दिवसांच्या ओल्या काठी

दिवसांच्या ओल्या काठी
------------------------------
उध्वस्त किनारे झाले
दिवसांच्या ओल्या काठी
हाकारित "आई आई"
मी झालो मज सांगाती
समजाया कोणी नव्हते
अश्रूंचे माझ्या दु:ख
मी सन्मुख होऊन त्यांना
झालो मग अंतर्मूख
गत आयुष्याची माती
तुडवीत दूर मी आलो
धुंडाळित आतिल वाटा
प्रेमाचा प्रेमिक झालो
प्रेमाने केली कविता
कवितेने केले प्रेम
मरणाच्या उदरी ऐसा
दोघांचा झाला जन्म
प्रसविली माय मी माझी
मी पोर तिचा अन बाप
रक्तात अनादी माझ्या
ईमानी सुंदर पाप
उध्वस्त किनारे जेंव्हा
होतात गायचे नसते
प्रारब्ध समजुनी आपुले
ते भोगायाचे असते.
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७