हासत पुन्हा विडा उचलित
हासत पुन्हा विडा उचलित
----------------------------
किती दूर किती दूर
तुझे सूर मावळले
हुरहुरींचे काळीज मीही
रात्रंदिवस वागवले..
रात्रंदिवस वागवले ते
ओझे तुझ्या पाठीवर
ने पाहू कसा नेतोस
उष्टे दूध वाटीभर..
उष्टे दूध वाटीभर ते
जन्मजन्मी पुरायचे
साथ संगत सुटली तरी
पुन्हा तेच स्मरायचे..
उरायचे की सरायचे हे
ज्याचे त्याने ठरवायचे
घडणारे तर घडतेच आहे
कधी तरी मरायचे..
कधी तरी मरायचे कां
जन्म नको म्हणायचे?
जीवनाच्या उंबरठ्यावर
किती दिवस झुरायचे?
किती दिवस झुरायचे
नि किती दिवस जगायचे?
याच जन्मी याच देही
सारे भोग भोगायचे..
सारे भोग भोगायचे नि
भोगुन पुन्हा त्यागायाचे
हासत पुन्हा विडा उचलुन
वेड्या व्रतास जागायचे
वेड्या व्रतास जागायचे
मी तेच सूर आळवायचे
काळीज तुझे हुरहुरींचे
शोधित प्रवास करायचे
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment