आणखी काही कविता
व्यथा
-------
व्यथांवर तुझ्या माझ्या
किती लिहू गाणी?
ऐकवित कुणा किती
फिरु अनवाणी?..!
नको नको म्हणताना
आठवतं सारं..!
प्रीतीसाठी म्हणालीस,
"दुनिया झुगार..! "
झुगारुन आलो.तुला दिला
शब्द होता
शब्दाहून थोर माझा त्यात
भाव होता..!
मांडला मी डाव तुला खेळवित आलो
कधी कधी तुझ्यासाठी खेळणेही झालो..!
नशे मधे असा सदा झिंगत मी होतो..!
नभ तुझे सांधायाला दुभंगत होतो..!
आली आली पावसाची सर अनावर..!
भिजवून म्हणालीस स्वत:ला सावर!
सावरलो तेंव्हा उभा उन्हात मी होतो
एकांतास माझ्यासवे एकटाच होतो..!
पुढे शून्य भोवताल व्यापुनिया उरे
स्वप्नवत विश्व वाटे तुझ्यासाठी झुरे!
कोण तू नि कोण मी ग कशासाठी आलो?
प्रश्न हाच अस्तित्वाचा सोडवित मेलो..!
मेल्यावर आता काय व्यथा त्यांची गाणी..
इथे सुरु होण्याआधी संपते कहाणी..!!
©रमेश यशवंत वाकनीस©
Comments
Post a Comment