आणखी काही कविता
क्षण निजले निवांत
-----------------------
कधी ओल्या आठवात
आसवात वाहे गीत..
कधी मायेची पाखर
घालुनिया वाहे गीत..
दूर रानात पक्ष्यांच्या
लकेरी या साद देती
कर्णरंध्र तापवून
विस्तवाशी खेळताती..
चंद्र धुंद मिठीतला
अचानक विलगतो..
खिन्न श्वासात रात्रीचा
तम असा झाकोळतो..
मंद डोलतात वेली
वृक्ष आपुला धरुन..
तसे वाटते डोलावे
तुझा आधार करुन..
कुठे मायेची पाखर?
कुठे आहे माझे गीत?..
आठवात..आसवात..
क्षण निजले निवांत..
©रमेश यशवंत वाकनीस©
१०/३/१९९३
Comments
Post a Comment