यानबुच्या डायरी मधून
दोन .
" फ्लाॅवर्स डझन्ट हॅव देअर ओन व्हाॅइस अॅंड चाॅइस " काल की परवा आठवत नाही पण हे वाक्य कानाशी येऊन बोललं कुणी तरी.डोळे उघडून क्षणभर थबकलो त्या वाक्यापाशी. फुलांना त्यांचा स्वत:चा आवाज आणि निवड नसते. फुलांचं काय घेऊन बसलात? माणसाच्या बाबतीतही हे खरं नाही का? फुलां सारखेच आपण निसर्गाच्या मर्जीनी कुठे तरी जन्म घेतो.कुणी तरी आपल्याला वाढवतो आणि एक दिवस आपण पुन्हा या जगात येण्यासाठी ही जीवन यात्रा संपवतो तीही निसर्गाच्याच कृपेने.या यात्रेत किती माणसे किती काळ भेटणार,नाती कुणा कुणाशी किती घट्ट होणार,कुठे तुटणार यांचे कोणतेही गणित नसते.असले तर आपल्याला माहीत नसते किंवा अनुभवानेच ते कळते. हे आपल्याला माहीत असले तरीही आपण किती गोष्टी कायमच्या आपल्याच आहेत अशा गोड भ्रमात राहतो.किती गोष्टी धरुन ठेवण्याचा प्रयत्न करत राहतो.अगदी जाणीवपूर्वक आपण काही धरुन ठेवण्याचा प्रयत्न नाही केला तरी आपलं मन काही गप्प बसतं कां? ते अतिशय क्षुल्लक गोष्टींना देखील भुलतं आणि त्या गोष्टी मनात कायमच्या घर करुन राहतात.यात काय काय म्हणून नसतं? पूर्व जन्मा पासून या जन्मातील बालपणापासून हे मन असंख्य गोष्टींच्या नोंदी ठेवत जातं.आपली गरज ओळखून योग्य वेळेला ती गोष्ट, ती वस्तू ,रोजमर्राच्या जिंदगीतले रुसवे- फुगवे , मानापमान ,सुख-दु:खाचे प्रसंग , अपूर्ण राहिलेल्या हजारो ईच्छा आकाक्षांचे गाठोडे सोडून आपल्या पुढे ठेवतं. खरंच आपलं मन म्हणजे एक कधीच न भरणारे गोदाम आहे.या गोदामातून केंव्हा काय बाहेर येईल आणि आपण अवतीभवतीच्या वातावरणाशी,सग्यासोबत्यांबरोबर कसे रिअॅक्ट होऊ किंवा कसे प्रतिसाद देऊ ते सांगता येत नाही.भल्या पहाटे ज्या वाक्याने माझे डोळे उघडले त्यावरुन हे सगळं शब्दात मांडत गेलो.फुलां बरोबर आपली केलेली तुलना कुणाला आवडणार नाही.आपल्याला आपला स्वत:चा आवाज आहे.निवडीचं स्वातंत्र्य आहे, कारण फुलांकडे जी नसते ती बुध्दी ती आपल्याकडे आहे असा युक्तिवाद वाद कुणी करेल.तो सहज पटणाराही आहे.पण मग ही जी बुध्दी बुध्दी आहे असं आपण म्हणतो ती कुणामुळे आहे? देह मन बुध्दी स्मृती श्रृती,नाद ही सगळी निसर्गाचीच देणगी नाही का? भरभरुन देणारा आणि योग्य वेळ येताच दिलेलं सर्व एका क्षणात काढून घेणारा निसर्गच आहे ना? मग त्याचे ऋण मान्य करायला नकोत कां?- हो.नक्कीच.कुणीही शाहणा माणूस हेच उत्तर देईल.पण ऋण मान्य करायचं म्हणजे नक्की काय करायचं? सकाळी उठल्यावर सुर्याला नमस्कार करायचा? की आपापल्या धर्मातली पारंपारिक स्तोत्रे,श्र्लोक वगैरे म्हणायचे? पण म्हणजे तरी काय करायचे? -- तर ज्या निसर्गाची आपण देन आहोत त्या निसर्गा इतकेच नित्य नवे व्हायचे. निसर्ग एका सारखीच दुसरी वस्तू कधीच जन्माला घालत नाही.निर्मिती पूर्ण झाली की तिच्यासाठी उपयोगात आलेला साचा तो त्याच क्षणी नष्ट करुन टाकतो.नव्या जन्मासाठी नवीन साचा...अविरत ,अहर्नीश सृष्टी निर्माण करण्याचे कार्य चालू आहे..या मागे विशिष्ट हेतू कोणताही दिसत नाही. असलाच तर निर्हेतूक आनंद लुटण्याचा त्यातच मश्गुल होऊन रमण्याचा.काही मिळवायचं नाही.काही गमवायचं नाही.देश नाही.परदेश नाही.उपदेश नाही.फक्त आणि फक्त आनंद...आनंदाचं असणं...आनंदमयी...!!!!
दोनतीन दिवसा पूर्वी दुषला फोन करुन तीन भारतीय गृहस्थ आले.त्यातला एकच दुषच्या ओळखीचा होता.यानबु मधे पोटापाण्यासाठी आलेल्या एकूण २५० भारतीयांनी मिळून तलत नाझाच्या वाळवंटात दिवाळी साजरी केली.मुस्लीम धर्माच्या प्रभाव क्षेत्रात एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय कुटुंबांनी एकत्र येऊन दिवाळीचा सण साजरा केला ही गोष्ट प्रथमच घडली होती.त्या आठवणी ह्रदयात ताज्या टवटवीत होत्या त्यामुळे पुन्हा एकदा त्याची उजळणी झाली.दरम्यान स्नेहानं पाणी, एका डीश मधे आम्ही पुण्याहून आणलेली बालुशाही समोर टीपाॅयवर आणून ठेवली होती.पण कुणाचा हात पुढे जाईना..दुष्यंतने ते लक्षात आणून देताच त्यातला एक मित्र म्हणाला , नको.आम्ही हे काही घेत नाही.कारण आम्ही यासाठी आलेलो नाही.. हे ऐकताच माझ्या लक्षात आलं की हे स्वाध्याय परिवाराचे साधक आहेत.मग आपली भारतीय संस्कृती, सणवार उत्सव साजरे करायला मिळालेच नसते तर काय झाले असते? आजच्या फास्ट लाईफ मधे आपणच ते विसरु लागलो तर मग आपल्या मुलांवर काय संस्कार होणार? आपल्याला तहानभुकेची, सकाळ झाल्याची जाणीव करुन देणारा जो आहे त्या ई्श्वराचे आपण धन्यवाद मानायला हवेत.--हे असं सगळं बोलणं सुरु असताना आमच्या चार वर्षांच्या नातीनं ड्राॅइंग बुक आणि कलर बाॅक्स काढून चित्र काढायला सुरुवात केली होती.स्नेहा त्यांना सांगत होती, हो हो कराग्रे वसते लक्ष्मी...म्हणते ना आमची आभा..म्हणून दाखव आभा...पण आभुटली कुठली चित्रातनं डोकं वर काढून बघायला?-- सगळी मोठी माणसं एकत्र आलीत म्हणजे आपणच आपला आनंद शोधला पाहिजे. निर्माण केला पाहिजे.आपण स्वत: आनंदी तर आपल्या भोवतालचं जग आनंदी.हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी चिमुरडी आभा त्या क्षणी मला जगातल्या कोणत्याही महान धर्म गुरुं पेक्षाही ग्रेट वाटली. संस्कारांचं एका मर्यादे पर्यंत निश्र्चित महत्त्व आहे हे मान्य केले तरी संस्कार वर्गांच्या साच्यात घालून देव माणूस घडवता येत नाही कारण देव झाला तरी तोही माणूसच आहे हेच आपण लक्षात घेत नाही. ते लक्षात घ्यावे इतकेच.
©रमेश यशवंत वाकनीस©
१३/१२/२०१८
राॅयल कमिशन निवास
Comments
Post a Comment