा भयंकर कळवळा येतो.पाच वर्षात ज्या मतदार संघातल्या रस्त्यांवरचे खड्डे दिसलेले नसतात ते दिसायला लागतात.त्यांची डागडूजी लगेच सुरु होते.एरवी सामान्य मतदाराला ज्याचं दर्शनही दुर्लभ असतं ती धनदांडगी नेते मंडळी चक्क आपल्या या मतदार राजांच्या घरांचे उंबरे झिजवायला सुरुवात करतात.अगदी पायाबिया पडून आशिर्वाद असू द्या वगैरे म्हणतात.आपल्या राजासाठी काय करु न् काय नको असं या नेते मंडळींना होऊन जातं.त्यांचा हा मतदार राजा सुध्दा त्याच नाटकी पणाने तोंड भरुन हसतो.कारण त्याला माहित असतं की आरशातलं प्रतिबिंब कितीही आकर्षक,मोहक दिसलं तरी हे खरं नाहीय.याच्या अंगावरच्या एकाही दागिन्याला आपण स्पर्श करु शकणार नाही.याच्या बुडा खालच्या गाड्या,याच्या मालकीचे गगनचुंबी महाल,याचे फार्म हाऊस,सगळं डोळे दीपवणारं,भुरळ घालणारं असलं तरी आपलं नाही.यातल्या एकाही गोष्टीला आपण साधा स्पर्श ही करु शकत नाही.मग ते पदरी पडण्याची गोष्टच सोडा.आपण मतदानाचे दिवसा पर्यंतच राजे आहोत.याच्या जाहीरनाम्यात आपल्या सारख्या सामान्य माणसांसाठी बऱ्याच गोष्टी असल्या तरी त्याचे लाभार्थी आपण नाही आहोत.या सगळ्या कागदावरच्या योजनांचे खरे लाभार्थी हे राजकीय नगरसेवक, आमदार,खासदार,आणि त्यांचे पित्तेच आहेत.यांच्याकडून काही मिळवायचं म्हणजे यांच्या पायाशी बसून वर्षानुवर्षे यांचे भजन करावं लागतं तेंव्हा कुठे यांचे सत्ताधुंद डोळे उघडले तर उघडतात.स्वाभिमान वगैरे खुंटीला टांगून लाळ घोटण्याची कला अवगत करुन घेतली तरी हेतू साध्य होईलच याची शाश्वती नाही.कारण या व्यवस्थेतला कुठलाही व्यवहार सरळ नाही.फसवाफसवी,पळवाटा या ठेवल्याच पाहिजेत असाच इथला दंडक दिसतो.या वास्तवाला सामान्य गरीब माणसांनाच सामोरे जावे लागते असे नाही श्रीमंतांनाही जावे लागते.पण सामान्य माणसा इतकी झळ त्याला सोसावी लागत नाही.यात खरा भरडला जातो तो मध्यम वर्गीय सामान्य मतदार.त्याच्यासाठी मागे उरते ती म्हणजे आपली संस्कृती,आपली आदर्श जीवनमुल्ये,वगैरे जपण्याची जबाबदारी.हे म्हणजे तुकोबांनी एका अभंगात म्हटलय तसं झालं.गुराख्यानी गुरं राखायची ती सगळी आपलीच आहेत या भावनेनीच पण त्या पासून मिळणाऱ्या दही, दूध,लोण्यावर मात्र हक्क सांगायचा नाही.तो हक्क लोकशाहीतील मालकांचा.नेते मंडळींचा.
©रमेश यशवंत वाकनीस©
Comments
Post a Comment