आणखी काही कविता
झुला
------
बाळ मुठीतिल स्वप्नांसाठी
घे प्राणांचे पंख तुला
आकाशाला घाल गवसणी
जरी मातीचे पाय तुला
अक्षर ब्रह्माचे घन बरसत
चिंब जाहले घर सारे
थेंबो थेंबी बिंब तुझे हे
पहात बसले ग तारे
जा कर गट्टी त्यांच्याशी
न् सांग मनोगत जगताला
भूत भविष्या आधी घ्या हो
क्षण हर्षावर हिंदोळा..
तू मनकवडी सर्व जाणशी
तोल सांगशी सांभाळा
इवल्या पायी उडवित बसशी
सुख दु:खाचा पाचोळा
या गहिऱ्या डोळ्यात बुडावे
घेत स्वत:चा धांडोळा
तू पहिले अज्ञान आमुचे ज्ञानाच्याही पलिकडले
पलिकडले ते दीप लक्ष हे
पहा घरोघर झगमगले
हा दीपोत्सव हा जन्मोत्सव
चिरंतनाचा एक झुला..
© रमेश यशवंत वाकनीस©
Comments
Post a Comment