यानबुच्या डायरी मधून

पाच
अल लीथ नंतर पुन्हा डेझर्टवर कुठे जाणं झालं नाही.पण पार्क मधे भोगी साजरी केली.स्नेहानी केलेल्या बाजरीच्या भाकरी भाजीचा आस्वाद आम्ही रात्री हिरवळीत बसून घेतला.इथे तेवढीच एक करमणूक असते नागरीकांना.शुक्रवार उजाडला की यानबु मधल्या  बहुतेक पार्क मधे सौदी नागरीक सहकुटुंब तंबू ठोकून शनिवार संध्याकाळ पर्यंत राहतात.तुम्ही घरुन सगळं भोजन घेऊन या किंवा पार्कमधे शिजवा कुणी आडवणार नाही.बरं तुमच्या चीज वस्तू चोरीला वगैरे जातील याची भीती बाळगायचं कारण नाही.पोलीस व्हॅन सारखी फिरत असतेच.सहकुटुंब रहात असलेल्या तंबूच्या आसपास एखादा बॅचलर उगाचच घुटमळताना दिसला तर त्याची चौकशी होतेच होते.पण तुम्ही एकटे वाॅकसाठी ,जाॅगिंग साठी कुठल्याही पार्कमधे जाऊ शकता.इथे युथ बीचच्या पार्क मधे तर अत्याधुनिक व्यायामाची साधन सामुग्री सर्वांसाठी तीही विनामुल्य उपलब्ध आहे.इतकेच काय परदेशातून आलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या हौसिंग कॅम्पस मधे देखील अशा सुविधा उपलब्ध आहेत. वाॅकसाठी,जाॅगिंगसाठी पाचशे मीटरचे विशेष ट्रॅक आहेत.स्त्री-पुरुषांसाठी वाॅशरुमची सुविधा पण विनामुल्य आहे.यात अडचण एवढीच की पुरुषांच्या वाॅशरुमस् साठी पुरुष सफाई कर्मचारी आहेत.स्त्रीयांच्या  वाॅशरुमस्  साठी स्त्री सफाई कर्मचारीच नाहीत आणि पुरुषांना ती साफ करायची परवानगीच नाही.असे असले तरी इथली स्वच्छतागृहे स्वच्छ,भरपूर पाण्याची सोय असलेली दिसतात.अस्वच्छता अपवादात्मक दिसते नाही असं नाही पण प्रमाण कमी.शिवाय पार्क मधे,बीचवर,नमाज पडण्यासाठी मशिदी आहेतच.नमाजाची वेळ इथे इतकी महत्त्वाची आहे की त्यावेळेला सरकारी,खाजगी,संस्था असो,माॅल असो,दुकान असो,दिवसातुन ५ वेळा सर्व व्यवहार बंद म्हणजे बंद.कुलुप ठोका नमाज पढा वीस मिनिटांनी पुन्हा उघडा.व्यवहार चालू करा.पूर्वी म्हणजे १९७०-१९७५ च्या काळात नमाज न‌ पढणाऱ्याला नुसती कठोर शिक्षा नाही तर अत्यंत क्रूरपणे त्याचे हाल करायचे.रस्त्यावरुन ओढत फरफटत वगैरे घेऊन जायचे म्हणे.पण आता तसे काही नाही.नमाजच्या वेळेला २५ मिनिटांसाठी व्यवहार बंद ठेवतात.पण कुलुप ठोकत नाहीत.आता तर स्त्रीयांना कार चालवायला,चेहरा,हात उघडा टाकायला परवानगी आहे.तरी पण मूळ सौदी स्त्रीयांवर धार्मिक परंपरेचा पगडा जबरदस्त आहे . त्यामुळे या सवलतीचा लाभ घेण्याचं धाडस करणाऱ्या स्त्रीयांची संख्या अत्यल्प आहे.त्यामुळे घरातल्या वडिल माणसांना वेळ नसेल तर अगदी १०-१२ वर्षांचा मुलगा देखील कार चालवून आपल्या आईला-बहिणीला मदत करु शकतो.त्याला ट्राफिक पोलीसांची दयाबुध्दी काही कारवाई करु देत नाही. सौदी राजेशाहीला हे कळून चुकले आहे की आपली पेट्रोलची दादागिरी फारकाळ चालणार नाही.जगा बरोबर बदलायला पाहिजे.बदलाचा वेग कमी असला तरी तो वाढणार आणि सौदीची दुबई होणार असे म्हणायला हरकत नाही.आता थोड्याच दिवसात जेद्दाहला नवीन मल्टिफ्लेक्स थिएटर सुरु होईल.सौदी नागरीकांना आता सिनेमा बघायला दुबई ला जायला नको.करमणूकीचं एक दालन खुलं झालं.आणखीही होतील अशी आशा करायला हरकत नाही. इथली विस्तीर्ण उद्याने आणि हिरवीगार वृक्षराजी पाहिली की ज्याच्याकडे जे नाही त्यालाच त्याचं महत्त्व समजतं हे कळतं.रखरखीत वाळवंटात तहानेने व्याकूळ झाल्या शिवाय पाण्याचं मोल समजत नाही.रोजच्या वापरासाठी सौदीच्या नागरीकांना मुबलक पाणी मिळतं.ते देखील चोवीस तास.नळ उघडला की फुल्ल प्रेशरनी पाणी पुरवठा अखंड चालू असतो.याचं कारण समुद्र आहे.समुद्राचं पाणी स्वच्छ करुन त्यांनी आपल्या देशाच्या पाण्याच्या दुर्भिक्षावर मात केलीय.पर्यावरणाच्या संवर्धनाचा एक भाग म्हणजे दर वर्षी मार्च मधे भरवण्यात येणारा 'फ्लाॅवर फेस्टिव्हल ' हा महिनाभर चालतो.एका दिवसांत तो बघून होत नाही आणि कितीही वेळा बघितली तरी असंख्य रंगगंधांची ही बागशाही खुणावतच राहणार म्हणून महिनाभर.विशेष असे की उत्सवासाठी उत्सव नाही साजरा केला जात.लहान मुलांना पर्यावरणाचं महत्त्व समजावं म्हणून 'री सायकलींग एक्झिबिशन' असे एक दालन आहे.या ठिकाणी वेस्ट मधून बेस्ट कला निर्मितीचं प्रशिक्षण देण्यासाठी.स्त्री प्रशिक्षिका,मुलांना बसायला छोटी टेबलस्,खुर्च्या ड्राॅइंग पेपर्स,रंगपेट्या सर्व सामग्री जय्यत तयार असते.तेही चकटफू विनामुल्य.इथले सी बीचेस् त्यावर फुलववलेली उद्यानंही बघण्या सारखी आहेत.आपल्या इथे समुद्र आम्हाला आठवतो तो फक्त धमाल करायला आणि गणपती विसर्जनाच्या वेळेला.जी गोष्ट सौदीत घडू शकते ती मुंबई मधे घडवता येणार नाही का? नक्कीच घडवता येईल.पण राजकीय मंडळींची ईच्छाशक्तीच नाही.मग पाण्याचे हाल होणार नाहीतर दुसरं काय होणार?...यानबु पासून ६००किमी वर 'तैफ' सिटी आहे.महाबळेश्वर माथेरान सारखं हे हिलस्टेशन आहे.दोन अडीच हजार फूट उंचावर हाॅटेल 'रमाडा'आहे.तिथून केबल कार बुक करुन अम्युजमेंट पार्क मधे जाता येतं.केबल कारचा हा अर्धा पाऊण तासाचा प्रवास म्हणजे एक भन्नाट अनुभव आहे.अम्युजमेंट पार्कमधे कार्ट ड्रायव्हिंग,थ्री डी फिल्म शो,लहान मुलांसाठी वीजेचे पाळणे,खेळणी हाॅटेल्स असं बरंच काय काय आहे.यासाठी अर्थातच पैसे मोजावे लागतात तर जीवाची तैफ करता येते.कार्ट ड्रायव्हिंगचा अनुभव थ्रीलींग होता.ही बोटीच्या आकाराची छोटी गाडी तुम्हाला दोनेक हजार फूट उंच टेकडीवर घेऊन जाते.जाताना तुम्ही आरामात जाता.येताना मात्र तुम्हाला ड्राइव्ह करत आणावी लागते.दोन बाजुला असलेले दोन दांडे पुढे दाबले की गाडी सुसाट धावू लागते.दांडे मागे ओढले की गाडी थांबते.वेगावर नियंत्रण ठेऊन गाडी ड्राइव्ह करत पायथ्या पाशी पहोचायचं.दांडा मागे ओढला की गाडी थांबते आणि मागच्या गाड्या तुमच्या गाडीला येऊन धडकतात.धडकू न देता गाडी चालवण्यात तुमचं कौशल्य पणाला लागतं.तैफ सिटीतलं प्राणी संग्रहालय देखील बघण्या सारखं आहे.आता पर्यंत कुठल्या झू मधे जिराफ बघितला नव्हता तो इथे बघायला मिळाला.गंमत म्हणजे आपल्या इथे गाढवं आणि कुत्री सर्रास बघायला मिळतात ती इथल्या मुलांना बघायला मिळत नाहीत म्हणून ती पण इथल्या पिंजऱ्यात बघायला मिळाली.सौदी अरेबिया म्हणजे रखरखीत शुष्क वाळवंट,परधर्मियांना क्रूर कठोर वागणूक,वगैरे समजूती मनात ठेवून आलेल्या माणसाचा चांगल्या अर्थाने भ्रम निरास होतो.तसं हे पर्यटकांसाठी असलेलं राष्ट्र म्हणता येत नाही पण त्या दिशेनेही विकास करायची योजना आखायला पाहिजे अशी ईच्छा शक्ती इथल्या राजेशाही व्यवस्थेत निर्माण होऊ लागलीय असे म्हणायला हरकत नाही.इथला स्थानिक सौदी नागरीक स्वत:चा उद्योग व्यवसाय करु शकतो.स्वत:चे घर बांधू शकतो पण त्यावर अंतिम मालकी इथल्या सुलतानाचीच असते.आपल्या इकडे हाॅटेल्स,घरे,दुकाने इथे जशी शिवाजी महाराजांची तसबिर दिसते तशी इथे इथल्या सुलतानाची व त्याच्या वडिलांची तसबिर दिसते.अर्थात त्याची सक्ती आहे असं नाही पण शांत सुस्थिर व सुरक्षित जीवन या राजेशाहीत जगायला मिळतंय या विषयीची कृतज्ञता म्हणून लावतात.एक आवर्जुन सांगण्याची गोष्ट म्हणजे इथे मिळकत कर नावाचा प्रकार नाही.फक्त वीजबील व पाण्याचं बील भरावं लागतं.इथले नागरीक परधर्माच्या माणसांशी आपुलकीने बोलतात,मदतीला तयार असतात,पण धार्मिक कट्टरता मात्र सोडत नाहीत.श्रीकृष्णाचा किंवा येशूचा महिमा त्यांच्या समोर गाऊ लागलात तर ते खपवून घेणार नाहीत.इथे उदारमतवाद यायला अजून ५० वर्ष लागतील.इथला व्यापार उदीम आपल्यापेक्षा नक्कीच फेअर आहे.आपल्या इथे एकदा विकलेला माल कोणत्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही अशा पाट्या असतात.अशी पाटी इथे नसते.विकत घेतलेली वस्तू १५ दिवसांनी बदलून देतील.पावती मागणार नाहीत.तुम्ही घेतलेली वस्तू परत करायला गेलात तरी आनंदाने परत घेतील.इतकच नाही तर १००₹ च्या वस्तूचा भाव पंधरा दिवसांनी ११०₹ झाला असेल तर तुम्हाला ११०₹ परत मिळतील.इथे बांधण्यात येणाऱ्या ईमारतींचे,मग त्या घरांच्या असोत किंवा माॅल्सच्या असोत,रंग ठरवून दिलेत.ज्या ठिकाणी बैठी घरे आहेत त्या परिसरात उंच इमारती दिसणार नाहीत.जिथे फरशा टाकल्यात त्या काढता येत नाहीत.जिथे मोकळी जमीन सोडलीय तिथे फरशी टाकता येणार नाही.नियम आहे.मोडला तर टाकलेल्या फरशा ,बांधकाम लगेच काढावेच लागते.हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की भविष्यात समस्या निर्माणच होणार नाहीत असे नियम बनवता येतात.ताबडतोब व कठोर कारवाई करुन ते अमलात आणता येतात.अशा खूप गोष्टी आहेत ज्या राजेशाही व्यवस्थेकडून भारतात सारख्या लोकशाही व्यवस्थेने स्विकारायलाच हव्यात.भारताचा सामान्य नागरिक म्हणून माझं हे मत मांडतोय इतकंच.हा माणूस सौदीचं खूपच कौतुक करतोय असं वाटेल पण जे भावलं,चांगलं आहे ते आधी सांगायला पाहिजे.पण कुठल्या व्यवस्थेत १००%सगळंच चांगलं कसं असेल? इथे नोकरी व्यवसाया निमित्ताने आलेल्या भारतीय माणसासाठी सांस्कृतिक भूक भागेल असं काहीतरी असणं अत्यंत गरजेचं आहे.इथे नोकरी करुन भारतीय माणूस आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला असेल.मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकला असेल.पण साहित्य,नाट्य,नृत्य,संगीत यातली कला जोपासता येईल,अशा कलांच्या प्रकटीकरणाला वाव मिळेल असं वातावरणच इथे नाही.ते निर्माण करणं आवश्यक आहे.ही गोष्ट खरं म्हणजे अवघ्या मानव प्राण्यासाठी आवश्यक आहे.परदेशातल्या,परधर्माच्या माणसांना आपण हे पटवून देऊ शकत नाही.पण आपली मानसिक गरज म्हणून निश्र्चितच काही करु शकतो.तशी इथल्या मराठी,गुजराथी,साऊथ इंडियन रहिवाशांनी सुरुवात केलीय पण तेवढंच पुरेसं नाही.एक भारतीय कलांच्या प्रदर्शनासाठी व्यासपीठ भविष्यात उभं राहील.बहुभाषिक साहित्य-नाट्य संमेलन आयोजित होतील,इथले भारतीय नागरीकच ते घडवून आणेल.सध्या ते इथल्या राजेशाही व्यवस्थेच्या नियमांच्या चौकटीत राहून करावे लागत असल्यामुळे मर्यादा जरुर पडतायत.पण हळूहळू ही चौकट विस्तारेल अशी आशा करायला जागा आहे.कट्टर मुस्लीम धर्मियांचा हा देश कासवाच्या गतीने का होईना बदलतोय.अमूलाग्र परिवर्तनाची गरज इथल्या सुशिक्षित अबालवृध्दांना जितकी तीव्रतेने वाटेल तेवढ्या लवकर हे परिवर्तन घडून येईल.न जाणो परिवर्तनाची साद घालत इथले सौदी तरुण-तरुणीच उभे राहतील.एखादा नरेंद्र दाभोळकर ,एखादी विद्या बाळ,एखादा जग्गी वासुदेव,इथे निर्माण होईल.त्या दिवसाची आपण वाट पाहू.
©रमेश यशवंत वाकनीस© 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७