यानबुच्या डायरी मधून

चार
सकाळी चहा-पाणी झालं की मी अरुणा राॅयल कमिशन कॅम्प परिसरात फिरायला जातो.घरा बाहेर कचराकुंडीत कचरा टाकायला जायचं असेल तरी सुध्दा इथे स्त्रीला जसा आबाया घालावाच लागतो तसंच इथे तीन महिन्याच्या व्हिजावर आलेल्या आम्हाला आमचे पासपोर्ट जवळ ठेवावेच लागतात.प्रत्येक १०-२० फूटावर नागरिकांवर सक्त नजर ठेवणारे व चौकशी करणारे सौदी पोलीस उभे असतात असं नाही पण प्रिकाॅशन घेणं आवश्यक आहे.समजा फिरत फिरत खूप लांब गेलो आणि रस्ता चुकलो..शंका येऊन एखाद्या पोलीसाने विचारलं आणि पासपोर्टच नसेल तर इथले पोलीस डायरेक्ट जेलमध्येच ठेवतात.तुमची पूर्ण चौकशी करुन ही माणसं अनधिकृत पणे या देशात घुसलेली नाहीत अशी खात्री झाल्या शिवाय ते तुम्हाला सोडतच नाहीत.त्यातून तुम्हाला शुक्रवारी पकडलं, तुम्ही तुमच्या माणसांशी फोनवर संपर्क साधू शकला नाहीत तर मग तुमचं काही खरं नाही.आता आम्हाला येऊन इथे महिना झाला पण आमची कुणी साधी चौकशी देखील केलेली नाही.एकदोन वेळा पोलीसांची गाडी आमच्या समोरुन आली पण आत बसलेल्या पोलीसाने आदराने सलाम केला. पोलीस मग तो कुठल्याही देशातला असो तो विनाकारण कुणावर संशय घेणार नाही.कुणाला त्रास देणार नाही.तुमचे वर्तन संशयास्पद वाटले तरच तो तुम्हाला हटकेल.- तर रोज थोडंसं फिरुन एका कार पार्किंग मधल्या बेंचवर थोडा वेळ विश्रांती घेतो.नेहमीच्या ठिकाणी बसायच्या ऐवजी आम्ही दुसऱ्या एका पार्किंग मधल्या बेंचवर बसलो.सहज समोरच्या खांबावर नजर गेली तर..खडूने आय लव्ह यू- के अशी अक्षरे लिहीलेली पाहिली.मग इतरही खांबांवर,पार्किंगच्या छतावर पाहिलं.काळ्या मार्कर पेने कुठे ह्रदय काढलेले,स्त्री-पुरुषांचे आकार, कुठे फोन नंबर, नावं लिहीलेली आढळली..मी पुण्यात असं काही पाहिलं असतं तर काहीच नवल वाटलं नसतं.पण ज्या देशात राजेशाही आहे.स्त्रीकडे पाहणं म्हणजे देखील शिक्षेला आमंत्रण दिल्या सारखे आहे अशा देशातल्या एका शहरात हे मी पहात होतो.माणसानं आपलं आचरण शुध्द ठेवावं.नीतीनं वागावं.दुराचार करु नये.सदाचारी रहावं अशी अपेक्षा मानव निर्मित सर्वच धर्मात आहेत.समाजाला नाही तर देवाला घाबरुन तरी चांगलं वागावं म्हणून देव कल्पने बरोबरच स्वर्ग- नरक कल्पना माणसाच्या मनावर बिंबवायला सुरुवात केली.पण माणूस देवालाही घाबरेनासा झाला मग कायदा आणि तो पाळायला लावणारी पोलीस यंत्रणा आली.तरी माणूस काही सुधारला नाही.कारण सर्वगुण संपन्न , निर्दोष माणूस घडवणारा ' साचा ' किंवा ' मोल्ड ' अजून माणसाला  सापडला नाही.प्रयत्न चालू आहेत.कदाचित त्याला यश येईल सुध्दा.पण मग सर्वच साधुसंत असलेले जीवन  किती नीरस,बेचव, होऊन जाईल?सर्वेवै सुखिन: संतु..सर्वे संतु निरामया: असं जगातल्या सर्वच थोर धर्मवेत्त्यांना वाटलं.पण निसर्गाशी टोकाची स्पर्धा करुन हे शक्य होणार नाही हेही त्यांना माहित होते.म्हणूनच त्यांनी जास्तीत जास्त नैसर्गिक व्हा,असा उपदेश केला स्वत: तसे राहिले. शिवशाही असो किंवा मुगलशाही असो माणूस स्व-कल्याण साधू शकतो.स्वत: सुखी होऊ शकतो हे त्यांनी एक विशिष्ट जीवन पध्दती स्विकारुन सिध्द केले.कारण मानव निर्मित व्यवस्थेच्या मर्यादा त्यांना माहित होत्या.पार्किंग मधली चित्रं पाहून हे इतकं सगळं मनात एकदम आलं.कायदे करुन,कठोर शिक्षा करुन माणसाच्या आदिम अंतःप्रेरणा संपवता येत नाहीत.दाबून टाकता येत नाहीत.त्या कुठल्यातरी मार्गाने डोकं वर काढतातच.भारता सारख्या लोकशाही राष्ट्रात वयाची ६८ वर्षे काढून राजेशाही असलेल्या सौदी अरेबिया या देशात आल्या पासून न कळत राजेशाही व लोकशाही व्यवस्थेची तुलना होतीय.राजेशाहीतले जे समाजस्वास्थ्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कायदे आणि सोयी-सुविधा आहेत त्या भारताने अग्रक्रमाने अॅडाॅप्ट केले पाहिजेत.भारता मध्ये शिक्षण आणि वैद्यकिय उपचार एवढे महागडे आहेत की माणूस शेवट पर्यंत आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीयच ठरतो.सरकारी मोफत म्हणून ज्या सोयी आहेत त्यांचा दर्जा निकृष्ट आहे.भ्रष्टाचार, दिरंगाई, वगैरे गोष्टी तर पाचवीलाच पुजल्यात.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पुतळ्यांवर ,स्मारकांवर जेवढा पैसा खर्च झाला असेल तेवढ्या पैशात या दोन गोष्टी तर काही प्रमाणात करता आल्याच असत्या.इथे काम करणार्या सरकारी ,खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना मुलांच्या शिक्षणाची १२ वी पर्यंत चिंता नाही.मेडिकल ट्रीटमेंटच्या खर्चाची मरे पर्यंत फिकिर नाही.त्यांच्या पॅकेजमध्ये या गोष्टी इनक्लुड असल्याच पाहिजेत असं बंधनच आहे.बाहेरच्या देशातला नागरीक रोजी रोटी साठी इथे येऊन तीस-वर्ष राहिला तरी सौदी सरकार त्याला इथलं नागरिकत्व देणार नाही.भारतात कुणीही घुसून आपले बस्तान बसवू शकतो.सौदी मधे बिझनेस करायचा असेल तर एक पार्टनर सौदी असावाच लागतो.त्याशिवाय इथे बिझनेस सुरुच होऊ शकत नाही.इथल्या खाजगी कंपन्यात,माॅलमधे भारतीय,पाकिस्तानी आणि बांगलादेशी स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.आता इथेही सौदीकरणाची सुरुवात झाली आहे पण ते कितपत यशस्वीपणे राबवले जाईल या विषयी प्रश्नचिन्ह आहे.कारण सौदी नागरीकांना काबाडकष्ट करण्याची सवय नाही.अमीर उमरावांच्या मुलांना नोकरी करायची गरज नाही.मध्यम वर्गीय  सौदी कर्मचाऱ्यांना संभाळून घेतलं जातं.पोटासाठी घरदार,बायका मुलांना सोडून‌ किंवा त्यांच्यासह आलेल्या एतरदेशीय कर्मचाऱ्यांवर वर्कलोड जास्त पडतं.सौदी मधे बेकार तरुणांना बेकार भत्ता साडेतीन हजार रियाल( १ रियाल =१८₹) दिला जातो.असं असलं तरी इथे गरीब माणूसच नाही असं नाही.यानबु,जेद्दाह सारख्या शहरातील माॅल्सच्या,दुकानांच्या बाहेर,ट्राफिक सिग्नलच्या चौकात भिक मागणारे स्त्री-पुरुष दिसतात पण रस्त्याच्याकडेला तीन दगडांची चूल मांडून संसार मांडलेले माणसं असून भूता सारखे स्त्री-पुरुष,उघडी नागडी मुलं असं दृश्य कुठे दिसलं नाही.एक तर भिकाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे आणि दिसतात ते स्त्री-पुरुष भिकारी आहेत असं वाटतच नाही.नीट निटके कपडे घालून ते ट्राफिक सिग्नलच्या चौकात हात पसरतात म्हणून त्यांना भिकारी म्हणायचं.स्त्री भिकारीण तर पूर्ण आबाया घालून माॅल्सच्या बाहेर रस्त्यावर बसलेल्या दिसतात. गल्लीबोळांमधे रस्त्यावर राडारोडा,ओसंडून वाहणाऱ्या कचरापेट्या दिसतात नाही असं नाही पण तुलनेनी कमीच.इथला सर्वात मोठा प्लसपाॅइंट म्हणजे ध्वनि प्रदूषण अजिबात नाही.एकंदरीत इथल्या सामान्य माणसाला जास्तीत जास्त सुखी ठेवण्याचा प्रयत्न‌ इथल्या राजेशाहीचा दिसतो.या सगळ्या लिहीण्याचा अर्थ असा नाही की राजेशाही किंवा हुकूमशाहीचा मी समर्थक आहे.आपल्या संरक्षण खात्यातल्या कर्मचाऱ्यांना जशा सोयी सुविधा उपलब्ध आहेत तशा सर्व सोयी सुविधा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मिळाव्यात असं मात्र मला मनापासून वाटतं.आपल्या देशाची लोकसंख्या लक्षात घेता हे अवघड असलं तरी अशक्य नाही.
     आम्ही जेद्दाहच्या पुढे अल लीथ या तालुक्या सारख्या छोट्या गावा पासून दूर डोंगराळ भागात मुक्कामी पिकनिक केली त्याला आता दोन आठवडे उलटून गेले.पण आठवणी अजून ताज्या आहेत.सकाळी ७.३० ला आम्ही कार मधे बसलो.आमच्या बरोबर निकेत बोराडे,ओसामा,,सतीश जावळी पटेल, राकेशकुमार,असे तीनचार  परिवार होते. अल लीथच्या डोंगराळ भागातून गाड्या काढत आम्ही जिथे मुक्काम करणार होतो त्या ठिकाणी पोहोचलो.चारही बाजूने डोंगर आणि मधे डेझर्ट.बाजूने वाहणारे गरम पाण्याच्या झऱ्याचे रुणझुण पाणी..डोंगरांच्या पायथ्याशी,डोंरांवर,शांत निश्चल उभी असलेली हिरवाई..संध्याकाळचे सहा वाजले होते...सर्व आसमंत सावळ्या-उदी रंगाने माखलेला..गहन गंभीर शांततेचे   हजारो अदृश्य हात धीम्या पावलांनी येणाऱ्या चांदरातीला बाहूत घ्यायला आसुसलेले..!!! पाच-सहा तासांचा प्रवास करुन आलेले आम्ही सर्व हे अद्भूत वातावरण अनुभवत पाय मोकळे करीत खूप फिरलो.मला तर कुणाशी बोलू नये फक्त डोळे मिटून या शांततेचा आवाज ऐकत बसावं असंच वाटत होतं.सगळ्या सोबत्यांना सोडून मी खूप लांब फेरफटका मारला..वाटलं हीच हीच ती शांतता जी कवी-कलावंत कला निर्मितीत शोधतो..हीच ती शांतता जी निर्मिती नंतर सापडलीच तर छळत राहते कलावंताला नवनिर्मितीसाठी..!! परत आलो तेंव्हा मुलंमुली गरम पाण्यात हुंदडू लागली होती.त्यांच्या भारतीय माता सुध्दा सकाळ पासून अंगावर चढवलेला आबाया उतरवून त्यांच्यात सामील झाल्या.अपवाद फक्त ओसामाच्या मुलींचा आणि त्याच्या बायकोचा होता.अंधार पडू लागला तशी पुरुष माणसं आपापले तंबू उभे करु लागले.सौ. सतीश        यांनी गॅसची शेगडी पेटवली आणि सर्वांसाठी चहा बनवला.गाडीत बसून बसून आंबून गेलेलं अंग,आलेला थकवा कढत कढत चहाच्या घोटा सरशी कुठल्या कुठे पळाला.निकेत,सतीश, यांनी जाऊन झाडाचे वाळलेलं खोड,काटकुटक्या आणल् या ओसामानी खिशातला लायटर काढून अग्नि प्रज्वलीत केला.ज्वाला नृत्य करत आकाशाच्या दिशेने झेपावू लागल्या.त्यांच्या सावल्या सभोवती बसलेल्या आमच्या चेहऱ्यांवर नक्षी काढू लगल्या.अंधार गडद होऊन आकाशात हळूहळू चांदण्या चमकू लागल्या.मी मॅटिंगवर छातीवर हात ठेवून विस्तीर्ण आकाश-वितान डोळ्यात साठवून घेत होतो.मला फार आवडतं असं चांदण्या रात्री आकाशाकडे पहात राहायला.मनात  येणारे सगळे भलेबुरे विचार,भावना,आठवणी दबक्या पावलांनी मनाला सोडून जातात..कुठे?..माहित नाही.हळूहळू आपलं मनही कुठेतरी निघून जातं.. कदाचित आकाशात..किंवा मन मन म्हणतो आपण ते म्हणजेच हे आकाश असं जाणवतं..ही जाणीव खूप खोल खोल विराट होऊ लागते.इतकी की त्या विराटाची भीती वाटू लागते.की हे विराटच जीवमात्रांमधे भयाला जन्म देतं?...' भय इथले संपत नाही..मज तुझी आठवण येते..'
     मनात हे असं सगळं चालू असतानाच गरमागरम मूगाची खिचडी,मेथिचे पराठे, शिरा,असं भरलेलं ताटच पुढे आलं तेंव्हा आपल्याला भूक लागलीय याची जाणीव झाली.पाच- परिवाराचे गोलाकार तंबूंच्या मधे जळणाऱ्या शेकोटीच्या ज्वाळा भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातून एकत्र आलेली मुले-माणसे गप्पा मारत सहभोजनाचा आनंद लुटत होती. आकाशात पूर्ण चंद्र अगदी माथ्यावर आला होता.त्याच्या भोवती चांदण्याही लुकलुकत होत्या.जेवण झाल्या नंतर काही जणांनी पत्त्याचा डाव मांडला.आमची आभा आणि काही बाल चमूंनी वाळूत खेळायला सुरुवात  केली होती.आणि हे सगळं पाहणारं,कुणीही नव्हतं.होते फक्त ध्यानस्थ ऋषीं सारखे तटस्थ,अलिप्त डोंगर..जगाशी सर्वार्थाने संबंध तुटलेला होता..आणि अजून अख्खी रात्र जायची होती.अशा एकाकी ठिकाणी आमच्यातला एक तरी माणूस एकटाच येऊन राहिला असता? -समजा एखाद्यावर तशी वेळ आली असती तर त्यानं अख्खी रात्र भयाच्या जाणीवेच्या सहवासात कशी काढली असती? मी चार ओळखीच्या सोबत्यां बरोबर होतो म्हणून असा काही विचार तरी करु शकलो होतो.रात्री एकट्याने मुक्काम करायचे धाडस मला तरी नसते झाले.सापडलोच असतो अशा ठिकाणी तर तिथून चालत,पळत,ठेचकाळत,लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न केला असता.आत ११ वाजत आले होते.सकाळी ७.३० पासून संध्याकाळी ६.०० पर्यंत कार मधे बसून शिणलेल्या आमचे सर्वांचेच डोळे मिटायला लागले होते.मनुष्य वस्ती पासून शेकडो मैल दूर असलेल्या त्या वाळवंटावर उभारलेल्या आपापल्या तंबूत सन्नाटा पांघरुन झोपण्या शिवाय गत्यंतर नव्हते.
       ओसमाची अजान सुरु झाली आणि तंबूत निजलेल्या आमच्या पैकी बहुतेक सर्वांनाच जाग आली. हळूहळू लहान मुलेही‌ उठली. पुन्हा एकदा गरम पाण्याच्या निर्झरातून मुले नाचू लागली..त्यांच्या बरोबर आम्ही सुध्दा..चहा पाणी झाल्यावर..आमच्या दोन फॅमिलीज सोडल्या तर बाकी सगळे इजिप्तला जाणार होते.त्यांना नाताळची दहा दिवस सुट्टी होती.दुष्यंत आणि त्याचे मित्र राकेश यांना नव्हती त्यामुळे आम्ही जेद्दाला अॅक्वेरियम आणि डाॅल्फीन शो बघून मग घरी परत असा कार्यक्रम ठरवला. जेद्दा शहरात प्रवेश केला तेंव्हा मुंबईची आठवण आली. उंच उंच टोलेजंग इमारती,भरधाव धावणाऱ्या कार्स..भव्य माॅल्स मधून उतू जाणारी श्रीमंती..पहात आम्ही रेड सी या भव्य माॅल मधे प्रवेश केला. दिड दोन किमी लांबी रुंदी चा हा माॅल असेल.माॅल कुठलाही असो भारतातला किंवा परदेशातला. याची रचना अंतर्गत सजावट सगळं इतकं आकर्षक असतं की तुम्ही तुमच्या नकळत इतके फिरत राहता आणि गरज नसताना उगाचच खरेदी करता.खूप थकलात की मग तुमच्या लक्षात येतं की एवढे पाय तुटे पर्यंत फिरायची गरज नव्हती.आम्ही आत शिरलो होतो ते मात्र फ्रेश होऊन पोटपूजा करण्यासाठी. इकडच्या माॅल मधल्या ,उद्यानां मधल्या,किंवा हाॅटेल्स मधल्या वाॅशरुम अतिशय नीट अॅंड क्लीन असतात.सगळेच लोक ते व्यवस्थित वापरत असतील असं नाही पण इथला सफाई कर्मचारी वर्ग आपलं काम चोख करतो.विशेष म्हणजे यात भारतीय, बांगलादेशी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहेत.हेच कर्मचारी आपल्या स्वतःच्या देशात इतकं मन लावून प्रामाणिकपणे काम करणार नाहीत.याचं कारण वेगळं सांगायला नको.दुसरी विशेष बाब म्हणजे कुठल्याही शहरात कुठेही असलात तरी नमाजच्या वेळेला आता कुठे जाऊ असा प्रश्नच पडत नाही.जवळपास मशिद असते किंवा जिथे असाल तिथे तशी व्यवस्था असतेच असते.इतकच काय सिलींगवर पूर्व दिशा समजावी म्हणून मक्कामशिदीचं चित्र असतं. फ्रेश होऊन पोटपूजा करुन आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमारास अॅक्वेरियम आणि डाॅल्फिन शोच्या ठिकाणी पोहोचलो.
        इथलं अॅक्वेरियम पाहणं म्हणजे एक अत्यंत अद्भूत अनुभव होता.माझ्या सारख्या पुण्यात संभाजी उद्यानातलं मत्स्यालय पाहिलेल्या माणसाला तर समुद्राच्या पोटातून सफर केल्या सारखंच वाटलं.दोन्ही बाजूला निळाभोर समुद्र आणि आयुष्यात कधी पाहायला मिळणार नाहीत असे विविध प्रकारचे मासे शार्क,सीगल,स्टार,आॅक्टोपस, स्ट्रीग,किती नावे सांगावीत? प्रत्येकाला निसर्गाने बहाल केलेले रुप वेगळं रंग वेगळा आणि स्वसंरक्षणासाठी दिलेली शक्ती वेगळी.निसर्गाच्या सृजन सामर्थ्या पुढे आपोआपच नतमस्तक व्हायला होतं.या सर्व जलचर प्राण्यांचं वर्णन करणं परमेश्वरालाही अशक्य प्राय वाटेल.असे रंग अशी नक्षी प्रत्येकाला लाभलेली.पाण्यातून भक्ष्याच्या मागे धावण्याची गती, चपळता ,तो रुबाब ती ऐट,प्रत्येकाची वेगळीच.शब्दच नाहीत.आश्चर्यानं मुग्ध होऊन बस पहात रहावं बस्स.चिक्कार फोटो काढले पण फोटोत तो जिवंतपणा नाही.किती पाहू ,किती नको असं होतं असतानाच डाॅल्फिन शो ची वेळ झाली आणि आम्ही घाईघाईत बाहेर येऊन थिएटरमध्ये प्रवेश केला. टॅंक पासून दोन फूटावर असलेल्या आसन पकडून आम्ही बसलो.पाचच मिनिटांत प्रेक्षागृहाचे दोन्ही दरवाजे बंद झाले एक तगडा अरबी युवक माईक हातात घेऊन आत आला.पाठोपाठ दोन सीगल घेऊन दुसरा तरुण आला.फतक फतक चालत येऊन दोन्ही सीगल पाण्यात उभ्या केलेल्या स्टुलवर येऊन बसले.प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्यावर त्या दोघांनीही पुढचे दोन्ही पंखा सारखे हात एकमेकांवर आपटून टाळ्या वाजवल्या. त्यांना स्वतःच्या तालावर खेळवणाऱ्या युवकाकडे एका भांड्यात सीगलचे आवडते खाद्य होते.हवेत उडवलेले‌ ते छोटे मासे शिताफीने मटकावत तो अनाऊन्समेंटमधून मिळणाऱ्या आज्ञा पाळत होता. लाज वाटत नाही का? असं विचारलं की पुढच्या दोन्ही पंखात चेहरा झाकून छान लाजून दाखवत होता.पाण्यात टाकलेल्या रींग सूर मारुन गळ्यात  हारा सारखे माळून वर येत होते.डाॅल्फिन्सचे पाण्यात सूर मारुन उंच उंच उड्या मारणे चेंडू डोक्याने ढूशी देऊन उडवणे,मोठ्या रिंग मधून लिलया पार होऊन हवेत अर्ध वर्तुळे काढणे खरोखर डोळे दिपवणारे होते. त्यांना दमदार आवाजात आॅर्डर देऊन प्रेक्षकांसाठी रंजक अॅंकरींग करणारे अरेबियन तरुणही कौतुकास पात्र होते.आधी हे खेळ करुन घेणारा फ्रेंच युवक होता.पाळीव प्राण्यांचे प्रशिक्षण हे तसे अजूनही दुर्लक्षित क्षेत्र आहे.परदेशात अशा क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत.तरुणांनी इतर खेळांच्या प्रमाणे याही क्षेत्राकडे वळायला हरकत नाही.विशेषत: भारतीय तरुणांनी अशा नवनवीन संधी शोधायला हव्यात. आपल्या इकडे माकडांचे खेळ दाखवणारे मदारी मला आठवले.रस्त्यावर चाललेले असे मदाऱ्यांचे,गारुड्यांचे खेळ मी शाळेत असताना खुप वेळा पाहिले आहेत.अनेकांनी पाहिले असतील पण आपल्या इकडे अशा कौशल्यांना व्यावसायिक प्रतिष्ठा मिळायला अजून किती वर्षे लागतील.कब्बडीला आंतरराष्ट्रीय खेळाची मान्यता मिळायलाच किती वर्षे लागली हे वेगळे सांगायला नको.
       रात्री अकरा साडेअकराला आम्ही यानबुत आमच्या घरी पोहोचलो.आता पुढच्या विकेंडला कुठे नेइल दुष्यंत तिथे जायचे असे मनोमन ठरवत आम्ही झोपेच्या अधीन झालो.

©रमेश यशवंत वाकनीस©
      

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७