सहज सुचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून
------------------------
काल काहीच सहज वाटेना म्हणून
ब्लाॅगवर जुनीच हिंदी कविता टाकून मोकळा झालो.तुम्ही ब्लाॅगर असाल तर रोज काही तरी लिहीलेच पाहिजे.तसं बंधन तुम्ही घालून घेतलंच पाहिजे असं नाही पण तशी अपेक्षा जे काही थोडे फार वाचक असतात त्यांची असते.ती बरोबरही आहे.दिसा माजी काहीतरी ते लिहावे,वाचावे,असं समर्थ रामदास्वामींनी ही सांगितले आहेच.अर्थात हे त्यांनी त्यांच्या अनुयायांना,अध्यात्मिक उन्नती करु इच्छिणाऱ्या,जीवनातल्या साधकांना सांगितले असावे.सगळं कळत असून भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या सामान्य माणसांकडून ही अपेक्षा त्यांनी केलेली असली तरी आग्रह धरलाय नाहीय.ते त्यांच्याकडे केवळ दया बुध्दीने पाहताहेत.कधी तरी गटांगळ्या खाणाऱ्यातला हा माणूसही हातपाय मारत किनाऱा गाठेलच गाठेल असा आशावादही त्यांच्या ह्रदयात आहे.धड मुमुक्षु नाही आणि प्रापंचिक सामान्यही नाही अशा कवी मंडळींनी, साहित्यिकांनी मात्र समर्थांची ही अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न जरुर करायला हवा.त्यासाठी ब्लाॅगच निर्माण केला पाहिजे असं नाही.वहीत,डायरीत,लिहा पण लिहा.वाचा.आता कुणी म्हणेल की मी रोज कविता ,कथा,लेख असं काहीतरी लिहीलं म्हणजेच मी कवी-साहित्यिक बिरुदाला पात्र ठरतो का? अगदी बरोबर आहे.लिहीत नसता,कवीच्या जीवन दृष्टीने समरसून रोज मर्राची जिंदगी जगत असता तेंव्हाही तुम्ही कवीच असता.साहित्यिकच असता.कमी नाही पण जास्तच असता.मोहाच्या प्रत्येक क्षणाला  तुम्ही जितके जिवंत असता तितका जिवंतपणा तुमच्या लेखनात प्रकट होतो.काळ्या कभिन्न पाषाणाला अथकपणे धडका देत पाणी ज्या प्रमाणे उंच उसळी मारुन,फूफांडत,वळण वळसे घेत धावत सुटते तसे शब्द धावत सुटतात..रसिकाला बिलगतात.तुमच्या लेखनाचे पहिले रसिक तुम्ही आणि तुम्हीच असता.नंतर तुमचा ब्लाॅग,तुमचे पुस्तक,सवडीने वाचणाऱ्यांचा नंबर. असं जर आहे तर सृजन शक्तीचा उत्स्फूर्त आविष्कार होई पर्यंत मी लिहूच नये का? प्रयत्नच करु नये का?- असाही प्रश्र्न कुणी विचारेल.तर तसं काही नाही.फक्त प्रयत्न कसा करायचा हे कळले पाहिजे.एखाद्याला उत्तम ग्रंथांच्या वाचनातून,चिंतनातून,मननातून,लिहीण्याची उर्जा मिळेल.एखाद्याला जीवनात नवनवी आव्हाने स्विकारण्यातून,त्यातून मिळणाऱ्या यशापयशातून प्रातिभ शक्तीचं दर्शन घडेल.एखाद्याला दोन दोन तास कविता ऐकून ऐकून नवं काहीतरी स्फुरेल.व्यक्तीनुरुप शब्दातून घडणारं जीवन दर्शन,जीवनानुभूतीचं दर्शन वेगळं असेल.ते तुम्हाला स्वतःला किती आवडतं? किती आश्चर्यमुग्ध करतं? यावर तुमच्या लेखनाचा दर्जा तुम्हाला स्वतःलाच ओळखता येईल.दुसऱ्या कुणी समीक्षकानं तो सांगण्याची गरज नाही.आज काल कवी-साहित्यिकांसाठी विषय दिले जातात.यात स्वच्छता,आरोग्य,नदी प्रदूषण,वायू प्रदूषण,असे विषय असतात.जी गोष्ट व्याख्याने,प्रवचने,निंबधातून समजणार नाही ती गोष्ट कवितेच्या दोन ओळीतून माणसाला क्षणात समजते अशी एक भाबडी समजूत या मागे आहे.अशा प्रकारच्या स्पर्धेत,मोहीमेत भाग घेऊन तुम्ही शब्द क्रिडेत किती वाकबगार आहात हे कदाचित समजेल.पण ती 'साहित्यकृती' किंवा 'कलाकृती' या संज्ञेला पात्र ठरेलच असं नाही.तरी शब्दक्रिडेचा रियाज म्हणून असंही लिहून बघायला हरकत नाही.प्रचारकीच पण किती वेगळं,लक्ष्यवेधी,तुम्ही लिहू शकता याचं कसब तुमच्यात आहे की नाही हे कळणं देखील महत्त्वाचं आहे.मुद्दा काय? तर लिहीत्या हातांनी लिहीत राहावं,कुंचले बहाद्दराने कॅनव्हासवर रंग,रेषांची,किमया घडवत रहावी,गायकाने गात राहवं,शिल्पकाराने शिल्प घडवून पहावी,इतकेच काय,चर्मकाराने उत्तम पादत्राणांची निर्मित करावी,सुताराने काष्ठा मधून आकर्षक मोहक वस्तू घडवाव्यात,पाक कुशल व्यक्तीने शाकापाकात आपले कसब दाखवावे.सफाई कर्मचाऱ्याने दृष्ट लागेल अशा स्वच्छतेचा ध्यास घ्यावा.अशा प्रत्येक छोट्यामोठ्या कर्मात 'जीवनाचा अमृत कलश' कवीं-कलावंतांसाठी,जीवनाच्या साधकांसाठी काठोकाठ भरुन ठेवला आहे.कुणीही माणूस तो ओठाला लावू शकतो,इतरांना पाजू शकतो.गरज आहे ती असा अमृत कलश पाहण्याच्या दृष्टीची.
©रमेश यशवंत वाकनीस© 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७